आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नर्सिंग क्षेत्रातील क्षमता विस्तार आणि भविष्यातील कुशल कार्यबल सज्जतेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, झपिगो आणि ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान विद्यापीठ यांच्यात सहकार्य


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्त्वाखालील गोलमेज परिषदेत एका मजबूत नर्सिंग क्षेत्रासाठी क्षमता निर्माण आणि कार्यबळ नियोजनावर विशेष भर

नर्सेस किंवा परिचारिका या आरोग्यसेवा यंत्रणेचा कणा आहेत : डॉ आकांक्षा रंजन

Posted On: 17 NOV 2025 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवन विद्यापीठ (ECU) आणि  Johns Hopkins Program for International Education in Gynecology and Obstetrics (JHPIEGO) यांच्या सहकार्याने, 'भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील नर्सिंग कार्यबळ अधिक सामर्थ्यशाली करणे : शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत लवचिक आणि कुशल नर्सिंग कार्यबळासाठी  सहयोगी मार्गांची निर्मिती' या विषयावरील दोन दिवसीय गोलमेज परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन,

या संवादाच्या माध्यमातून लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज अशा कुशल नर्सिंग कार्यबळासाठी अधिक दृढ सहकार्य, सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

नुकत्याच झालेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय धोरण बैठकीदरम्यान भारतातील नर्सिंग धोरणाची भविष्यतील दिशा या विषयावर चर्चा झाली असून ही गोलमेज परिषद अतिशय योग्य वेळी होत असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उपसचिव (नर्सिंग आणि दंतवैद्यकीय)  आकांक्षा रंजन यांनी आपल्या मुख्य भाषणात सांगितले. नर्सेस किंवा परिचारिका या आरोग्यसेवा यंत्रणेचा कणा आहेत याचा पुनरुच्चार करुन आपल्याला अधिक लवचिक आणि क्षमता-आधारित नर्सिंग कार्यबळाची उभारणी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

जगभरात 29 लाख परिचारिका कार्यरत असल्या तरी 45 लाख परिचारिकांची कमतरता आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर परिचारिकांची मोठी मागणी निर्माण होत असून नैतिक आणि सुशासित पद्धतीने परिचारिका स्थलांतरासाठी संधी उपलब्ध होत आहेत, असे रंजन यांनी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहयोगामुळे एकत्रितपणे नर्सिंग शिक्षणाचा दर्जा वाढवणे, कार्यबळ वाढवण्यासाठी मार्गांचा विस्तार करणे आणि नैतिक मार्गाने गतिशीलतेला प्रोत्साहन देणे यासाठी एक बहुमोल व्यासपीठ निर्माण होईल तसेच द्विपक्षीय सहयोगामुळे दोन्ही राष्ट्रांना आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना अधिक परिणामकारक रीत्या तोंड देण्यासाठी मदत होईल, असे मत रंजन यांनी व्यक्त केले.

   

जागतिक स्तरावर परिचारिकांचे स्थान  आरोग्यसेवेचे  स्पंदन म्हणून कायम आहे, असे  आरोग्य आणि  कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालय येथील नर्सिंग सल्लागार डॉ. दीपिका खाखा यांनी यावेळी सांगितले. या गोलमेज परिषदेत परस्पर-शिकणे हे केंद्रस्थानी असून त्यामुळे  भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्रितपणे भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांविषयी संयुक्तपणे  विचार करून त्यांना सामोरे जाऊ शकतील, असे त्या म्हणाल्या.

नर्सिंग आरोग्यसुविधा यंत्रणेतील प्रगती अधोरेखित करत त्या म्हणाल्या की, भारताचे 3.5 दशलक्ष परिचारिकांचे सशक्त कार्यदल वेगाने उदयाला येणाऱ्या आरोग्यसेवा परीदृष्यामध्ये सातत्याने कार्यरत राहिल्या असून त्यांना बहुविध परिचारक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसह 5,000 पेक्षा जास्त नर्सिंग शिक्षण संस्थांच्या सशक्त परिसंस्थेचे पाठबळ लाभले आहे. भारत सरकार भविष्यात स्थापन करणार असलेल्या 157 नव्या नर्सिंग प्रशिक्षण संस्थांसह आरोग्य क्षेत्रातील कार्यबळात लक्षणीयरित्या गुंतवणूक करत आहे अशी माहिती त्यांनी सहभागींना दिली.

शिक्षक वर्गाच्या विकासात गुंतवणूक केल्यामुळे संपूर्ण नर्सिंग परिसंस्थेमध्ये एक सशक्त कॅस्केड प्रभाव निर्माण होतो यावर देखील त्यांनी अधिक भर दिला. जेव्हा शिक्षक वर्ग बळकट केला जातो तेव्हा त्याचे फायदे नैसर्गिकपणे विद्यार्थ्यांपर्यंत झिरपत जातात आणि असे विद्यार्थी भारताचा भविष्य-सज्ज आणि नोकरीसाठी सज्ज नर्सिंग कर्मचारीवर्ग तयार करतात.

राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी आयोग कायदा, 2023 अंतर्गत झालेले परिचारिका अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण हे गुणवत्ता, योग्यता आणि देशभरातील नर्सिंग व्यावसायिकांची न्याय्य विभागणी या दिशेने उचललेले परिवर्तनकारी पाऊल ठरले आहे हे डॉ.खाका यांनी अधोरेखित केले. भारताच्या नर्सिंग कर्मचारीवर्गाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात योग्यतेवर आधारित शिक्षण, डिजिटल अध्ययन मंच, सुधारित वैद्यकीय एक्स्पोजर, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, आधुनिक नियामकीय आराखडे आणि सशक्त नेतृत्वविषयक प्रशिक्षण हे महत्त्वाचे स्तंभ आहेत हे देखील त्यांनी अधोरेखित केले.

   

ही गोलमेज बैठक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सामायिक कटिबद्धता आणि सहयोगात्मक उर्जेचे उदाहरण आहे असे देखील डॉ.खाका यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की अशा भागीदाऱ्या नवोन्मेषांचे आदानप्रदान करण्यासाठी, कर्मचारीवर्गविषयक नियोजन करण्यासाठी तसेच सामुहिक प्रयत्नांना शाश्वत विकास ध्येयांशी अनुकूल करून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे त्यांनी नमूद केले.एक सशक्त आणि भविष्य-सज्ज नर्सिंग कर्मचारीवर्ग घडवण्यासाठी सीमापार सहयोग तसेच अध्ययन अपरिहार्य आहे याला दुजोरा देत त्यांनी त्यांचे भाषण थांबवले.

याप्रसंगी बोलताना, ऑस्ट्रेलियामधील एडिथ कोवान विद्यापीठाच्या कार्यकारी डीन प्रा.कॅरेन स्ट्रीकलँड यांनी नर्सिंग शिक्षण आणि पद्धती यामध्ये प्रगती करण्यात दोन्ही देशांतर्फे सुरु असलेल्या संयुक्त प्रयत्नांची प्रशंसा केली. आरोग्यसेवा क्षेत्रात नव्याने उदयाला येणाऱ्या मागण्यांना तोंड देऊ शकतील आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा स्वीकार करू शकतील अशा परिचारिका घडवण्यासाठी जागतिक सहयोग महत्त्वाचा आहे यावर देखील त्यांनी अधिक भर दिला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये नर्सिंग शिक्षणाच्या क्षेत्रात दीर्घकाळापासून भागीदारी आहे आणि या गोलमेज बैठकीने नवोन्मेष, संशोधन विषयक मौलिक माहिती तसेच दोन्ही देशांतील कर्मचारीवर्गाची क्षमता अधिक बळकट करणाऱ्या सर्वोत्तम पद्धती यांचे सामायीकीकरण करण्यासाठी महत्त्वाचा मंच उपलब्ध करून दिला आहे याकडे प्रा.स्ट्रीकलँड यांनी लक्ष वेधले.

नर्सिंग तसेच मिडवायफरी यंत्रणा बळकट करण्यात Johns Hopkins Program for International Education in Gynecology and Obstetrics (JHPIEGO)च्या भारत सरकारशी असलेल्या निरंतर भागीदारीवर अधिक भर देत, जेएचपीआयईजीओचे उप राष्ट्र संचालक डॉ. कमलेश लालचंदानी यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. जबाबदार आणि सशक्त नर्सिंग कर्मचारीवर्ग घडवण्यात तसेच गेल्या दशकभरात भारताच्या आरोग्यसेवा वितरण यंत्रणेत घेतलेल्या भरारीत पुराव्यावर आधारित पद्धती, नवोन्मेष तसेच क्षमता निर्मितीचे महत्त्व त्यांनी ठळकपणे विषद केले.

या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चर्चांमध्ये अध्यापक वर्ग विकास, संयुक्त संशोधन, विनिमय कार्यक्रम आणि डिजिटल अध्ययन नवोन्मेष यांच्यासह द्विपक्षीय सहयोगाची प्राधान्यक्रम क्षेत्रे निश्चित करण्यात आली.

सदर कार्यशाळेने केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकारांमधील ज्येष्ठ अधिकारी, नर्सिंग क्षेत्रातील धुरीण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ आणि विकासविषयक भागीदार यांना एकत्र आणले आणि नर्सिंग तसेच मिडवायफरी क्षेत्रातील सुधारणांवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमात प्रगती करण्यासाठीचा मंच म्हणून भूमिका निभावली.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2191057) Visitor Counter : 5