उपराष्ट्रपती कार्यालय
“तंत्रज्ञानाने मानवतेची सेवा करावी, कोणताही भारतीय मागे राहू नये” – नवी दिल्लीत आयटीएसच्या हीरक महोत्सवी समारंभात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आवाहन
“सहा दशकांपासून आयटीएस ही भारताच्या कनेक्टिव्हिटीची शांत पण महत्त्वाची शक्ती ठरली आहे” – राधाकृष्णन
“दूरसंचार क्षेत्रातील बदलते वातावरण ही आयटीएसच्या उत्कृष्टतेसाठीच्या आणि सार्वजनिक कल्याणासाठीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे” – उपराष्ट्रपती
Posted On:
14 NOV 2025 6:55PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज विज्ञान भवन येथे इंडियन टेलिकम्युनिकेशन्स सर्व्हिस (आयटीएस-भारतीय दूरसंवाद सेवा) च्या हीरक महोत्सव सोहळ्याला उपस्थिती होते. सरकारच्या दूरसंवाद क्षेत्रातील महत्त्वाच्या तांत्रिक-व्यवस्थापकीय गरजा पूर्ण करण्यासाठी 1965 मध्ये ही सेवा सुरू झाली. साठ वर्षांचा टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या आयटीएसच्या परिवर्तनशील प्रवासावर उपराष्ट्रपतींनी भाषणात भर दिला. भारताच्या दूरसंवाद क्षेत्राची जडणघडण कशी झाली हे सांगताना त्यांनी टेलिग्राफी आणि लँडलाइन टेलिफोन कनेक्शनच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते आजपर्यंत देशाला सामर्थ्य देणाऱ्या व्यापक आणि नवोन्मेषी डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंतचा आढावा घेतला.
ही सेवा शांतपणे आणि कार्यक्षमतेने देशाच्या प्रगतीला प्रोत्साहन देत असून त्यामुळे संपर्क वाढतो तसंच देशभरातील लाखो लोकांसाठी ही सेवा संधी निर्माण करते, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने केलेल्या नेतृत्वामुळे भारताच्या दूरसंचार क्षेत्राची व्याप्ती, मजबूत पायाभूत सुविधा विस्तार, डिजिटल समावेशन आणि तांत्रिक नवकल्पनांमुळे वाढली आहे असे ते म्हणाले. बीएसएनएलची मक्तेदारी ते आजच्या स्पर्धात्मक आणि गतिशील बाजारपेठेपर्यंतचा प्रवास हा आयटीएसच्या उत्कृष्ट असणाच्या आणि सार्वजनिक कल्याणासाठीच्या बांधिलकीचा पुरावा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अनेक ऐतिहासिक टप्पे त्यांनी सांगितले. टेलिफोन कनेक्शन मिळवणेही अवघड असण्याच्या काळाचे त्यांनी स्मरण करून दिले. नंतर मोबाईल तंत्रज्ञानाने संवादक्रांती घडवली. त्यामुळे आयटीएस अधिकारी हे देशाच्या दूरसंचार विकासाला कारणीभूत ठरलेले विश्वासार्ह शिल्पकार आहेत, असे ते म्हणाले.
भारतात या सेवेला 5जी आणि 6जी सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह कनेक्टिव्हिटीच्या उज्ज्वल भविष्याकडे नेण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
तंत्रज्ञान नेहमी समावेशकतेवर आधारित असावे, दूरसंचार मानके व नवकल्पनांमध्ये जागतिक अग्रणी म्हणून भारताला स्थान मिळवून देत असताना, कोणताही नागरिक मागे राहणार नाही, याची सुनिश्चिती झाली पाहिजे, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
***
सोनाली काकडे/प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2190234)
Visitor Counter : 6