विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर- इस्रो संयुक्तपणे करणार 'अंतराळ परिषद 2025' चे आयोजन, भारताच्या मानवी अंतराळ मोहीम संशोधनाला मिळणार गती
Posted On:
14 NOV 2025 1:01PM by PIB Mumbai
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 17 नोव्हेंबर 2025 रोजी बेंगळुरू येथील हॉटेल रॅडिसन ब्लू अट्रिया येथे संयुक्तपणे सीएसआयआर- इस्रो अंतराळ परिषद 2025' चे आयोजन करणार आहेत. भारताच्या अंतराळ संशोधनातील आत्मनिर्भरतेच्या ध्येयाशी सुसंगत राहून, मानवी अंतराळ मोहिमेचे संशोधन, सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण अभ्यास आणि अंतराळ तंत्रज्ञानातील नवनवीन शोध पुढे नेण्यासाठी देशातील प्रमुख वैज्ञानिक आणि अंतराळ संस्थांमधील सहकार्य मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
ही परिषद वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग सचिव आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी आणि अंतराळ विभागाचे सचिव तसेच इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाईल. यामध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अंतराळवीर आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह सुमारे 150 ते 200 प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. बेंगळुरूमधील फ्रान्सचे महावाणिज्यदूत, डीआरडीओ, इस्रो, आयआयएससी, आयएएफचे अधिकारी आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA), जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) आणि फ्रेंच स्पेस एजन्सी (CNES) मधील तज्ज्ञदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सीएसआयआर- इस्रो अंतराळ परिषद 2025' मध्ये सीएसआयआर च्या बहुविद्याशाखीय संशोधनाला इस्रोच्या मोहीम-आधारित तांत्रिक गरजांशी जोडण्यावर भर दिला जाईल. या परिषदेत मानवी अंतराळ उड्डाण शरीरक्रियाशास्त्र, जैववैद्यकीय इन्स्ट्रुमेंटेशन, पदार्थ विज्ञान, सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणातील जीवन विज्ञान आणि अंतराळयानाची देखभाल आणि संचालन यासाठीच्या प्रगत प्रणाली यांसारख्या प्रमुख सहकार्य क्षेत्रांवर चर्चा होईल. तसेच, अंतराळात वनस्पतींची वाढ, 'स्पेस फूड'चा विकास, मायक्रोफ्लुइडिक्स, सिरॅमिक मेटामेटिरियल्स आणि सूक्ष्मजीवांमुळे होणारी झीज रोखणे यांसारख्या क्षेत्रातील नवनवीन शोधांवरही चर्चा केली जाईल.
या कार्यक्रमात भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा (निवृत्त) आणि इस्रोचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन प्रशांत बी. नायर यांच्यासह भारतीय अंतराळवीरांचे अनुभव-कथन सत्र आयोजित करण्यात आले आहे. युरोपियन अंतराळ संस्थेचे अंतराळवीर आणि नासाच्या स्पेस शटल मोहिमांचे अनुभवी ज्याँ फ्रान्स्वा क्लेरवॉय यांचा एक विशेष व्हिडिओ संदेश देखील सादर केला जाईल. ESA, JAXA, CNES आणि फ्रेंच संशोधन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अंतराळ शरीरक्रियाशास्त्र, जैवअभियांत्रिकी आणि अंतराळ-आधारित तंत्रज्ञानाच्या मानवतावादी वापरावर आधारित सत्रांमध्ये आपले विचार व्यक्त करतील.
बेंगरुळु इथली राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळा (CSIR–NAL) ही या कार्यक्रमासाठी मुख्य संयोजक संस्था आहे.
या उपक्रमाद्वारे, वैज्ञानिक संस्थांमध्ये दृढ संशोधन संबंध प्रस्थापित करण्याचा सीएसआयर आणि इस्रो यांचा मानस आहे. तसेच, अंतराळ औषधविज्ञान, मानवी घटक अभियांत्रिकी आणि समाजाच्या फायद्यासाठी उपयोजित तंत्रज्ञान यांमध्ये नवनिर्मितीला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या परिषदेतील चर्चेतून भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी एक सहयोगी पथदर्शी आराखडा तयार होण्याची आणि अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानातील संयुक्त संशोधन आणि विकासासाठी नवीन मार्ग शोधले जाण्याची अपेक्षा आहे.
सीएसआयआर- इस्रो अंतराळ परिषद 2025' हे भारतातील वैज्ञानिक नवनिर्मिती, तांत्रिक आत्मनिर्भरता आणि अंतराळ संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहकार्याला पुढे नेणारे एक मोठे पाऊल आहे. हे 'विकसित भारत @2047' चे ध्येय साध्य करण्याच्या देशाच्या व्यापक वचनबद्धतेचेही प्रतिबिंब आहे, जिथे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान जागतिक प्रगतीत परिवर्तनकारी भूमिका निभावणार आहे.
***
सोनाली काकडे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190181)
Visitor Counter : 8