रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे मंडळाकडून रेल्वे कचऱ्याचे पद्धतशीर व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी विभागीय रेल्वेंना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी


मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रवासाच्या मार्गावरील निर्धारित स्थानकांवर ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिस आणि पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांद्वारे रेल्वे कचऱ्याचे पद्धतशीर संकलन आणि सुरक्षित विल्हेवाट लावण्यावर दिला भर

Posted On: 13 NOV 2025 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 नोव्हेंबर 2025

 

रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना प्रवासादरम्यान कचऱ्याचे पद्धतशीर व्यवस्थापन आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. स्वच्छता वाढवणे आणि प्रवाशांना अधिक आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे, हे या निर्देशांचे उद्दिष्ट आहे.

या सूचनांमध्ये नियोजनबद्ध प्रणालीवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार ऑन-बोर्ड (गाडीतून प्रवास करणारे) हाऊसकीपिंग सर्व्हिस (ओबीएचएस) आणि पॅन्ट्री कार (खानपान सेवा) कर्मचाऱ्यांनी गाडीच्या प्रवासी डब्यांमधून कचरा गोळा करणे आणि वाटेत निर्धारित स्थानकांवर सीलबंद पिशव्यांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. ही प्रणाली गाडीच्या आतील भाग आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा या दोन्हीची स्वच्छता राखण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

नव्या आदेशांमध्ये गाडीतील सेवा कर्मचाऱ्यांच्या आतिथ्यशीलता आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा देण्याच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे. गाडीचे डबे आणि शौचालयांमध्ये स्वच्छ आणि कचरामुक्त वातावरण सुनिश्चित करून, हे कर्मचारी प्रवाशांना आराम आणि सुरक्षा देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. रेल्वे मंडळाने असे निर्देश दिले आहेत की, प्रामुख्याने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या आघाडीच्या कर्मचाऱ्यांना, विभागीय रेल्वेने पुरेसे प्रशिक्षण देऊन सुसज्ज करावे, जेणेकरून ते ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडतील, आणि त्यामधून आपला सेवा भाव दर्शवतील.

या प्रोटोकॉलची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे बोर्डाने संबंधित कर्मचाऱ्यांशी  त्वरित आणि व्यापक ‘संवाद’ साधण्याचा उपक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. हा जाणीव-जागृती कार्यक्रम रेल्वेच्या सर्व परिमंडळांमधील व्यावसायिक आणि यांत्रिक विभागांचे वरिष्ठ पर्यवेक्षक आणि अधिकारी संयुक्तपणे राबवतील. कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधणे, स्वच्छ भारत मिशन मधील त्यांच्या भूमिकेचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्या कामकाजाबाबतच्या  कोणत्याही अडचणी समजून घेणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. या 'संवाद' सत्रांमध्ये गाडीतील कर्मचाऱ्यांना कचरा व्यवस्थापनाच्या पद्धती स्पष्टपणे समजाव्यात, यासाठी सविस्तर सूचना देणारे व्हिडिओ दाखवले जातील, आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रेल्वे आणि स्थानके स्वच्छ ठेवण्याची त्यांची जबाबदारी अधिक बळकट केली जाईल. प्रत्येक गाडीसाठी निर्धारित स्थानकांवर गाडीतील कचरा आणि खानपानाशी संबंधित कचरा हाताळण्याबाबतच्या सूचनांविषयी कर्मचाऱ्यांना माहिती दिली जाईल.

ही सत्रे ओबीएचएस व पॅन्ट्री कर्मचाऱ्यांकडून सक्रिय आणि जबाबदार वर्तणुकीची गरज अधोरेखित करतील, तसेच कचरा व्यवस्थापनाच्या वेळी त्यांच्या समोर येणाऱ्या व्यवहार्य अडचणींचाही विचार करण्यात येईल. विभागांना मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आणि मुख्य यांत्रिक अभियंता यांना झोन स्तरावर आपले 

अभिप्राय सादर करावे लागतील. त्यानंतर पीसीसीएम हे अभिप्राय एकत्र करून पर्यटन आणि केटरिंग संचालक, रेल्वे बोर्ड यांच्या कार्यालयात या उपक्रमाच्या पूर्णतेनंतर 10 दिवसांच्या आत एकत्रित अहवाल सादर करतील.

हा सर्वसमावेशक उपक्रम एका महिन्याच्या आत पूर्ण होणार असून, सर्व गाड्यांना यात समावेश करण्यात येईल. या प्रक्रियेनंतर विभागांकडील अभिप्राय झोन स्तरावर संकलित करून रेल्वे बोर्डाकडे परीक्षणासाठी पाठवले जातील. मंडळाच्या पत्रव्यवहारात काटेकोर अंमलबजावणी यंत्रणेलाही अधोरेखित करण्यात आले आहे. ओबीएचएस आणि पॅन्ट्री कार सेवांच्या परवाना धारकांना या मार्गदर्शक तत्त्वांबाबत औपचारिक मार्गदर्शन दिले जाईल. कोणतेही उल्लंघन हे करारातील गंभीर उल्लंघन मानले जाईल आणि पक्षाविरुद्ध करार रद्द करण्याची कारवाई सुरू केली जाईल.

हा उपक्रम जुलै 2024 मध्ये जारी केलेल्या पूर्वीच्या सूचनांवर आधारित आहे, ज्यामध्ये गाडीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक करण्याची प्रणाली आखण्यात आली होती. त्या प्रणालीत कचरा निर्माणाचा अभ्यास  करण्याचे, निश्चित संख्येने कचरा पिशव्या ठरवलेल्या स्थानकांवर टाकण्याचे आणि ही माहिती केंद्रित व्यवस्थापन प्रणाली मध्ये नोंदविण्याचे निर्देश समाविष्ट होते, ज्यामुळे प्रभावी देखरेख शक्य होईल. ‘संवाद’ या माध्यमातून मानवी दृष्टीकोन राखत, कठोर नियम पालनाची जोड देऊन, भारतीय रेल्वेने ऑन-बोर्ड आतिथ्य, स्वच्छता आणि एकूण प्रवासी अनुभव सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

 

* * *

शैलेश पाटील/राज दळेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189878) Visitor Counter : 9
Read this release in: English , Urdu