आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत परिचारिका शिक्षण आणि त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावर सल्लामसलत आणि अनुभव सामायिक करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन


परिचारिका आणि सुईणी या भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत आणि सर्वात महत्वाच्या आधारस्तंभांपैकी एक आहेत: केंद्रीय आरोग्य सचिव

भारतातील दर्जेदार आरोग्यसेवेचे श्रेय त्यांच्या परिचारक कर्मचाऱ्यांचे सामर्थ्य आणि वचनबद्धता याकडे जाते: नीति आयोग सदस्य,व्ही.के. पॉल

जागतिक स्तरावर परिचारक कार्यबल म्हणून भारत जगातील सर्वात मोठ्या योगदानकर्त्यांपैकी एक असा उदयास येत आहे: भारतातील जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी

Posted On: 12 NOV 2025 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्हेंबर 2025

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि झपिएगो यांच्या सहकार्याने, परिचारिका आणि सुईणी (मिडवाइफरी) क्षेत्रातील धोरणात्मक  संवाद मजबूत करण्यासाठी आणि या क्षेत्रातील सुधारणांना चालना देण्यासाठी; भारतातील नर्सिंग धोरणाची प्राधान्ये आणि सर्वोत्तम पद्धती याविषयावर तीन दिवसांची राष्ट्रीय परीषद आणि अनुभव सामायिकरण कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेत या क्षेत्रातील देशभरातील धोरणकर्ते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, नियामक सदस्य, नर्सिंग क्षेत्रातील शिक्षक, व्यावसायिक संघटना आणि विकासातील सहयोगी यांच्यासह प्रमुख भागधारकांना एकत्र आले  होते. भारताच्या आरोग्य क्षेत्रातील प्राधान्यक्रम आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे (SDGs) यांच्याशी नर्सिंग प्रशासन, शिक्षण आणि कार्यबल व्यवस्थापन सुसंगतपणे मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेणे, उदयोन्मुख आव्हाने ओळखणे आणि नाविन्यपूर्ण प्रारुप सामायिक करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते.

परिचारिका आणि सुईणी या भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत आणि सर्वात महत्वाच्या आधारस्तंभांपैकी एक आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. त्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर आणि आशा कार्यकर्त्या या , सार्वत्रिकपणे आरोग्याचा प्रसार (UHC) साध्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात,हे अधोरेखित केले.

या क्षेत्रात भारतातील अलिकडच्या सुधारणा, ज्यामध्ये राष्ट्रीय परिचारक आणि सुईणी आयोग(नर्सिंग आणि मिडवाइफरी कमिशन, एनएनएमसी) याची स्थापना, क्षमता-आधारित अभ्यासक्रमाचा अवलंब आणि नियामक चौकटींचे आधुनिकीकरण करण्याचे उपक्रम यांचा समावेश असून हे नर्सिंग परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे टप्पे आहेत, असे अधोरेखित केले प्रत्येक राज्यातून उदयास येणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींचा  राष्ट्रीय धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना म्हणून उपयोग व्हावा यासाठी या कार्यशाळेदरम्यान काम केले जाईल आणि देशभरातील नर्सिंग क्षेत्राचे व्यापक प्रारुप आणि सुधारणा करण्यासाठ इतर राज्यांनी या प्रारुपांची  नोंद घ्यावी, असे नमूद केले.

या प्रसंगी बोलताना, नीति आयोगाचे आरोग्य सदस्य प्राध्यापक व्ही.के. पॉल यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेचे या महत्त्वाच्या संवाद परिषदेचे  आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. भारताची आरोग्य व्यवस्था जागतिक स्तरावर दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ओळखली जाते, ही त्यांच्या नर्सिंग कर्मचाऱ्यांचे सामर्थ्य आणि समर्पण यामुळेच आहे. नर्सिंग हा भारताच्या व्यापक आरोग्यसेवेचा कणा आहे,याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

हे  एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे,असे परिचारिकांच्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करताना, डॉ. पॉल यांनी नमूद केले.  त्यांनी नर्सिंग शिक्षणात सुधारणांची गरज असल्याचे अधोरेखित केली आणि उच्च दर्जाची सेवा आणि व्यावसायिक उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण आणि कौशल्य वाढीवर अधिक भर देण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी बोलताना, भारतातील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधी डॉ. पेडेन यांनी नर्सिंग आणि मिडवाइफरी क्षेत्रात देशाने केलेल्या  महत्त्वपूर्ण प्रगतीची प्रशंसा केली.जागतिक नर्सिंग कर्मचार्‍यांत  भारत हा  जगातील सर्वात मोठे योगदान देणारा देश म्हणून उदयास आला आहे, यावर त्यांनी भर दिला. 2030 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाई प्रदेशात परिचारिकांच्या  संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही निरीक्षण डॉ. पेडेन यांनी नोंदवले. भारताने हाती घेतलेल्या प्रगतीकारक आणि धोरणात्मक उपक्रमांमुळे हे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

सहभागींनी न्याय्य कार्यबल वितरण, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये गुणवत्ता हमी, नेतृत्व विकास आणि नर्सिंग व्यावसायिकांसाठी करिअर प्रगतीच्या संधी यासारख्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांवर चर्चा केली. त्यांनी जागतिक नर्सिंग 2025 अहवालातील निष्कर्षांशी राष्ट्रीय नर्सिंग धोरणांचे संरेखन करण्याच्या महत्त्वावर आणि क्षमता-निर्मिती आणि सर्वोत्तम पद्धतींना पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा लाभ घेण्यावर  भर द्यावा, असे सांगितले.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत तांत्रिक सत्रे, गट चर्चा आणि नर्सिंग शिक्षण, कार्यबल नियोजन आणि डिजिटल शिक्षणातील नवकल्पना दर्शविणारऱ्या राज्य सादरीकरणे होतील.संपूर्ण भारतभर एक बहुविध, कुशल आणि सक्षम नर्सिंग कार्यबल सुनिश्चित करण्यासाठी विविध राज्यांमध्ये पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मिती आणि परस्पर शिक्षणाला चालना देणे हे या चर्चासत्राचे उद्दिष्ट आहे.

"जगातील नर्सिंगची सद्यस्थिती" हा अहवाल जागतिक नर्सिंग कार्यबलाचा कल आणि प्राधान्यांचा व्यापक आढावा घेणारा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेला आहे.अधिक माहितीसाठी, हा अहवाल पुढील संकेतस्थळावर येथे पाहता येईल: 

https://www.who.int/publications/i/item/9789240110236

 

* * *

हर्षल आकुडे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189164) Visitor Counter : 14