युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये सहाय्यक प्रशिक्षक पदासाठी ऐतिहासिक भर्ती प्रक्रिया अभियानाची केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची घोषणा
येत्या काळात भारताच्या क्रीडा महत्वाकांक्षा पुढे नेण्यात ही धोरणात्मक भर्ती महत्त्वाची भूमिका बजावेल : डॉ मांडविया
प्रविष्टि तिथि:
10 NOV 2025 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025
केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (SAI)सहाय्यक प्रशिक्षक (स्तर-06, 7वा वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स) या पदासाठी ऐतिहासिक भर्ती मोहिमेला मंजुरी दिली आहे. 2017 नंतरची ही पहिलीच व्यापक भर्ती मोहीम असून त्यामुळे भारतीय क्रीडाक्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या पदासाठी सर्वात मोठी भर्ती प्रक्रिया सुरु होणार आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या निर्णयाची घोषणा केली.
निष्पक्ष, पारदर्शक आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी व्यापक निवड प्रक्रियेद्वारे देशातल्या सर्वोत्तम प्रतिभावंत प्रशिक्षकांना पारखून त्यांची निवड केली जाणार आहे. येत्या काही वर्षांमध्ये भारताच्या क्रीडा महत्वाकांक्षा पुढे नेण्यात ही धोरणात्मक भर्ती महत्त्वाची भूमिका बजावेल, असे डॉ मांडविया यांनी सांगितले.
थेट भर्तीद्वारे 25 हून अधिक क्रीडा प्रकारांमधील 320 हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ही भर्ती प्रक्रिया केंद्र सरकारच्या ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीच्या पदक धोरणांशी सुसंगत असेल आणि यामध्ये जलतरण, सायकलिंग आणि अशा उच्च पदक शक्यतांच्या इतर क्रीडा प्रकारांवर विशेष भर दिला जाणार आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर क्रीडा संस्कृतीला चालना देणाऱ्या आणि देशातील सर्वांगीण क्रीडा परिसंस्थेला आकार देणाऱ्या खेळांवर देखील विशेष भर दिला जाईल. याशिवाय टेनिस, कयाकिंग आणि कॅनोइंग, अशा या आधी दुर्लक्षित राहिलेल्या खेळांचे वाढते महत्त्व आणि क्षमता ओळखून या क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षकांची भरती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत
स्त्री-पुरुष समानतेच्या सरकारच्या वचनबद्धतेनुसार, 50 टक्क्यांहून अधिक पदे महिला प्रशिक्षकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनविण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत मजबूत, सर्वसमावेशक आणि कामगिरीवर आधारित प्रशिक्षक परिसंस्थेच्या उभारणीसाठी मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना हा उपक्रम अधोरेखित करतो.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2188574)
आगंतुक पटल : 27