वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या 101 व्या बैठकीत प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन


एनपीजी द्वारे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तसेच रेल्वे मंत्रालय  यांच्या प्रकल्पांचे मूल्यांकन

Posted On: 07 NOV 2025 4:41PM by PIB Mumbai

 

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी आज नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) 101 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या (पीएमजीएस एनएमपी) अनुषंगाने नागरिकासांठी विविध साधनांनी संपर्क सुविधा व्यवस्था  मजबूत करणे आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता सुधारणे यावर चर्चेचा भर होता.

एनपीजीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ते/महामार्ग आणि रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे प्रकल्पांचे मूल्यांकन हे पीएम गतीशक्तीच्या एकात्मिक बहुआयामी पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक केंद्रांची शेवटच्या घटकापर्यंतची कनेक्टिव्हिटी आणि 'संपूर्ण सरकार' दृष्टिकोन या तत्त्वांच्या अनुरूपतेसाठी केले. या उपक्रमांमुळे वाहतूक यंत्रणेची  कार्यक्षमता वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रकल्पाच्या संबंधित सर्व क्षेत्रांना महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक फायदे मिळतील अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पांचे मूल्यांकन आणि अपेक्षित परिणाम पुढीलप्रमाणे:

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच)

1. घोटी ते पालघर (महाराष्ट्र) पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग-160 अ चे पुनर्वसन आणि दर्जा सुधारणा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) घोटी ते पालघर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 160 अ (एनएच-160 अ) चे पुनर्वसन आणि दर्जा सुधारणा प्रस्तावित केली आहे, जो महाराष्ट्र राज्यातील एकूण 154.635 किलोमीटर लांबीचा आहे. राष्ट्रीय महामार्ग-160 अ कॉरिडॉर नाशिक आणि लगतच्या एमआयडीसी क्षेत्रांना (अंबड आणि सातपूर) पश्चिम किनारी बंदरांशी जोडणारा एक धोरणात्मक पर्यायी मालवाहतूक मार्ग म्हणून काम करतो, ज्यामुळे नाशिक शहरातून जाणाऱ्या विद्यमान मार्गांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल. प्रस्तावित सुधारणांमुळे कार्यक्षम बंदर प्रवेश सक्षम होईल, शहरी कॉरिडॉरमध्ये गर्दी कमी होऊन औद्योगिक आणि व्यावसायिक वाहतुकीसाठी मालवाहतूक गतिशीलता वाढेल. हा प्रकल्प जवळची रेल्वे स्थानके (नाशिक, पालघर आणि डहाणू रेल्वे मार्ग) आणि राष्ट्रीय महामार्ग-60, राष्ट्रीय महामार्ग-48 आणि राष्ट्रीय महामार्ग-848 या प्रमुख महामार्गांशी जोडणी सुधारून इंटरमॉडल कनेक्टिव्हिटी देखील मजबूत करेल, ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी सुधारेल.

NH-160A च्या सुधारणांमुळे अनेक फायदे मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यात पुढील बाबी समाविष्ट आहेत:

· उच्च-क्षमतेच्या पर्यायी मालवाहतूक कॉरिडॉरचा विकास, नाशिकच्या औद्योगिक केंद्रांना पश्चिम बंदरे आणि पालघरमधील बाजारपेठांशी जोडणे.

· नाशिक मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क आणि इतर बंदराकडे जाणाऱ्या आर्थिक कॉरिडॉरमध्ये सुधारित प्रवेश.

· नाशवंत वस्तूंची जलद वाहतूक, शीत-साखळी आणि कृषी मूल्य साखळींना समर्थन देणे.

· त्र्यंबक, जव्हार, मनोर आणि पालघर सारख्या प्रादेशिक केंद्रांमध्ये पर्यटन आणि एमएसएमई वाढीला चालना.

एकंदरीत, हा प्रकल्प प्रादेशिक लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवेल, औद्योगिक

स्पर्धात्मकता सुधारेल आणि उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात संतुलित सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल, त्याच वेळी प्रमुख व्यापार आणि बंदर केंद्रांशी कनेक्टिव्हिटी मजबूत करेल.

ii. हिवरखेडी ते बसिंदा-रोशनी (बैतुल-खंडवा) पर्यंत पेव्हड शोल्डरसह दुपदरी विकास

आशापूर ते रुधी (बैतुल खांडवा) (मध्य प्रदेश) या पेव्हड शोल्डरसह 2/4 पदरी विकास

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मध्य प्रदेशात हिवरखेडी ते बसिंदा-रोशनी हा माल वाहतुकीसाठीचा दुपदरी मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच देशगांव ते जुलवानिया या सध्याच्या दुपदरी मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्तावही सादर केला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या बाजूने आपत्कालिन रस्त्यांचीही सोय असेल. या रस्त्यांची एकूण लांबी सुमारे 300 किलोमीटर असेल. या प्रकल्पामुळे रस्त्यांचे धोरणात्मक जाळे निर्माण होऊन अंतर्गत संपर्कव्यवस्था बळकट होईल आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या राज्यांमधील राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शहरांसोबतही हा प्रदेश जोडला जाईल. यामुळे राजस्थानमधील उदयपूर, झालावाड गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, भडोच, महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, औरंगाबाद, अमरावती, अकोला आणि मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जैन, भोपाळ, खांडवा या मोठ्या शहरांसोबतची संपर्कव्यवस्था सुधारेल.

या मार्गिकेमुळे नागपूर ते वडोदरा दरम्यान कमी लांबीचा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. परिणामी मध्य आणि पश्चिम भारतातील माल वाहतूक व प्रवासी वाहतूक अधिक कार्यक्षम होईल.   

रेल्वे मंत्रालय

iii) गम्हारिया ते चंडील (झारखंड) दरम्यान तिसरा आणि चौथा रेलमार्ग

झारखंडमधील गम्हारिया ते चंडिल दरम्यान एकंदर 56 किलोमीर लांबीचा तिसरा व चौथा रेल्वेमार्ग बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने सादर केला आहे.

iv) सैंथिया पाकूर ( पश्चिम बंगाल आणि  झारखंड) चौथा रेलमार्ग

रेल्वे मंत्रालयाने पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यांमधील सैंथिया आणि पाकुर या गावांना जोडणाऱ्या सुमारे 81.20 किलोमीटर लांबीच्या रेलमार्गाचा प्रस्ताव सादर केला आहे.

***

सुवर्णा बेडेकर/वासंती जोशी/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187490) Visitor Counter : 8