वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारत-युरोपिअन युनियन मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीना गती, वाटाघाटींसाठी युरोपिअन युनियनचे पथक नवी दिल्लीत दाखल
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                03 NOV 2025 10:40PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2025
प्रस्तावित भारत-युरोपिअन युनियन मुक्त व्यापार करार (एफटीए) वर भारतीय समकक्षांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी युरोपियन युनियनचे एक वरिष्ठ पथक 3 ते 7 नोव्हेंबर 2025  दरम्यान नवी दिल्लीत आहे. प्रमुख प्रलंबित मुद्द्यांचे निराकरण करणे आणि उभय पक्षांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या संतुलित आणि न्याय्य चौकटीच्या दिशेने करार पुढे नेणे हे या चर्चेचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पियुष गोयल यांनी ब्रुसेल्सच्या अधिकृत भेटीत  (27–28 ऑक्टोबर 2025) युरोपियन व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश सेफकोविच यांच्याशी भविष्यवेधी चर्चा केली होती, त्यानंतर हे पथक भारतात दाखल झाले आहे.या चर्चा दोन्ही बाजूंच्या सहभागाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक व्यापार करार सुलभ करण्याप्रति  वचनबद्धतेला दुजोरा देतात.
या आठवड्यात होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये वस्तूंचा व्यापार, सेवा व्यापार, उत्पत्तीचे नियम आणि इतर तांत्रिक आणि संस्थात्मक बाबींसह प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. भारत आणि युरोपियन युनियनचे प्राधान्यक्रम आणि संवेदनशीलता प्रतिबिंबित करणाऱ्या आधुनिक, मजबूत आणि भविष्यासाठी तयार मुक्त व्यापार कराराच्या सामायिक दृष्टिकोनाच्या  आधारे चर्चा केली जाते.
3 नोव्हेंबर 2025 रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युरोपियन युनियनचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश सेफकोविच आणि कृषी आणि अन्न आयुक्त क्रिस्टोफ हॅन्सन यांच्यातील आभासी  बैठकीमुळे वाटाघाटींना वेग आला.
या भेटीचा एक भाग म्हणून, युरोपियन आयोगातील (ईयू डीजी ट्रेड)  व्यापार महासंचालक  सबाइन वेयंड  5–6  नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत भारताचे वाणिज्य सचिव  राजेश अग्रवाल यांच्याशी प्रमुख तांत्रिक आणि धोरणात्मक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा करतील.
युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाच्या भेटीमधून भारत आणि युरोपियन युनियनचा व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष आणि शाश्वत विकासाला चालना देऊन एक निष्पक्ष आणि संतुलित करार करण्याचा संयुक्त निर्धार अधोरेखित होतो.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2186112)
                Visitor Counter : 15