युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हॉकीला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भव्य शताब्दी सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची घोषणा

Posted On: 03 NOV 2025 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2025

भारतीय हॉकीला 100 वर्षे (1925–2025) पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भव्य शताब्दी सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केली. हा शताब्दी सोहळा हॉकी इंडियाच्या सहकार्याने आयोजित केला जाणार आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर हा सोहळा होईल. याला समांतरपणेच देशभरातील 550 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्येही यानिमीत्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

या सोहळ्याच्या निमीत्ताने भारताच्या समृद्ध हॉकी वारशाच्या शंभर वर्षांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या खेळाच्या माध्यमातून देशाला गौरवाचे स्थान मिळवून देणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचा सत्कारही या सोहळ्याच्या निमित्ताने केला जाणार आहे, त्यासोबतच लाखो लोकांना प्रेरणा देणाऱ्या या खेळाच्या अमिट उत्साहाचा सोहळाही साजरा केला जाईल. यानिमित्ताने नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य सोहळ्याला सकाळी 8:30 वाजता प्रारंभ होईल. यावेळी भारतीय हॉकीच्या गौरवशाली वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अनेक विशेष कार्यक्रमांचेही सादरीकरण होणार आहे. 

भारतील हॉकीला 100 वर्षे पूर्ण होत असताना, या सोहळ्याच्या निमित्ताने आपण एक शतकाचा अभिमान, चिकाटी आणि राष्ट्रीय गौरवाचा सन्मान करत असल्याचे डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे देशाला सन्मान मिळवून देणाऱ्या आपल्या नायकांचे स्मरण करण्याची आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासातून प्रेरणा घेत, भविष्याच्या दिशेने पुढे वाटचाल करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. हॉकी हा भारतासाठी केवळ एक खेळ नाही, तर तो आपल्या अस्मितेचा आणि सामूहिक भावनेचा भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे. यानिमीत्ताने देशभरातील 550 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाणाऱ्या सोहळ्यांतून, आपल्या वारशाचे ठळकपणे दर्शन होईल, आणि त्यासोबतच भारतीय हॉकीची गाथाही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल, आणि यातून युवा मुले आणि मुलींना हॉकीची स्टिक हाती घेऊन तडफेने खेळण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यानिमित्ताने केंद्रीय मंत्री एकादश आणि हॉकी इंडियाचा मिश्र एकादश  संघ (पुरुष आणि महिला) यांच्यात 30 मिनिटांच्या प्रदर्शनीय सामनाही होणार आहे. भारताच्या पुरुष आणि महिलांच्या राष्ट्रीय संघांतील उत्कृष्ट खेळाडूचा सहभाग असलेल्या या सामन्यातून देशातील लिंगभाव समानता, सांघिक वृत्ती आणि समावेशकतेचे ठळक दर्शन घडणार आहे. यानंतर हॉकी या खेळातील विविध पिढ्यांमधील दिग्गज व्यक्तिमत्वांचा सत्कार केला जाणार आहे. याद्वारे आठ ऑलिम्पिक सुवर्णपदकांसह  जगातील सर्वात यशस्वी हॉकी राष्ट्र म्हणून भारताला स्थान मिळवून देण्यात या सर्वांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे.

केंद्र सरकार अधिकाधिक गुंतवणूक, क्रीडा विषयक आधुनिक पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातून भारताच्या क्रीडा परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी दृढनिश्चयाने काम करत असल्याचेही मांडविया यांनी सांगितले. 2036 पर्यंत भारताला जगातील सर्वात श्रेष्ठ क्रीडा राष्ट्रांपैकी एक बनवणे आणि प्रत्येक क्रीडा प्रकारात सातत्याने सर्वोत्तम दर्जाच्या कामगिरीची नोंद करणे हेच सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

या शताब्दी सोहळ्यादरम्यान  100 Years of Indian Hockey या अधिकृत स्मरणिका खंडाचे प्रकाशनही केले जाणार आहे. या प्रकाशनातून, या खेळाची अद्वितीय वाटचाल, विजय, आव्हाने आणि पुन्हा घेतलेली भरारी याचा कालक्रमानुसारचा तपशील सर्वांसमोर मांडला जाईल. हे प्रकाशन एक ऐतिहासिक दस्तऐवज तसेच भारताच्या हॉकी वारशाला आकार देणाऱ्या खेळाडूंच्या पिढ्यांचा गौरव करणारे प्रकाशन ठरणार आहे.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2186111) Visitor Counter : 9