पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दुसरी भारत-कॅरिकॉम शिखर परिषद

Posted On: 21 NOV 2024 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 नोव्‍हेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रेनेडाचे पंतप्रधान तसेच सध्याचे कॅरिकॉम अध्यक्ष डिकन मिशेल यांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी जॉर्जटाऊन येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांचे पंतप्रधानांनी आभार मानले. पहिली भारत-कॅरिकॉम शिखर परिषद 2019 मध्ये न्यू यॉर्क शहरात आयोजित करण्यात आली होती. गयानाचे अध्यक्ष आणि ग्रेनेडाचे पंतप्रधान यांच्या व्यतिरिक्त, शिखर परिषदेला खालील व्यक्ती उपस्थित होत्या:

(i) डोमिनिकाचे अध्यक्ष  सिल्व्हानी बर्टन आणि डोमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट;

(ii) सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिकापरसाद संतोखी;

(iii) त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. कीथ रॉली;

 (iv) बार्बाडोसचे पंतप्रधान मिया अमोर मोटली;

(v) अँटिग्वा आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन;

(vi) ग्रेनाडाचे पंतप्रधान डिकन मिशेल;

(vii) बहामासचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री फिलिप एडवर्ड डेव्हिस, के.सी.

(viii) सेंट लुसियाचे पंतप्रधान फिलिप जे. पियरे

(ix) सेंट व्हिन्सेंटचे पंतप्रधान राल्फ एव्हरार्ड गोन्साल्विस

(x) बहामासचे पंतप्रधान फिलिप एडवर्ड डेव्हिस

(xi) बेलीजचे परराष्ट्र मंत्री फ्रान्सिस फोन्सेका

(xii) जमैकाचे परराष्ट्र मंत्री कामिना स्मिथ

(xiii) सेंट किट्स आणि नेव्हिसचे परराष्ट्र मंत्री डॉ. डेन्झिल डग्लस

2. कॅरिकॉम समुदायाबाबत दृढ एकात्मता व्यक्त करताना, पंतप्रधानांनी या प्रदेशात ‘बेरिल’ चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशाबद्दल सहानुभूती व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या संघर्षांमुळे आणि आव्हानांमुळे “ग्लोबल साऊथ” देशांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे नमूद करत, भारत कॅरिकॉम देशांचा विश्वासार्ह भागीदार म्हणून त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे, हे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. कॅरिकॉम देशांच्या गरजा आणि प्राधान्यांवर भारताचा विकास सहकार्याचा आधार पंतप्रधानांनी भर दिला.

3. भारताची जवळची विकास भागीदारी आणि या प्रदेशाशी असलेले लोकांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी, पंतप्रधानांनी कॅरिकॉम देशांना सात प्रमुख क्षेत्रांमध्ये मदत देऊ केली. ही क्षेत्रे कॅरिकॉम या संक्षिप्त रूपाशी जुळतात आणि भारत आणि गट यांच्यातील मैत्रीचे घनिष्ठ बंध वाढवतात. ते आहेत:

  • C: क्षमता बांधणी
  • A: शेती आणि अन्न सुरक्षा
  • D: नवीकरणीय ऊर्जा आणि हवामान बदल
  • I: नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि व्यापार
  • C: क्रिकेट आणि संस्कृती
  • O: महासागर अर्थव्यवस्था आणि सागरी सुरक्षा
  • M: औषध आणि आरोग्यसेवा

4. क्षमता निर्माण क्षेत्रात, पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत CARICOM देशांसाठी आणखी 1,000 आयटीईसी प्रशिक्षण केंद्रांची घोषणा केली. अन्न सुरक्षा या देशांसाठी एक महत्त्वाचे आव्हान असलेल्या क्षेत्रात, त्यांनी ड्रोन, डिजिटल शेती, शेती यांत्रिकीकरण आणि माती परीक्षण या कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा भारताचा अनुभव सामायिक केला. कॅरिबियनमध्ये पर्यटन क्षेत्रासाठी “सार्गॅसम समुद्री शैवाल” हा एक मोठा अडथळा असल्याचे नमूद करून, पंतप्रधानांनी सांगितले की हे समुद्री शैवाल खतामध्ये रूपांतरित करण्यासाठी भारत सहकार्य करण्यास तयार आहे.

5. नवी ऊर्जा आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारत आणि CARICOM मधील सहकार्य वाढवण्याचे आवाहन करत, पंतप्रधानांनी सदस्य देशांना भारताच्या पुढाकाराखालील जागतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले — जसे की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA), आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी (CDRI), “Mission LiFE” आणि “ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स.”

6. भारतातील नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि व्यापारामुळे होणाऱ्या परिवर्तनात्मक बदलांबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी सार्वजनिक सेवा वितरण वाढविण्यासाठी कॅरिकॉममधील देशांना भारताचे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्लाउड-आधारित डिजी लॉकर आणि यूपीआय मॉडेल्स ऑफर केले.

7. कॅरिकॉम आणि भारतामध्ये घनिष्ठ सांस्कृतिक आणि क्रिकेट संबंध आहेत. पंतप्रधानांनी प्रत्येक CARICOM देशातील 11 युवा महिला क्रिकेटपटूंना भारतात प्रशिक्षण देण्याची घोषणा केली. तसेच, पुढील वर्षी सदस्य देशांमध्ये “भारतीय संस्कृती दिन” आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला, जेणेकरून लोकांमधील संबंध अधिक दृढ होतील.

8. महासागर अर्थव्यवस्था आणि सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी सांगितले की भारत कॅरिबियन समुद्रातील सागरी क्षेत्र नकाशांकन आणि जलमापन (Hydrography) क्षेत्रात CARICOM सदस्य देशांसोबत काम करण्यास तयार आहे.

9. गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेमध्ये भारताने मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी “जन औषधी केंद्रांद्वारे” सर्वसामान्यांना परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्याचा भारताचा अनुभव सामायिक केला. त्यांनी CARICOM देशांमध्ये योगतज्ञ पाठवून “ई-हेल्थ” आणि लोकांच्या आरोग्य कल्याणासाठी मदत करण्याची घोषणाही केली.

10. कॅरिकॉम नेत्यांनी भारत आणि कॅरिकॉममधील भागीदारी मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांच्या सात कलमी योजनेचे स्वागत केले. त्यांनी ग्लोबल साउथच्या भारताच्या नेतृत्वाचे आणि लहान बेट विकसनशील राज्यांसाठी हवामान न्यायासाठी दिलेल्या मजबूत पाठिंब्याचे कौतुक केले. त्यांनी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले आणि या संदर्भात भारतासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे अधोरेखित केले.

11. पुढील भारत-कॅरिकॉम शिखर परिषद भारतात आयोजित केली जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी अध्यक्ष इरफान अली, पंतप्रधान डिकन मिशेल आणि कॅरिकॉम सचिवालयाचे आभार मानले.

 12. उद्घाटन आणि समारोप सत्रात पंतप्रधानांचे भाषण खालील लिंक्सवर पाहता येईल:

दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेतील उद्घाटन भाषणे

दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेतील समारोप भाषणे

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2186092) Visitor Counter : 10