अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई विमानतळावर 47 कोटी रूपये किमतीचा कोकेन साठा जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

Posted On: 01 NOV 2025 10:15AM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीसंदर्भात कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्रीलंकेच्या कोलंबोहून आलेल्या एका महिला प्रवाशाकडून 4.7 किलो कोकेन जप्त केले. अवैध बाजारात त्याची किंमत सुमारे 47 कोटी रुपये इतकी आहे.

प्राप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर या महिलेची तपासणी केली. सामानाची पाहणी केल्यानंतर कॉफीच्या पॅकेट्समध्ये लपवलेल्या पांढऱ्या भुकटीसारख्या पदार्थाचे नऊ पुडे आढळले. एनडीपीएस फील्ड किटने तपास केल्यानंतर तो पदार्थ कोकेन असल्याची पुष्टी झाली.

तातडीने कारवाई करत डीआरआयने आणखी चार जणांना अटक केलीत्यापैकी एक विमानतळावर कोकेन घेण्यासाठी आला होता, तर उर्वरित तिघे वित्तपुरवठा, वाहतूक आणि वितरण जाळ्याशी संबंधित असल्याचे आढळले. सर्व पाच आरोपींना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अधिनियम, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या अलीकडच्या कारवायांमधून, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व्यापार जाळे भारतीय महिलांचा कुरियरम्हणून गैरवापर करत असल्याचे, आणि तपास टाळण्यासाठी अन्नपदार्थ व दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये अंमली पदार्थ लपवत असल्याचे दिसून येते आहे.

या तस्करीच्या प्रयत्नामागील मोठा आंतरराष्ट्रीय गैरव्यापार उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे. डीआरआय अशा जाळ्याचा नायनाट करण्याच्या मोहिमेवर ठाम असून, अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीला छेद देत भारतातील युवा पिढी, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करून नशामुक्त भारतया उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहे.

***

माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185187) Visitor Counter : 18