पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले
आर्य समाजाचा 150 वा वर्धापनदिन हा केवळ एका विशिष्ट समुदायासाठी किंवा पंथासाठी महत्वाचा सोहळा नसून, तो संपूर्ण देशाच्या वैदिक अस्मितेशी खोलवर जोडलेला उत्सव आहे : पंतप्रधान
आर्य समाजाने निर्भयपणे भारतीयत्वाचे मूल्य जपले आणि त्याचा पुरस्कार केला: पंतप्रधान
स्वामी दयानंद हे एक द्रष्टे, महान पुरुष होते: पंतप्रधान
भारत आज शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा जगातील आघाडीचा देश म्हणून उदयाला आला आहे : पंतप्रधान
Posted On:
31 OCT 2025 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.
गुजरातमध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानी गेल्या वर्षी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये आपण व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून सहभागी झालो होतो, असे मोदी म्हणाले. त्याआधी त्यांना दिल्लीत महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले होते. त्यांनी सांगितले की वैदिक मंत्रोच्चार आणि पवित्र हवन विधींची ऊर्जा अजूनही कालच घडल्यासारखी ताजी वाटत आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की मागील कार्यक्रमादरम्यान, सर्व सहभागींनी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी समारंभाला 'विचार यज्ञ' म्हणून दोन वर्षे सुरू ठेवण्याचा संकल्प केला होता. ही अखंड बौद्धिक साधना पूर्ण काळ सुरू राहिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या काळात हाती घेण्यात आलेले उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती नियमितपणे आपल्याला देण्यात आल्याचे मोदी यांनी नमूद केले. आर्य समाजाच्या 150 व्या स्थापना वर्ष सोहळ्यात आज पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या चरणी आदरांजली वाहिली. त्यांनी या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगाच्या स्मृती प्रीत्यर्थ नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असे त्यांनी नमूद केले.
“आर्य समाजाचा 150 वा वर्धापनदिन हा केवळ एका विशिष्ट समुदायासाठी किंवा पंथाशी संबंधित महत्वाचा सोहळा नसून, तो संपूर्ण देशाच्या वैदिक अस्मितेशी खोलवर जोडलेला उत्सव आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. तो भारतीय तत्त्वज्ञान परंपरेशी जोडलेला असून, यामध्ये गंगेच्या प्रवाहाप्रमाणेच आत्म-शुद्धीचे सामर्थ्य असल्याचे ते म्हणाले. आर्य समाजाने सातत्याने पुढे नेलेल्या सामाजिक सुधारणांच्या महान वारशामध्ये हा प्रसंग खोलवर रुजला आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. या चळवळीने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना वैचारिक बळ दिले असे त्यांनी नमूद केले. आर्य समाजापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या अनेक क्रांतिकारकांपैकी लाला लजपत राय आणि हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांचे उदाहरण त्यांनी दिले. राजकीय कारणांमुळे, स्वातंत्र्य चळवळीतील आर्य समाजाच्या महत्वाच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने योग्य ती मान्यता मिळाली नाही याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला.
आर्य समाज ही स्थापनेपासूनच कट्टर देशभक्तांची संस्था राहिली आहे, यावर भर देत मोदी म्हणाले, “आर्य समाजाने निर्भयपणे भारतीयत्वाचे मूल्य जपले आणि त्याचा पुरस्कार केला.” भारतविरोधी विचारसरणी असो, परकीय सिद्धांत लादण्याचे प्रयत्न असोत, फुटीरतावादी मानसिकता असो किंवा सांस्कृतिक जडणघडण दूषित करण्याचे प्रयत्न असोत, आर्य समाज नेहमीच त्याला आव्हान देण्यासाठी उभा राहिला आहे. आर्य समाज आपले 150 वे वर्ष साजरे करत असताना, समाज आणि देश दोघेही दयानंद सरस्वती यांच्या महान आदर्शांना एवढ्या भव्य आणि अर्थपूर्ण पद्धतीने अभिवादन करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
धार्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या स्वामी श्रद्धानंद यांच्यासारख्या आर्य समाजातील अनेक विद्वानांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणाले की, या ऐतिहासिक क्षणामध्ये अशा महान आत्म्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद भरून राहिला आहे. व्यासपीठावरून त्यांनी अशा असंख्य थोर व्यक्तींना वंदन केले आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
पंतप्रधान म्हणाले की, भारत हा देश अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे, येथील भूमी, येथील नागरी संस्कृती आणि येथील वैदिक परंपरा युगानुयुगे शाश्वत राहिल्या आहेत.जेव्हा जेव्हा नवी आव्हाने उभी ठाकतात आणि काळ नवे प्रश्न मांडतो तेव्हा एखादे महान व्यक्तिमत्व त्यावरील उत्तरांसह प्रकट होते यावर त्यांनी भर दिला. एखादा ऋषी, महर्षी अथवा ज्ञानी माणूस नेहमीच समाजाला मार्ग दाखवण्यासाठी पुढे येतो याचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की स्वामी दयानंद सरस्वतीजी हे या महान परंपरेतील असेच एक महर्षी होते. स्वामी दयानंद सरस्वतीजी यांचा जन्म वसाहतवादी अधीनतेच्या त्या काळात झाला, जेव्हा शतकानुशतकांच्या गुलामीने देशाला आणि समाजाला विस्कळीत करून टाकले होते. चिंतन आणि मनन यांची जागा अंधश्रद्धा आणि सामाजिक दुष्टतांनी घेतली होती आणि वसाहतवादी राजवटीचे समर्थन करण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीय परंपरा आणि श्रद्धांचे अवमूल्यन केले होते. अशा परिस्थितीत समाजाने नव्या, अस्सल संकल्पना मांडण्याचे धैर्य गमावले होते.
अशा बिकट काळात, एक तरुण तपस्वी उदयाला आला. हिमालयातील दुर्गम आणि कठोर वातावरणात तीव्र अध्यात्मिक साधना करून कठोर तपश्चर्येद्वारे त्याने स्वतःची परीक्षा घेतली होती.हिमालयातून परतल्यानंतर त्यांनी हीनतेच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय समाजाला खडबडून जागे केले. संपूर्ण ब्रिटीश सत्ता भारतीयांच्या व्यक्तित्वाला कमी लेखण्यात गुंतली होती आणि सामाजिक मूल्ये तसेच नैतिकता यांच्या घसरणीला आधुनिकीकरणाचे नाव दिले जात होते तेव्हा या आत्मविश्वासू साधूने त्याच्या समाजाला हाक दिली – “वेदांकडे वळा!” वसाहतवादी सत्तेच्या काळात दबलेल्या राष्ट्रीय जाणीवेला पुन्हा जाग आणणारे उल्लेखनीय व्यक्तिमत्व अशा शब्दांत पंतप्रधानांनी स्वामी दयानंदजी यांचे वर्णन केले.
भारताला प्रगती करण्यासाठी केवळ वसाहतवादी सत्तेच्या बेड्या तोडून टाकणे पुरेसे नाही तर भारतीय समाजाला बांधलेल्या बेड्या देखील तोडणे गरजेचे आहे हे स्वामी दयानंद सरस्वतीजींनी कसे समजून घेतले हे मोदी यांनी अधिक भर देऊन सांगितले.स्वामी दयानंद सरस्वतीजी यांनी जाती-आधारित भेदभाव आणि अस्पृश्यता नाकारली हे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी निरक्षरतेविरोधात मोहीम सुरु केली आणि वेद तसेच धर्मग्रंथांच्या अर्थांचे विकृतीकरण आणि सरमिसळ करणाऱ्यांना आव्हान दिले.त्यांनी परदेशी कहाण्यांचा विरोध केला आणि शास्त्रार्थाच्या पारंपरिक पद्धतीद्वारे सत्य समोर आणले. व्यक्तिगत आणि सामाजिक विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका ओळखणारे आणि महिलांना घराच्या चौकटीत बंदिस्त करणाऱ्या मानसिकतेला आव्हान देणारे एक द्रष्टे संत अशा शब्दांत पंतप्रधानांनी स्वामी दयानंद जी यांचे वर्णन केले. स्वामीजींच्या प्रेरणेने, आर्य समाजाच्या शाळांनी मुलींना शिक्षित करण्याची सुरुवात केली आणि जालंदर येथे सुरु झालेल्या मुलींच्या शाळेचे रुपांतर लवकरच संपूर्णपणे सुसज्ज अशा महिला महाविद्यालयात झाले. आर्य समाजाच्या अशा संस्थांतून शिक्षण घेतलेल्या लाखो कन्या आता देशाचा पाया मजबूत करत आहेत हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीची नोंद घेत दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्क्वाड्रन लीडर शिवांगी सिंह यांच्या सह राफेल लढाऊ जेट विमानातून भरारी घेण्याची घटना अधोरेखित केली. पंतप्रधान म्हणाले की आज भारताच्या लेकी लढाऊ जेट विमाने उडवत आहेत तसेच “ड्रोन दीदीं”च्या रुपात आधुनिक कृषी क्षेत्राला चालना देखील देत आहेत. भारतात आता जगातील सर्वाधिक संख्येने महिला स्टेम पदवीधर आहेत हे त्यांनी अभिमानाने नमूद केले.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिला अधिकाधिक प्रमाणात नेतृत्वाची भूमिका घेत आहेत याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. भारतातील प्रमुख संशोधन संस्थांमधील महिला वैज्ञानिक मंगळयान, चंद्रयान आणि गगनयान यांसारख्या अवकाश मोहिमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत हे सांगण्यावर मोदी यांनी भर दिला.आपला देश योग्य मार्गाने प्रगती करत आहे आणि स्वामी दयानंद जी यांची स्वप्ने साकार करत आहे हेच या परिवर्तनकरी घडामोडींतून दिसून येते असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की ते नेहमीच स्वामी दयानंद सरस्वती यांच्या एका विशिष्ट विचाराचे चिंतन करतात आणि अनेकदा इतरांनाही तो विचार सांगतात. स्वामीजी म्हणाले होते, “जी व्यक्ती कमीतकमी गोष्टींचा वापर करते आणि अधिकाधिक योगदान देते तीच खरी परिपक्व व्यक्ती होय.” पंतप्रधान म्हणाले की या थोडक्या शब्दांमध्ये इतके मोठे शहाणपण सामावले आहे की त्यावर आधारित एखादे संपूर्ण पुस्तक लिहिले जाऊ शकेल. एखाद्या कल्पनेची खरी ताकद केवळ तिच्या अर्थामध्ये नसते तर ती कल्पना किती काळ टिकते आणि किती जणांच्या आयुष्यांमध्ये ती परिवर्तन घडवून आणते यामध्ये आहे यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, आपण जेव्हा या निकषावर महर्षी दयानंदजींचे विचार तोलून बघतो आणि आर्य समाजाचे समर्पित अनुयायी पाहतो तेव्हा हे स्पष्ट होते की काळानुसार स्वामीजींच्या संकल्पना अधिक तेजस्वी झाल्या आहेत.
स्वामी दयानंद सरस्वतीजींनी त्यांच्या जीवनकाळात परोपकारिणी सभेची स्थापना केली याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, स्वामीजींनी लावलेल्या बीजाचा आज अनेक शाखा असलेला प्रचंड वृक्ष झाला आहे आणि त्यात गुरुकुल कांगडी , गुरुकुल कुरुक्षेत्र, डीएव्ही तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा समावेश असून या सर्व संस्था त्यांच्या त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये सातत्याने अथकपणे कार्य करत आहेत. जेव्हा देशावर एखादे संकट आले तेव्हा आर्य समाजाच्या सदस्यांनी निःस्वार्थपणे इतर नागरिकांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, फाळणीच्या भयानक काळात सर्व काही गमावून भारतात आलेल्या निर्वासितांना मदत करण्यात, त्यांचे पुनर्वसन करण्यात आणि त्यांना शिक्षित करण्यात आर्य समाजाने महत्त्वाची भूमिका निभावली असून त्यांचे हे योगदान इतिहासात उत्तमरीत्या नोंदले गेले आहे. नैसर्गिक आपत्तींच्या काळात पीडितांची सेवा करण्यात आर्य समाज नेहमीच आघाडीवर राहिला आहे याचा देखील त्यांनी पुढे उल्लेख केला.
भारतातील गुरुकुल परंपरेचे जतन करण्यात आर्य समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, एकेकाळी भारत आपल्या गुरुकुलांच्या ताकदीमुळे ज्ञान आणि विज्ञान क्षेत्रामध्ये शिखरावर होता. वसाहतवादी राजवटीत, या व्यवस्थेवर जाणीवपूर्वक हल्ले करण्यात आले, ज्यामुळे ज्ञानाचा नाश केला जावू लागला, मूल्यांची झीज झाली आणि नवीन पिढी कमकुवत बनली. त्यावेळी आर्य समाज पुढे सरसावून कोसळणाऱ्या गुरुकुल परंपरेला वाचवण्यासाठी उभा राहिला, असे ते म्हणाले. आर्य समाजाने केवळ या परंपरेचे जतन केले नाही तर, आधुनिक शिक्षणाशी तिचे एकत्रीकरण करून कालांतराने परंपरेला सक्षम बनवले, असे पंतप्रधानांनी सांगितले. आज ज्यावेळी देश राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे शिक्षणाला मूल्ये आणि चारित्र्यनिर्मितीशी जोडत आहे त्यावेळी भारताच्या या पवित्र ज्ञान परंपरेचे रक्षण केल्याबद्दल ते आर्य समाजाचे आभार आपण मानत असल्याचे, पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी वेदातील “कृण्वन्तो विश्वम् आर्यम्” हे प्रसिद्ध वचन उद्धृत केले. ज्याचा अर्थ “संपूर्ण विश्वाला श्रेष्ठत्वाकडे आणि उदात्त विचारांकडे नेऊया”, असा असून स्वामी दयानंद सरस्वती यांनी हेच वचन आर्य समाजाचे मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आणि आता हेच वचन भारताच्या विकास प्रवासाचा पायाभूत मंत्र आहे - जिथे भारताच्या प्रगतीचा मार्ग जागतिक कल्याणाशी जोडलेला आहे आणि भारताचे समृद्ध भविष्य संपूर्ण मानवतेसाठी उपकारक ठरत आहे, असे त्यांनी सांगितले. आज भारत शाश्वत विकासाच्या क्षेत्रात एक अग्रगण्य जागतिक आवाज बनला आहे. वेदांकडे परत जाण्याच्या स्वामीजींच्या आवाहनाशी समांतरता साधत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, भारत आता जागतिक व्यासपीठावर वैदिक आदर्शाचा आणि जीवनशैलीचा पुरस्कार करत आहे. त्यांनी ‘मिशन लाईफ’ चा उल्लेख करून, त्याला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले. "एक सूर्य, एक विश्व , एक ग्रिड" या दृष्टिकोनातून भारत स्वच्छ ऊर्जेचे जागतिक चळवळीत रूपांतर करत आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग आज 190 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे, ज्यामुळे योगिक जीवनशैली आणि पर्यावरणीय जागरूकतेला चालना मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘मिशन लाईफ’ सारखे जागतिक उपक्रम, जे आता जगभरात लोकप्रिय होत आहेत, ते आर्य समाजाच्या सदस्यांच्या शिस्तबद्ध जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, असेही ते पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आर्य समाजाच्या सदस्यांचे साधे राहणीमान, सेवा-केंद्रित मूल्ये, पारंपरिक भारतीय पोशाखाला प्राधान्य, पर्यावरणीय जागरूकता आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचारासाठी त्यांनी दिलेले योगदान याची प्रशंसा केली. भारत ज्यावेळी "सर्वे भवन्तु सुखिनः" या आदर्शाने जागतिक कल्याणाच्या मार्गाने वाटचाल करत आहे आणि विश्वबंधुत्वाचा भाव बळकट करत आहे, त्यावेळी आर्य समाजाचा प्रत्येक सदस्य स्वाभाविकतेने या अभियानाशी एकरूप होत आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आर्य समाजाच्या योगदानाचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक केले.
स्वामी दयानंद सरस्वतीजी यांनी प्रज्वलित केलेली ज्ञानाची मशाल गेल्या 150 वर्षांपासून आर्य समाजाच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन करत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वामीजींनी आपल्या सर्वांमध्ये नवीन विचार पुढे नेण्याची आणि प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या कठोर परंपरा मोडून काढण्याच्या जबाबदारीची भावना जागृत केली. आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला मिळालेले प्रेम आणि पाठबळ अनमोल आहे असे पंतप्रधान म्हणाले. आपण केवळ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीच नव्हे तर काही गोष्टींबाबत विनंती करण्यासाठी देखील आलो आहोत, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
आर्य समाजाने राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नात आधीच मोठे योगदान दिले आहे , याचा पुनरूच्चार पंतप्रधानांनी केला. यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या सध्याच्या काही प्राधान्यक्रमांना अधोरेखित केले. पंतप्रधानांनी स्वदेशी आंदोलनाचा उल्लेख केला आणि सांगितले की, आर्य समाजाचा या आंदोलनाशी ऐतिहासिक संबंध आहे. आज देश पुन्हा एकदा स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याची आणि स्थानिकांसाठी आवाज उठवण्याची जबाबदारी स्वीकारत असताना, या मोहिमेत देखील आर्य समाजाची भूमिका महत्त्वाची ठरते, असे पंतप्रधान म्हणाले.
भारतातील प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि जतन करण्याच्या उद्देशाने अलिकडेच सुरू झालेल्या ज्ञान भारतम् अभियानाची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी यावर भर दिला की, ज्यावेळी तरुण पिढी या अभियानाशी जोडली जाईल आणि त्याचे महत्त्व समजून घेईल त्याचवेळी ज्ञानाचा हा विशाल संग्रह खऱ्या अर्थाने संरक्षित केला जाऊ शकतो. गेल्या 150 वर्षांपासून, आर्य समाज भारताच्या पवित्र प्राचीन ग्रंथांचा शोध आणि जतन करण्यात गुंतलेला आहे हे लक्षात आणून देताना पंतप्रधान मोदी यांनी आर्य समाजाला या मोहिमेत सक्रियतेने सहभागी होण्याचे आवाहन केले. या धर्मग्रंथांची मौलिकता टिकवून ठेवण्यासाठी आर्य समाजाच्या सदस्यांच्या अनेक -पिढ्यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ज्ञान भारतम अभियान आता आर्य समाजाच्या या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर नेईल, असे ते म्हणाले. आर्य समाजाने या अभियानाला स्वतःची मोहीम मानावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आर्य समाजाने आपल्या गुरुकुलांद्वारे आणि संस्थांद्वारे हस्तलिखितांच्या अभ्यासात आणि संशोधनात तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी दयानंद यांच्या 200 व्या जयंती निमित्त यज्ञात वापरण्यात येणाऱ्या धान्याबद्दल आणि “श्री अन्न” या पारंपरिक धान्यांची पवित्रता तसेच त्यांच्या प्रचाराच्या आवश्यकतेवर भर दिला. या धान्यांची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ती नैसर्गिकपणे पिकवली जाणारी असून नैसर्गिक शेती पूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ होती, ज्याचे महत्त्व आता जग पुन्हा ओळखू लागले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आर्य समाजाला नैसर्गिक शेतीच्या आर्थिक आणि आध्यात्मिक पैलूंविषयी जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले.
पाण्याच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘जल जीवन मिशन’द्वारे प्रत्येक गावात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे अभियान केंद्र राबवत आहे, ही एक वैश्विक मोहीम आहे, मात्र या यंत्रणेतून पुरेसे पाणी भविष्यासाठी राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिले जात असून, 60,000 हून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे. आर्य समाजाने या सरकारी प्रयत्नांना सक्रिय पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. काळाच्या ओघात प्रत्येक गावात असलेली पारंपरिक तळी, तलाव, विहीर, बारव यांची स्थिती खराब झाल्याने, असे जलाशय कोरडे पडले आहेत, त्यांचे जतन करणे केवळ लोकजागृतीनेच शक्य आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीचा उल्लेख करत ही फक्त अल्पकालीन नाही, तर दीर्घकालीन चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. आर्य समाजाच्या सदस्यांनी या उपक्रमात शक्य तितक्या लोकांना जोडावे असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी वेदातील "संगच्छध्वं संवादध्वं सं वो मनांसि जानताम्" या श्लोकाचा उल्लेख करून आपण सर्वांनी एकत्र चालावे, एकत्र बोलावे, एकमेकांचे विचार समजून घ्यावेत, तसेच त्यांचा आदर करावा, असे करण्यास शिकवले जाते, असे पंतप्रधान म्हणाले. हे वैदिक वाचन राष्ट्रीय आवाहन समजावे आणि प्रत्येकाने राष्ट्राच्या संकल्पांना स्वतःचे मानून सामूहिक प्रयत्नांना पुढे न्यावे, असे त्यांनी सांगितले. आर्य समाजाने हे मूल्य गेल्या 150 वर्षांत जपले असून, त्याला आणखी बळकटी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. महर्षी दयानंद सरस्वतींचे विचार मानवी कल्याणाचा मार्ग उजळवत राहतील, असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि सर्वांना आर्य समाजाच्या 150 वर्षपूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.
गुजरात आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी :
आंतरराष्ट्रीय आर्य शिखर परिषद 2025 हा कार्यक्रम महर्षी दयानंद सरस्वतींच्या 200 व्या जयंती आणि आर्य समाजाच्या समाजसेवेच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ ज्ञान ज्योती महोत्सवाचा एक भाग आहे. या शिखर परिषदेत भारतासह परदेशातील आर्य समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामुळे महार्षी दयानंद यांच्या सुधारणवादी विचारांचे सार्वत्रिक महत्त्व आणि आर्य समाजाचा जागतिक विस्तार अधोरेखित करण्यात येत आहेत. 150 सुवर्ण वर्षांचा सन्मान या प्रदर्शनात आर्य समाजाची शैक्षणिक, सामाजिक सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती यामधील यशस्वी वाटचाल दाखवली जात आहे. याचा उद्देश महर्षी दयानंद सरस्वती यांचा सुधारक आणि शैक्षणिक वारशाचा सन्मान करणे, आर्य समाजाच्या राष्ट्रनिर्मितीतील 150 वर्षांच्या योगदानाचे पूजन करणे आणि वेद, स्वदेशी मूल्ये, तसेच ‘विकसित भारत 2047’ च्या उद्दिष्टाशी सुसंगत जागतिक सजगता घडवणे आहे.
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184885)
Visitor Counter : 7