पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोकशाही शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी चित्रफितीद्वारे केलेल्या भाषणाचा मजकूर

प्रविष्टि तिथि: 20 MAR 2024 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2024

 

महनीय जन हो 

नमस्कार!

हा उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल मी अध्यक्ष यून सुक येओल यांचे आभार मानतो. ''समिट फॉर डेमोक्रसी'' (लोकशाहीसाठी शिखर परिषद)हे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे, जिथे लोकशाही असलेले देश एकमेकांच्या अनुभवांचे आदानप्रदान करतात आणि शिकतात.

महनीय जन हो 

आतापासून काही थोड्याच आठवड्यांत, संपूर्ण जग भारतातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचे साक्षीदार होईल. सुमारे एक अब्ज मतदार यावेळी मतदान करतील अशी अपेक्षा असल्याने, मानवजातीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निवडणूक उपक्रम असेल. भारतातील लोक पुन्हा एकदा लोकशाहीवरील आपला दृढ विश्वास व्यक्त करतील. भारताला लोकशाहीची एक प्राचीन आणि अखंड परंपरा आहे. ती भारतीय संस्कृतीची जीवनधाराच आहे. भारताच्या इतिहासात एकमत निर्माण करणे,  खुला संवाद आणि मुक्त चर्चा यांचे प्रतिध्वनी यातून उमटले आहेत. म्हणूनच माझे सहकारी जन भारताला लोकशाहीची जननी मानतात.

महनीय जन हो

गेल्या दशकात, भारताने "सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास" हा  मंत्र जपत पुढे वाटचाल केली आहे - म्हणजेच समावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्न. समाजातील सर्व घटकांपर्यंत, विशेषतः गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचणे याच खऱ्या अर्थाने समावेशकतेच्या भावनेला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. आम्ही कृतीशीलता आधारित प्रशासनाकडे वळलो आहोत,जिथे कमतरता, भ्रष्टाचार आणि भेदभावाची जागा पारदर्शकता, जबाबदारी आणि संधी यांनी घेतली आहे. या प्रयत्नांमध्ये, तंत्रज्ञानाने एक सक्षम सहाय्यकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील भारताच्या जलद प्रगतीने सार्वजनिक सेवा वितरणात क्रांती घडवून आणली आहे आणि आर्थिक समावेशन वाढवले आहे. युवा आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीवर स्वार होऊन, भारत  सर्वात मोठ्या स्टार्टअप इको-सिस्टममध्ये,जगात तिसऱ्या क्रमांकावर आला असून वेगाने विकसित झाला आहे. महिला नेतृत्वा अंतर्गत  विकास करणे  तळागाळातील 1.4 दशलक्षाहून अधिक निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी आमच्या महिलानेतृत्वाअंतर्गत विकास या परिवर्तनाच्या प्रतिनिधी आहेत.

महनीय जन हो,

आज, भारत केवळ आपल्या 1.4 अब्ज लोकांच्या आकांक्षा पूर्ण करत नाही तर जगाला असा दिलासा  देत आहे, की लोकशाही मदत करते आणि लोकशाही सक्षम करते. जेव्हा भारतीय संसदेने महिला लोकप्रतिनिधींसाठी किमान एक तृतीयांश जागा सुनिश्चित करण्यासाठी कायदा मंजूर केला तेव्हा त्याने जगातील सर्व लोकशाही  देशांतील महिलांना दिलासा दिला.  गेल्या 10 वर्षांत भारताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले तेव्हा या  सकारात्मक बदलाचा प्रतिनिधी म्हणून लोकशाहीवरील जगाचा विश्वास दृढ झाला. जेव्हा भारताने 150 हून अधिक देशांमध्ये कोविड औषधे आणि लस पोहोचवल्या तेव्हा त्याने लोकशाहीची उपचार शक्ती  प्रतिबिंबित केली. जेव्हा भारताने चंद्रावर यशस्वीरित्या चंद्रयान उतरवले तेव्हा तो केवळ भारतासाठी अभिमानाचा क्षण नव्हता, तर तो लोकशाहीचा विजय होता. जेव्हा भारताने जी-20 अध्यक्षपदाच्या काळात जगाचा दक्षिणेकडील आवाज उंचावला तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात सल्लामसलत करून निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आता, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याने, जगभरातील लाखो लोकांचे भविष्य उज्ज्वल होईल,अशी आशा निर्माण झाली आहे.2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प करत असताना, लोकशाही आकांक्षा बाळगू शकते, प्रेरणा देऊ शकते आणि अनेक गोष्टी साध्य करू शकते हे यातून दिसून येते.

अस्थिरता आणि संक्रमणाच्या काळात, लोकशाहीसमोर अनेक आव्हाने आहेत. यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे.लोकशाही देशांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि संस्था अधिक समावेशक, लोकशाहीवादी, सहयोग पूर्ण आणि निष्पक्ष बनवण्याच्या दृष्टीने होणाऱ्या प्रयत्नांचे नेतृत्व केले पाहिजे.अशा सामायिक प्रयत्नांद्वारेच आपण आपल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करू शकू. आणि, आपण पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध भविष्याचा पाया देखील रचू. या प्रयत्नात भारत सर्व सहलोकशाहीदेशांसोबत आपला अनुभव सामायिक करण्यास तयार आहे.

धन्यवाद.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2184021) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam