आयुष मंत्रालय
जागतिक ‘स्ट्रोक’ दिन 2025: आयुष मंत्रालयाने ‘स्ट्रोक’ व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्य मार्ग केले अधोरेखित
प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसन पद्धतींच्या माध्यमातून आयुष प्रणाली पारंपरिक ‘स्ट्रोक’ उपचारांना पूरक ठरू शकतात: केंद्रीय आयुष मंत्री
Posted On:
29 OCT 2025 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2025
भारतात मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या स्ट्रोक - ज्याला ‘ब्रेन अटॅक’ असेही म्हटले जाते (यामध्ये मेंदूच्या एखाद्या भागामधील रक्तप्रवाह खंडीत झाल्यामुळे तेथील पेशी निकामी होतात आणि काही अवयवांना काम करणे अवघड जात असल्यामुळे उद्भवलेली स्थिती) या आजाराच्या व्यवस्थापनात सर्वसमावेशक, प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसन उपचार प्रदान करण्यात आयुष प्रणालींची भूमिका आयुष मंत्रालयाने अधोरेखित केली आहे. आयुष प्रणाली स्ट्रोक व्यवस्थापनात सर्वसमावेशक आरोग्य दृष्टिकोनावर भर देत शरीरातील संतुलन राखणे, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि दीर्घकाळ आरोग्य राखण्याला पाठबळ देण्यावर लक्ष केंद्रित करून पारंपरिक वैद्यकीय उपचारांना पूरक ठरतात.
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली की, "स्ट्रोकच्या वाढत्या आव्हानामुळे सर्वसमावेशक आणि एकात्मिक आरोग्य धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवते. प्रतिबंधात्मक काळजी आणि दीर्घकालीन पुनर्वसनावर भर देणाऱ्या आयुष प्रणाली पारंपारिक स्ट्रोक व्यवस्थापनाला मोठ्या प्रमाणावर पूरक ठरू शकतात. आयुष मंत्रालय पुराव्यांवर आधारित पारंपरिक आरोग्यसेवा प्रोत्साहित करण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यामुळे जीवनमान सुधारेल आण स्ट्रोकमुळे होणारा त्रास कमी होईल. मजबूत संशोधन सहकार्य आणि जनजागृती निर्माण करण्यावर आमचा भर आहे, ज्यामुळे स्ट्रोकच्या घटना कमी करण्यात आणि शाश्वत आरोग्य मार्गांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल."
“आयुष प्रणाली एकत्रितपणे स्ट्रोकसारख्या मेंदूतील जटिल विकारांना समजून घेण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक समग्र चौकट प्रदान करते”, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी नमूद केले.
आयुष प्रणाली शरीर, मन आणि पर्यावरण यांच्यातील सुसंवादावर भर देतात. त्यांचे प्रतिबंधात्मक तत्वज्ञान आणि सर्वसमावेशक उपचारात्मक पद्धती केवळ आजार व्यवस्थापनावरच नव्हे तर प्रतिकारशक्ती वाढवणे, पुनरावृत्ती टाळणे आणि एकूणच जीवनमान सुधारणे यावर देखील लक्ष केंद्रित करतात. या प्रणाली एकत्रितपणे एकात्मिक दृष्टिकोनांना प्रोत्साहन देतात ज्यामुळे स्ट्रोकसारख्या असंसर्गजन्य रोगांचा भार कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
आयुर्वेदात, स्ट्रोक हा वातदोषातील असंतुलनामुळे उद्भवणारा न्यूरोलॉजिकल विकार मानला जातो, ज्यामुळे शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा अर्धांगवायू (पक्षाघात) होतो. आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून रक्ताभिसरण, मज्जातंतूंचे कार्य आणि एकूणच चैतन्य सुधारण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक, शुद्धीकरण (डिटॉक्सिफायिंग) आणि पुनश्च आरोग्यप्राप्ती यावर भर दिला जातो.
होमिओपॅथी स्ट्रोक व्यवस्थापनात पूरक उपचार पद्धती म्हणून प्रभावी ठरू शकते, विशेषतः मज्जा संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यात हालचालींची पुनर्प्राप्ती करण्यात घडवण्यात आणि स्ट्रोक नंतरचे जीवनमान सुधारण्यात होमिओपॅथी जास्त प्रभावी असल्याचे अभ्यासकांनी सिद्ध केले आहे.
विविध आयुष प्रणाली स्ट्रोकच्या प्रतिबंध, उपचार आणि पुनर्वसनासाठी विशिष्ट आणि पूरक दृष्टिकोन प्रदान करतात, ज्यामुळे उद्देश शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल दोन्ही प्रकारच्या आरोग्याची पुनर्प्राप्ती होऊ शकते, हे आयुष मंत्रालयाने अधोरेखित केले आहे.

* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/श्रध्दा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183909)
Visitor Counter : 7