युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशाची दर रविवारी एकत्रित सायकल स्वारी - व्यायामशाळांपासून सरकारी कार्यालयांपर्यंत, सायकलने आणली तंदुरुस्तीची क्रांती

Posted On: 26 OCT 2025 8:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2025

 

जागतिक अजिंक्यवीर मुष्टियोद्धी  मीनाक्षी हूडा जेव्हा या रविवारी सकाळी लवकर मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर पोहोचल्या, तेव्हा त्यांना शेकडो सायकलस्वार, तंदुरुस्ती प्रेमी आणि कुटुंबे एकत्र सायकल चालवण्यासाठी सज्ज असलेले दिसले. "आज यात सहभागी होऊन मला खूप आनंद झाला," असे त्या म्हणाल्या. "मी मुष्टीयुद्धाच्या  माध्यमातून जशी माझी तंदुरुस्ती जपते, तसेच प्रत्येक महिलेसाठी, विशेषतः गृहिणींसाठी आणि खेळांमध्ये सहभागी होत नसलेल्या मुलींसाठी तंदुरुस्त राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या अनेकदा आपल्या दैनंदिन कामांमध्ये इतक्या व्यग्र असतात की स्वतःला विसरून जातात. तंदुरुस्ती साधीसोपी, आनंददायक आणि प्रत्येकासाठी आहे, याची आठवण ही चळवळ, प्रत्येकाला करून देते." त्यांच्या या शब्दांनी 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल' (तंदुरुस्त भारतासाठी रविवार घालवुया सायकलवर) या उपक्रमाच्या 45 व्या आवृत्तीची जणू नसच पकडली.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या  नेतृत्वाखालील आणि भारतीय सायकलस्वारी महासंघ (सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया-CFI), योगासन भारत आणि MY Bharat यांच्या सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम, 'फिट इंडिया मूव्हमेंट’ या तंदुरुस्त भारत चळवळी अंतर्गत एक प्रमुख सामुदायिक तंदुरुस्ती मोहीम बनला आहे. ही मोहीम, "आधा घंटा रोज – फिटनेस का डोस" (रोज अर्धा तास तंदुरुस्तीची मात्रा) या भावनेचे प्रतीक असून, ती नागरिकांना दररोज 30 मिनिटे शारीरिक आरोग्यासाठी वेळ देण्यास प्रेरित करत आहे.

या रविवारच्या विशेष आवृत्तीत, Cult Fit, Gold’s Gym, Fitness First आणि Fitspire यांसारख्या अग्रगण्य तंदुरुस्ती केंद्रांच्या साखळीने (फिटनेस चेन) सहभाग घेतला होता. यामुळे देशभरातील 50,000 हून अधिक व्यायामशाळांमधून या चळवळीचा संदेश पोहोचता झाला. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षक, व्यायामशाळांचे सदस्य आणि नागरिक, सकाळची सायकलस्वारी, अवयव ताणण्याचे व्यायाम (Stretching) आणि मोकळ्या हवेतील व्यायामासाठी एकत्र आले. यामुळे तंदुरुस्ती ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती सामूहिक आहे, या विचाराला बळ मिळाले.

44 यशस्वी आवृत्त्यांनंतर, 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल' या मोहिमेचा विस्तार आता देशभरातील 1,20,000 हून अधिक ठिकाणी झाला आहे आणि यात 14 लाखाहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182700) Visitor Counter : 16