रेल्वे मंत्रालय
छठ पूजेनंतर प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे सज्ज, सणासुदीनंतर कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांकरता 6,181 विशेष गाड्या
पुढच्या तीन दिवसात 900 विशेष गाड्या, रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त स्वयंचलित तिकीट वितरण यंत्र, प्रवासी आरक्षण व्यवस्था असलेल्या खिडक्या, आणि अनारक्षित तिकीटांसाठी मोबाइल सुविधा केंद्रांसह इतर प्रवासी सुविधांमध्ये वाढ
सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेने आरामदायी प्रवासासाठी विशेष गाड्यांची केलेली सोय आणि व्यवस्थेची प्रवाशांकडून प्रशंसा
Posted On:
24 OCT 2025 5:53PM by PIB Mumbai
देशभरात 12,000 पेक्षा जास्त विशेष गाड्या चालवत भारतीय रेल्वे सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सुलभ आणि आरामदायक प्रवासाची सुनिश्चिती करत आहे. सणासुदीच्या काळात वाढलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, नवी दिल्ली, आनंद विहार टर्मिनल, उधना, पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि इतर प्रमुख स्थानकांवर सर्व प्रवासी सुविधांनी सुसज्ज प्रतीक्षा क्षेत्रही उभारण्यात आली आहेत. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रत्येकजण सुरक्षितपणे घरी पोहोचून आपल्या प्रियजनांसोबत सण साजरा करेल याची सुनिश्चिती करण्यासाठी रेल्वे कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत. सणासुदीच्या काळात वाढलेल्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी येत्या तीन दिवसात देशभरात 900 पेक्षा जास्त विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
यासोबतच छठ पूजेच्या सणानंतर प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायक परतीचा प्रवास करता यावा यासाठीही रेल्वे सज्ज झाली आहे. त्याअनुषंगाने येत्या 28 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत, सणासुदीनंतर कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 6,181 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा याउद्देषाने अतिरिक्त स्वयंचलित तिकीट वितरण यंत्र, प्रवासी आरक्षण व्यवस्था असलेल्या खिडक्या, आणि अनारक्षित तिकीटांसाठी मोबाइल सुविधा केंद्रांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.
या संपूर्ण काळात रेल्वे व्यवस्थेचे कार्यान्वयन सुरळीत राहावे यादृष्टीने सुरक्षा आणि नियमनाकरता रेल्वे सुरक्षा दलाचे जवान पुरेशा संख्येने तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांसाठीचे मदत कक्ष, माहिती केंद्रे, रांगांचे व्यवस्थापन करण्याची व्यवस्था तसेच सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्थाही अधिक मजबूत केल्या गेल्या आहेत. सर्व प्रमुख स्थानकांवर स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि आरोग्यविषयक स्वच्छतेशी संबंधीत सोयी सुविधांची बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. प्रवाशांच्या प्रत्येक आवश्यकतांना तत्क्षणीच प्रतिसाद दिला जाईल, याची सुनिश्चित करण्यासाठी, रेल्वे मंडळे, विभागीय आणि मंडळ स्तरावर चोवीस तास कार्यरत असलेल्या समर्पित वॉर रूमची व्यवस्था केलेली आहे.
भारतीय रेल्वे काटेकोर नियोजन, प्रवासी सेवांमधील सुधारणा तसेच सुविधा तसेच देखभालीला प्राधान्य अशा उपाययोजनांच्या माध्यमातून प्रवाशांना सुरळीत प्रवासाचा अनुभव देण्यासाठी समर्पण भावनेने कार्यरत आहे.
छठ पूजेसाठी कुटुंबासह गुवाहाटीहून बिहारला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विशेष गाड्या चालवल्याबद्दल भारतीय रेल्वेचे आभार मानले आहेत.
आणखी एका प्रवाशाने बादशाहनगर रेल्वे स्थानकावरील सोयीसुविधांची प्रशंसा केली आहे. त्याचप्रमाणे, सिद्धार्थ नगर रेल्वे स्थानकावरील एका प्रवाशाने स्थानकाची स्वच्छता, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि प्रतीक्षालयात उपलब्ध करून दिलेल्या चार्जिंग पोर्ट्ससह इतर आधुनिक सोयीसुविधांची प्रशंसा केली आहे.
भारतीय रेल्वे देखील X या समाजमाध्यमावरील आपल्या अधिकृत खात्यावरून रेल्वे फॅक्ट चेक ही मालिका राबवत असून, त्याद्वारे ऑनलाइन पसरवले जात असलेले खोटे व्हिडीओ आणि दिशाभूल करणारी माहिती उघडकीला आणण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. याअंतर्गत अलिकडेच मुंबईहून बिहारला जात असलेल्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडून मृत्यूमुखी पडल्याची पसरवलेली बातमी खोटी असल्याचे रेल्वेने उघड केले
भारतीय रेल्वे सर्व प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध असून, त्याला अनुसरूनच या सणासुदीच्या काळातही समर्पण भावनेने आणि काळजीने देशाची सेवा करत राहणार आहे.
****
निलिमा चितळे / तुषार पवार / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2182342)
Visitor Counter : 11