पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधतेचे तळागाळातील संवर्धन सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने 1 कोटी 36 लाख रुपयांचा निधी केला जारी 

Posted On: 24 OCT 2025 9:00AM by PIB Mumbai

 

जैवविविधतेचे फायदे, शाश्वत उपयोग आणि संवर्धनाचे समान आणि निष्पक्ष लाभ सर्वांना मिळावेत या दृढ वचनबद्धतेला अनुसरुन राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील स्थानिक समुदायांना याच्या  व्यावसायिक वापराचे फायदे मिळावेत या  हेतूने 1.36 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.

या महत्त्वपूर्ण आर्थिक निधीचे वाटप महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील राज्य जैवविविधता मंडळांमार्फत करण्यात येणार असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी या गावाला  तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी गावाला आणि उत्तर प्रदेशातील  एटा जिल्ह्यातील कासगंज परिसर या तीन जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना हे महत्त्वपूर्ण आर्थिक योगदान दिले जाईल. या प्रत्येक महानगर पालिकेला  45.50 लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या कृतीतून समानता, शाश्वतता आणि संवर्धन या मूल्यांप्रती असलेली सरकारची दृढ वचनबद्धता दिसून येते.

याअंतर्गत जारी केलेला निधी म्हणजे  प्रवेश आणि लाभ वाटप योजनेअंतर्गत दिलेली ठोस भरपाई आहे. ही भरपाई एका व्यावसायिक संस्थेने माती आणि औद्योगिक सांडपाण्याच्या नमुन्यांमधून सूक्ष्मजीव प्राप्त करून फ्रुक्टो-ओलिगोसेकेराइड्स (Fructo-oligosaccharides) उत्पादनासाठी म्हणजे प्रीबायोटिक घटकांच्या निर्मितीसाठी वापरल्यामुळे देण्यात आली आहे. ही रक्कम जैवविविधता कायदा 2002 च्या कलम 44 आणि संबंधित राज्य जैवविविधता नियमांनुसार वर्णन केलेल्या  उपक्रमांसाठी दिली जाते.

ही आर्थिक रणनीती भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे खरे संरक्षक असलेल्या स्थानिक समुदायांना ओळखून त्यांना सन्मानित करण्याच्या दिशेने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण बजावत असलेल्या सक्रिय भूमिकेला अधोरेखित करते. मिळालेले लाभ परत एकदा स्थानिक पातळीवरील समुदायाला हस्तांतरित करुन केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक चौकटीशी सुसंगत भारताचे प्रारूप करण्याची राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाची भूमिका यातून दिसून येते. या माध्यमातून संवर्धन आणि समृद्धी हातात हात घालून बहरतात हे दिसून येते.  ही आर्थिक रणनीती अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता कृती आराखडा NBSAP 2024-2030 मधील राष्ट्रीय जैवविविधता लक्ष्य - 13 देखील पूर्ण करते, जे संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेच्या अधिवेशनाच्या कॉप15 मध्ये स्वीकारलेल्या कुनमिंग मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता फ्रेमवर्कशी सुसंगत आहे.

***

नेहा कुलकर्णी / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182038) Visitor Counter : 26