वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जिनेव्हामधील युएनसीटीएडीच्या 16व्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधिमंडळाचे केले नेतृत्व

Posted On: 22 OCT 2025 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद (युएनसीटीएडी)च्या 16व्या अधिवेशनात भारताचे राष्ट्रीय विधान मांडले आणि महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये भाग घेतला. 1964 मध्ये स्थापन झालेली युएनसीटीएडी संघटना व्यापार, गुंतवणूक आणि शाश्वत विकास धोरणांद्वारे विकसनशील देशांना जागतिक अर्थव्यवस्थेत सामावून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावित आहे.

गोयल यांनी आपल्या भाषणात भारताचा जगातील प्रमुख पाच अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याचा प्रवास मांडला. मागील तीन वर्षांत 7 टक्क्यांहून अधिक सरासरी वार्षिक वाढीसह भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. भारताने आठ वर्षांत आपली अर्थव्यवस्था दुप्पट केली आहे . गेल्या दशकात लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात भारत यशस्वी ठरला आहे, असे गोयल यांनी सांगितले.

गोयल यांनी भारताच्या शाश्वततेतील नेतृत्वावर भर दिला. भारताच्या अर्ध्या वीज क्षमतेचा स्त्रोत नवीकरणीय ऊर्जा आहे. देशाची स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता 250 गिगावॅट आहे आणि 2030 पर्यंत ती 500 गिगावॅटपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. भारत हवामान बदलाच्या परिणामांशी लढण्यासाठी उपाययोजना करत आहे. भारतात जगातील लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या राहते, तरीही भारताचा जागतिक उत्सर्जनात फक्त 3.5% वाटा आहे. विकसित देशांनी पॅरिस करारातील 100 अब्ज डॉलर्सच्या स्वस्त व दीर्घकालीन वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या वचनांची पूर्तता केलेली नाही.

शाश्वत विकासासाठी समर्पित, कृतीशील उपायांची गरज गोयल यांनी अधोरेखित केली. जागतिक पातळीवरील भारताने पुढाकार घेतलेल्या योजनांमध्ये आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पायाभूत सुविधा आघाडी, आंतरराष्ट्रीय सौर संघटना आणि जागतिक जैवइंधन आघाडी यांचा समावेश आहे. भारत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा वापरून तंत्रज्ञानातील दरी भरून काढत आहे. देशात एक अब्ज इंटरनेट वापरकर्ते आहेत आणि जगात चॅटजीपीटी वापरणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाचे सरासरी वय 28.5 वर्षे असून तरुण लोकसंख्या भारताची ताकद आहे. लोकशाही आणि कायद्याचे राज्य हे भारताच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत.

गोयल यांनी भारतातील समावेशक विकासाचे उदाहरण दिले – महिलांचे 14% उद्योजकांमध्ये प्रतिनिधित्व आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कोट्यवधी रोजगार निर्माण करतात. सेवा क्षेत्राचा जीडीपीमध्ये 55% हिस्सा आहे. या क्षेत्राने गेल्या दशकभरात दुपटीने निर्यात वाढविली आहे. यामुळे कार्यबळाच्या हालचालींना चालना मिळाली असून जागतिक स्पर्धेत भागीदारी वाढत आहे.

यूएनसीटीएडी व्यापाराच्या माध्यमातून समतोल, समावेशक आणि शाश्वत विकास साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे सांगून गोयल यांनी तंत्रज्ञान, सहकार्य आणि मजबूत पुरवठा साखळी उभारण्यासाठी भारताकडून विकसनशील देशांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

ही भेट यूएनसीटीएडी 16 च्या “भविष्याला आकार - समावेशी, संतुलित आणि शाश्वत विकासासाठी आर्थिक बदल" या संकल्पनेशी सुसंगत राहून जागतिक व्यापार आणि विकासासाठी भारताचा विश्वासार्ह भागीदार म्हणून असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली. गोयल यांचा सहभाग सर्व राष्ट्रांसाठी परस्पर समृद्धी, सहनशीलता आणि समावेशक वाढीस प्रोत्साहनाची ग्वाही देणारा ठरला. 

 

* * *

सुषमा काणे/रेश्‍मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2181669) Visitor Counter : 11