विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-एनआयएससीपीआर’ने आरोग्यासाठी एक सर्वसमावेशक दृष्टिकोन म्हणून आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 10 वा आयुर्वेद दिन केला साजरा
Posted On:
21 OCT 2025 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (CSIR-NIScPR) ने 17 ऑक्टोबर 2025 रोजी 10 वा आयुर्वेद दिन साजरा केला. शाश्वतता आणि नैसर्गिक जीवनशैलीवर आधारित आरोग्य आणि कल्याणासाठी एक सर्वसमावेशक दृष्टिकोन म्हणून आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा होता. समाजाला वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित पारंपारिक ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘स्वस्तिक’ #SVASTIK (वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित सामाजिक पारंपारिक ज्ञान) राष्ट्रीय उपक्रमांतर्गत एनआयएससीपीआर’ - स्वस्तिक व्याख्यान तसेच सीएसआयआर-एनआयएससीपीआर’ कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात आला.
नवी दिल्ली येथील सीसीआरएएस-केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेतील (CARI) डॉ. किशोर पटेल यांनी या कार्यक्रमात मुख्य व्याख्यान दिले. त्यांनी आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांबाबत मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी जीवनशैली आणि ताणतणावाशी संबंधित आजारांच्या कारणांवरही चर्चा केली. सर्वांगीण आरोग्य साध्य करण्यासाठी आचार रसायन आणि सद्वृत्त या संकल्पनांद्वारे संतुलित पोषण, सजग आहार सेवन आणि नैतिक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
सीएसआयआर-एनआयएससीपीआरचे मुख्य वैज्ञानिक डॉ. नरेश कुमार यांनी आयुर्वेदाच्या उल्लेखनीय जागतिक विस्तारावर प्रकाश टाकला. एका दशकापेक्षा कमी कालावधीत आयुर्वेद दिन या राष्ट्रीय उपक्रमाचे जागतिक आरोग्य चळवळीत रूपांतर झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. आयुर्वेदिक चिकित्सक आणि संशोधकांनी चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्याची आणि भेसळ रोखण्याची, प्रमाणित सूत्रीकरण, पुराव्यावर आधारित एकात्मता, तर्कसंगत विपणन आणि जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची गरज यावर त्यांनी भर दिला. त्यांनी #SVASTIK उपक्रमाचे देखील कौतुक केले, कारण हा उपक्रम पारंपारिक ज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रसार करतो.
याप्रसंगी एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते, ज्यात एनआयएससीपीआर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी बाह्यरुग्ण विभागात तज्ञांचा सल्ला घेतला. अशा उपक्रमांचा उद्देश पारंपरिक आरोग्यसेवा ज्ञानाची सुलभता वाढवणे, सामुदायिक आरोग्य जागरूकता सुधारणे आणि आयुर्वेदिक क्षेत्रात वैज्ञानिक नवोन्मेषाला चालना देणे, हा आहे.


माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181261)
Visitor Counter : 13