इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वास्तविक कृत्रिम बुद्धिमत्ता नवप्रवर्तनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी इंडियाएआय आणि जागतिक आरोग्य संघटना यांची आरोग्य क्षेत्रात भागीदारी; केसबुक तयार करण्यासाठी आरोग्य प्रणालींमध्ये प्रभावी आणि विस्तारक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत संक्षिप्त लेख सादर करण्याचे आवाहन

Posted On: 18 OCT 2025 3:47PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमईआयटीवाय) अखत्यारित येणाऱ्या इंडियाएआय अभियानाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहकार्याने आरोग्य प्रणालींमध्ये प्रभावी आणि विस्तारक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराविषयी संक्षिप्त लेख सादर करण्याचे जागतिक आवाहन केले आहे. निवडलेल्या संक्षिप्त लेखाच्या लेखकांना ‘एआय हेल्थ युज केसेस अक्रॉस द ग्लोबल साऊथ’ या केसबुकमध्ये एक प्रकरण लिहिण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हे केसबुक फेब्रुवारी 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘ भारत - कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद 2026’ मध्ये प्रकाशित केले जाणार आहे.

इंडियाएआय आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी संयुक्तपणे विकसित केलेले हे केसबुक धोरणकर्ते, नवोन्मेषक आणि ग्लोबल साउथमध्ये यशस्वीरित्या अंमलात आणलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता उपायांची प्रतिकृती आणि विस्तार करू इच्छिणाऱ्या संशोधकांसाठी एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल. वास्तविक जगातील अनुभव आणि धड्यांचा समावेश करून जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन अधिक वेगाने घडवून आणणे हे या केसबूकचे उद्दिष्ट आहे.

ग्लोबल साउथमधील संशोधक, नवोन्मेषक आणि संस्था यांनी आरोग्य क्षेत्रातील यशस्वी, अंमलात आणता येण्याजोग्या आणि विस्तारक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता उपायांवर आधारित जास्तीत जास्त 250 शब्दांचे संक्षिप्त लेख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.

तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि विहित अर्ज पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे

https://impact.indiaai.gov.in/events/who  

प्रासंगिकता, गुणवत्ता आणि केसबुकच्या उद्दिष्टांशी सुसंगतता या निकषांवर आधारित निवड झालेल्या सहभागींना 2500 ते 3000 शब्दांचे संपूर्ण प्रकरण लिहिण्यासाठी आमंत्रित केले जाईल. या प्रकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता उपायाची रचना, अंमलबजावणी धोरण, नैतिक विचार, साधलेला परिणाम आणि मिळालेली शिकवण यांचा सविस्तर आढावा अपेक्षित असेल.

महत्वाच्या तारखा

संक्षिप्त लेख (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) सादर करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2025

प्रकरण सादर करण्याची अंतिम तारीख: 15 डिसेंबर 2025

केसबुक प्रकाशन : भारत- कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद 2026 : 19-20 फेब्रुवारी 2026

अधिक माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी अर्जदार पुढील पत्त्यावर ईमेल पाठवू शकतात

fellow3.gpai-india@meity.gov.in  

***

माधुरी पांगे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2180736) Visitor Counter : 11