संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत: लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
प्रविष्टि तिथि:
18 OCT 2025 1:45PM by PIB Mumbai
संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनाला बळकटी देत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 18 ऑक्टोबर 2025 रोजी लखनौ येथील ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. उत्तर प्रदेश संरक्षण इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक प्रमुख घटक असलेल्या अत्याधुनिक सुविधेचे 11 मे 2025 रोजी संरक्षण मंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन केले होते आणि केवळ पाच महिन्यांच्या आत क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तैनातीसाठी तयार झाली.

ब्रह्मोस हे केवळ एक क्षेपणास्त्र नाही तर देशाच्या वाढत्या स्वदेशी क्षमतांचे प्रतीक असल्याचे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रसंगी सांगितले. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोसने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की या क्षेपणास्त्राने हे दाखवून दिले की हे क्षेपणास्त्र आता केवळ चाचणीपुरते मर्यादित नसून ते राष्ट्रीय सुरक्षेचा सर्वात मोठा प्रत्यक्ष पुरावा बनले आहे. संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक इंच आता ब्रह्मोसच्या टप्प्यात आहे.

गेल्या एका महिन्यात ब्रह्मोस चमूने दोन देशांसोबत सुमारे 4,000 कोटी रुपये मूल्याचे करार केले आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली. येत्या काही वर्षांत अनेक देशांचे तज्ञ लखनौला भेट देतील, त्यामुळे हे शहर ज्ञानाचे केंद्र होईल आणि संरक्षण तंत्रज्ञानात अग्रेसर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात ब्रह्मोसचे वर्णन आत्मनिर्भरतेचे क्षेपणास्त्र म्हणून केले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करत आहे, असे ते म्हणाले. लखनौला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या उत्पादनाचे केंद्र बनवून संरक्षणात आत्मनिर्भर भारत चळवळीचा भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले.

या कार्यक्रमात राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनी बूस्टर इमारतीचे उद्घाटन देखील केले आणि बूस्टर डॉकिंग प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिकही पाहिले. त्यांनी एअरफ्रेम आणि एव्हिओनिक्स, प्री-डिस्पॅच इन्स्पेक्शन आणि वॉरहेड बिल्डिंग्जमधील सादरीकरणांचा आढावा घेतला, तसेच ब्रह्मोस सिम्युलेटर उपकरणांचाही आढावा घेतला. यावेळी मोबाईल ऑटोनॉमस लाँचरचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले.

ब्रह्मोसचे महासंचालक डॉ. जयतीर्थ आर. जोशी यांनी राज्याच्या महसूल निर्मितीचे प्रतीक म्हणून जीएसटी बिल आणि सुमारे 40 कोटी रुपयांचा धनादेश उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक तसेच संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत हे देखील उपस्थित होते.



***
माधुरी पांगे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2180710)
आगंतुक पटल : 30