संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भरतेची भरारी: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एचएएल नाशिक येथे एलसीए एमके1ए च्या तिसऱ्या उत्पादन लाइनचे आणि एचटीटी- 40 च्या दुसऱ्या उत्पादन लाइनचे उद्घाटन केले
सुविधेमध्ये तयार झालेल्या पहिल्या एलसीए एमके1ए ला हिरवा झेंडा दाखवला
एलसीए एमके1ए हे संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार
एलसीए एमके1ए आणि एचटीटी- 40 उत्पादन लाईन्स हा सरकार-उद्योग-शिक्षण तज्ञांच्या समन्वयाचा दाखला आहे, एकत्रितपणे समोरे गेल्यावर कोणतेही आव्हान मोठे नसते: राजनाथ सिंह
ऑपरेशन सिंदूर दरम्यान एचएएलने विविध ऑपरेशनल साइट्सवर 24*7 सहाय्य प्रदान करून भारतीय हवाई दलाच्या परिचालन सज्जतेची हमी दिली
Posted On:
17 OCT 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाच्या (एलसीए) तेजस एमके 1 ए च्या तिसऱ्या उत्पादन लाइनचे आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) च्या दुसऱ्या या उत्पादन लाइनचे उद्घाटन केले. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या पहिल्या एलसीए एमके1ए ला देखील पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

या अत्याधुनिक विमानाचे उड्डाण हे संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकभरात संरक्षण क्षेत्रात झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, एकेकाळी 65-70% महत्वाच्या लष्करी हार्डवेअरची आयात करणारा देश आता 65% उपकरणे स्वतःच्या भूमीत बनवत आहे. आगामी काळात देशांतर्गत उत्पादन 100% पर्यंत वाढवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.
“2014 मध्ये जेव्हा आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा आम्हाला जाणवले की स्वावलंबनाशिवाय आपण खऱ्या अर्थाने सुरक्षित होऊ शकत नाही. सुरुवातीला, आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे 'मर्यादित संरक्षण सज्जता' आणि 'आयातीवरील अवलंबित्व'. सर्व काही सरकारी उपक्रमांपुरते मर्यादित होते आणि उत्पादन परिसंस्थेत खासगी क्षेत्राचा लक्षणीय सहभाग नव्हता. याशिवाय, संरक्षण नियोजन, प्रगत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर पुरेसे लक्ष केंद्रित केले नव्हते. यामुळे आपल्याला महत्त्वाच्या उपकरणांसाठी आणि अत्याधुनिक प्रणालींसाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागत होते, आणि त्यामुळे खर्च वाढत होता आणि धोरणात्मक असुरक्षितता निर्माण झाली होती. या आव्हानाने आम्हाला नवीन विचार आणि सुधारणांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. याचे आज परिणाम दिसून येत आहेत. आम्ही केवळ आयातीवरील अवलंबित्व कमी केले नाही तर स्वदेशीकरणासाठीची आमची वचनबद्धता देखील मजबूत केली. जे काही आपण परदेशातून खरेदी करत होतो, त्याचे आता आपण देशांतर्गत उत्पादन करत आहोत, मग ती लढाऊ विमाने असोत, क्षेपणास्त्रे असोत, इंजिन असोत की इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली असो,” राजनाथ सिंह म्हणाले.

सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साध्य झालेल्या यशाची माहिती देताना संरक्षण मंत्री म्हणाले की, 2014-15 मध्ये 46,429 कोटी रुपयांचे वार्षिक संरक्षण उत्पादन होते, 2024-25 मध्ये त्याने 1.50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी आकडा गाठला आहे, तर दशकभरापूर्वी 1,000 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेली निर्यात 25,000 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. आम्ही आता 2029 पर्यंत संरक्षण उत्पादन 3 लाख कोटी रुपयांपर्यंत आणि निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,” ते म्हणाले.
आधुनिक युद्धाच्या स्वरूपात सातत्याने होत असलेल्या बदलांचा उल्लेखही राजनाथ सिंह यांनी केला. या दृष्टीनेच काळाच्या पुढे राहण्याचे महत्त्वही त्या़नी अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर युद्ध, ड्रोन प्रणाली आणि भविष्यातील विमाने आता भविष्याला आकार देत आहेत आणि आता युद्धही अनेक आघाड्यांवर लढली जात आहेत ही गोष्ट त्यांनी ठळकपणे नमूद केली. या नव्या शर्यतीत भारताने कायमच मागे न राहाता आघाडीवर राहायला हवे, असे ते म्हणाले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने स्वतःला केवळ एलसीए तेजस अथवा एचटीटी-40 पर्यंत मर्यादित ठेवू नये, तर संस्थेने भविष्यातील विमाने, मानवरहित प्रणाली आणि नागरी विमान वाहतुकीच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवायला हवा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राजनाथ सिंह यांनी अत्याधुनिक, स्वदेशी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याबद्दलची सरकारची वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त केली. हा दृष्टिकोनाला पुढे नेण्याच्या प्रक्रियेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बजावत असलेल्या भूमिकेची प्रशंसाही त्यांनी केली. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम असलेली ही संस्था म्हणजे भारताच्या संरक्षण क्षेत्राचा कणा आहे असे ते म्हणाले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने अलिकडेच सेवामुक्त झालेल्या मिग-21 ला दिलेले कार्यान्वयात्मक पाठबळ तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दलही त्यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले.

आपल्या सुरक्षा विषयक इतिहासात, संपूर्ण व्यवस्थेची एकाच वेळी खरी कसोटी लागल्याची अगदी मोजकेच प्रसंग आहेत, आणि ऑपरेशन सिंदूर हे अशा प्रसंगांपैकीच एक अभियान होते असे ते म्हणाले. आपल्या सैन्याने शौर्य आणि समर्पण भावनेसोबतच, स्वदेशी प्रणालींवरील स्वतःच्या आत्मविश्वासाचेही दर्शन घडवले असे ते म्हणाले. या ऑपरेशनदरम्यान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विविध कार्यान्वयन ठिकाणांना 24 तास सहकार्यपूर्ण पाठबळ पुरवले. लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सची तत्पर देखभाल करत, त्यांनी भारतीय हवाई दलाची कार्यान्वयीन सज्जता सुनिश्चित केली. नाशिक येथील पथकाने एसयू-30 विमानावर ब्रह्मोस क्षेपणास्त्र स्थापित करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली, यामुळेच या ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा आपण स्वतःची उपकरणे तयार करू शकतो आणि त्यांच्या मदतीने स्वतःचे संरक्षण करू शकतो हीच बाब या घडामोडींतून सिद्ध झाली असे त्यांनी सांगितले.
यावेळी संरक्षण मंत्र्यांनी नाशिक इथल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या आजवरच्या कामगिरीचीही प्रशंसाही केली. या संस्थेने सहा दशकांहून अधिक काळ मिग-21 आणि मिग-27 सारख्या लढाऊ विमानांचे उत्पादन आणि दुरुस्ती, एसयू-30 चे उत्पादन केंद्र बनणे या आणि अशा यशातून भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला नवीन उंची गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेचे संकुल म्हणजे आत्मनिर्भरतेचे एक देदीप्यमान प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले.

एलसीए तेजस आणि एचटीटी-40 विमानांचे सध्या सुरू असलेले उत्पादन देखील देशातील विविध उद्योग भागीदारांमधील परस्पर सहकार्याचे यश असल्याची बाबही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. जर सरकार, उद्योग क्षेत्र आणि शिक्षण जगताने एकत्र काम केले, तर कोणतेही आव्हान मोठे नाही हेच या भागीदारीतून सिद्ध होते असे ते म्हणाले. यासोबतच, तेजस आणि एचटीटी-40 यांसारख्या विमानांवर भारतीय हवाई दलाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नाशिक विभागात स्थापन करण्यात आलेल्या नागरी आणि लष्करी विमान वाहतुकीसाठीच्या संयुक्त देखभाल, दुरुस्ती आणि आधुनिकीकरण सुविधेचा उल्लेखही राजनाथ सिंह यांनी केला. या उपक्रमामुळे नाशिक आणि आसपासच्या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे संपूर्ण संकुल आता कागदविरहित, डिजिटल आणि पूर्णपणे शाश्वत झाले असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. ही घडामोड नव्या भारताने तंत्रज्ञानात घेतलेल्या आघाडीचे खरे प्रतीक आहे असे ते म्हणाले.
दोन उत्पादन लाईन्सच्या उद्घाटनातून भारताच्या वाढत्या तांत्रिक आत्मविश्वासाचे, औद्योगिक सामर्थ्याचे आणि धोरणात्मक दूरदृष्टीचा भक्कम संदेश दिला जात आहे, असे याप्रसंगी बोलताना, सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार यांनी सांगितले. “या कार्यक्रमातून एचएएलच्या प्रवासात एक नवीन अध्याय सुरू होत आहे, जो आपल्या देशाची उत्पादन क्षमता वाढवतो आणि एका मजबूत, आत्मनिर्भर एरोस्पेस प्रणालीचा पाया मजबूत करतो” असेही त्यांनी सांगितले.
एलसीए तेजस एमके1 हे केवळ एक लढाऊ विमान नाही तर भारताच्या डिझाइन आणि उत्पादन उत्कृष्टतेचे एक प्रतीक असल्याचे सचिव (संरक्षण उत्पादन) यांनी म्हटले आहे. हे विमान एचएएल, वैमानिक विकास संस्था(एडीए), भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने संकल्पित, विकसित आणि पूर्णपणे देशातच निर्मित असल्याची माहिती त्यांनी दिली. एचटीटी-40 हे एचएएल द्वारे पूर्णपणे डिझाइन केलेले आणि विकसित केलेले विमान असून ते कंपनीच्या महत्त्वपूर्ण संरक्षण प्लॅटफॉर्मची संकल्पना, डिझाइन आणि वितरण करण्याच्या क्षमतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमधून एलसीए एमके1ए आणि एचटीटी-40 उत्पादन सुरू होणे हा एचएएलच्या विस्तार क्षमतेचा ठोस पुरावा असल्याचे एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील यांनी म्हटले. “ एचएएल नाशिक विभागाने एसयू-30 एमकेआय व्यतिरिक्त स्वदेशी अत्याधुनिक लढाऊ विमाने तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे, त्यामुळे आमच्या उत्पादन प्रयत्नांना आणि वेळेत वितरणाच्या ध्येयाला गती मिळाली आहे, असेही ते म्हणाले. यामुळे नाशिक आणि आसपासच्या परिसरात सुमारे 1,000 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि 40 हून अधिक उद्योग भागीदारांचे जाळे निर्माण झाले आहे — जे सरकारच्या प्रभावी सार्वजनिक-खाजगी भागीदारी निर्माण करण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे,” असे त्यांनी सांगितले.
एचएएलचे मुख्य चाचणी पायलट (फिक्स्ड विंग) ग्रुप कॅप्टन के. के वेणुगोपाल (निवृत्त) यांनी तेजस एमके1ए चे पहिले चाचणी उड्डाण केले, त्यानंतर एसयू-30एमकेआय आणि एचटीटी-40 द्वारे उत्साहवर्धक हवाई प्रदर्शने करण्यात आली. याप्रसंगी तेजस एमके1ए ला वॉटर कॅनन सलामी देखील देण्यात आली.
पार्श्वभूमी
एचएएलने दोन वर्षांच्या विक्रमी कालावधीत तिसरी एलसीए एमके1ए उत्पादन लाइन कार्यान्वित केली आहे. या लाईन मध्ये विमानाच्या प्रमुख घटकांसाठी – जसे की सेंटर फ्यूजेलाज, फ्रंट फ्यूजेलाज, रिअर फ्यूजेलाज, विंग्स आणि एअर इनटेकसह विमानाच्या सर्व प्रमुख मॉड्यूलसाठी 30 हून अधिक स्ट्रक्चर असेंब्ली जिग्स बसवण्यात आले आहेत. ही लाइन पूर्णपणे कार्यरत आहे आणि दरवर्षी आठ विमाने तयार करण्याची तिची क्षमता आहे. या लाइनच्या उद्घाटनामुळे एचएएलची उत्पादन क्षमता दरवर्षी 24 विमाने इतकी होणार आहे.

एचएएलने नाशिक येथे दुसरी एचटीटी-40 उत्पादन लाइन स्थापन केली आहे. या असेंब्ली कॉम्प्लेक्समध्ये फ्युजेलाज, विंग्स आणि कंट्रोल सरफेस तयार करण्यासाठी आवश्यक स्ट्रक्चर असेंब्ली कार्यशाळा आहेत.
एचएएल नाशिक विभागाबद्दल अधिक माहिती
एचएएल नाशिक विभागाची स्थापना 1964 मध्ये मिग-22 लढाऊ विमानांच्या परवाना उत्पादनासाठी करण्यात आली. या विभागाने 900 हून अधिक विमानांचे उत्पादन केले आहे तसेच मिग-21 आणि मिग-27 पासून ते एसयू-30 एमकेआय विमानांपर्यंत 1,900 हून अधिक लष्करी विमानांचे ओव्हरहॉलिंग (देखभाल आणि दुरुस्ती) केले आहे. विभागाच्या उत्कृष्ट डिझाइन, उत्पादन आणि एकत्रीकरण क्षमतांमुळे, एसयू-30 एमकेआय विमानाला यशस्वीरित्या अतिरिक्त स्वदेशी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले आहे, ज्यामध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचे एकत्रीकरण समाविष्ट आहे.
हा विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा असलेले संपूर्ण विमान उत्पादन, देखभाल आणि दुरुस्ती (ओव्हरहॉल) तसेच डिझाईन क्षमताने युक्त असे केंद्र आहे. या विभागाची परंपरा म्हणजे निर्मित विमानांना संपूर्ण आयुष्यभरासाठी देखभाल आणि तांत्रिक सहाय्य पुरवणे. सध्या हा विभाग एसयू-30 एमकेआय विमानांसाठी सर्वसमावेशक ओव्हरहॉल आणि दुरुस्ती सेवा प्रदान करत आहे.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180489)
Visitor Counter : 19