आयुष मंत्रालय
ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांनी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला दिली भेट, आयुर्वेद आरोग्य आणि ज्ञानाचे 5,000 वर्ष जुने भांडार आहे अशा शब्दांत अल्कमिन यांनी केली प्रशंसा
प्रतिबंधात्मक आणि शाश्वत आरोग्यसेवेसाठी जगाला आयुर्वेदाच्या कालातीत ज्ञानाची गरज असल्याचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
भारताच्या भेटीवर आलेले ब्राझीलचे उपराष्ट्रपती आणि विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा मंत्री, गेराल्डो अल्कमिन यांनी आज केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारितील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट दिली. अल्कमिन यांचे आदरातिथ्य करण्याच्या मिळालेल्या विशेष बहुमानाची संधी साधत, त्यांचे संस्थेत उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी अल्कमिन यांनी पारंपरिक आणि एकात्मिक आरोग्य व्यवस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत नेतृत्वाच्या भूमिकेतून करत असलेल्या कामाचे कौतुक केले. आयुर्वेद हे 5,000 वर्ष जुने आरोग्य आणि ज्ञानाचे भांडार आहे असे ते म्हणाले. आरोग्य संवर्धन, रोगांवरील उपचार आणि सर्वंकष दृष्टिकोनातून शिक्षण आणि संशोधनात प्रगती साध्य करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था उत्कृष्ट कार्य करत असल्याचे म्हणत, त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. प्रतिबंधात्मक आणि शाश्वत आरोग्यविषयक सेवेसाठी जगाला आयुर्वेदाच्या कालातीत ज्ञानाची गरज असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.
X8AN.jpeg)
आयुर्वेदाच्या जागतिक उपयुक्ततेची दखल घेत आयुर्मानाचे प्रमाण वाढत असतानाच, आयुर्वेदासारख्या नैसर्गिक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व्यवस्थांच्या मागणीतही वाढ होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. आपला हा दौरा अल्प कालावधीचा नसता, तर आपण स्वतःच्या पाठदुखीवर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतच उपचार घेतले असते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अल्कमिन यांच्यासोबत त्यांची पत्नी मारिया लुसिया अल्कमिन आणि 14 अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानेही या संस्थेला भेट दिली.
0JEJ.jpeg)
या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपती आणि त्यांच्या शिष्टमंडळाला अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या आयुर्वेद शिक्षण, वैद्यकीय उपचार सेवा, तसेच प्रगत संशोधन क्षेत्रातील महत्वाच्या योगदानाविषयी माहिती दिली गेली. या शिष्टमंडळाने संस्थेच्या विविध विभागांनाही भेट दिली.
या भेटीमुळे पारंपरिक औषधांशी संबंधित शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि क्षमता निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अस्तित्वात असेलेल्या विद्यमान सामंजस्य करारांअंतर्गत दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले परस्पर सहकार्य अधिक दृढ झाले आहे.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि ब्राझीलच्या श्री वजेरा फाउंडेशन आणि संबंधित संस्था यांच्यामधील सामंजस्य करार.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जनेरियो आणि ब्राझीलियन अकॅडमिक कन्सोर्शिअम फॉर इंटिग्रेटिव्ह हेल्थ यांच्यामधील सामंजस्य करार (सातत्यपूर्ण परस्पर सहकार्याच्या उद्देशाने नूतनीकरण केलेला).
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, फ्युचर व्हिजन इन्स्टिट्यूट आणि फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलो, ब्राझील यांच्यामधील सामंजस्य करार.
पारंपरिक औषधोपचार पद्धती आणि नियमनांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि उपलब्धता सुधारण्यासोबतच, वैज्ञानिक ज्ञानाची देवाणघेवाणीला चालना देणे आणि पारंपरिक वैद्यकीय वारशाचे संरक्षण करणे हा या सामंजस्य करारांचा उद्देश आहे.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2180170)
आगंतुक पटल : 22