वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मर्कोसुर – भारत व्यापार कराराची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात भारत आणि ब्राझीलचा संयुक्त जाहीरनामा

Posted On: 16 OCT 2025 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर  2025

16 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली इथे झालेल्या उभयतांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे उपराष्ट्रपती तसेच विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा मंत्री जेराल्डो अल्कमिन आणि भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दोन्ही देशांमधील  व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, विद्यमान प्राधान्य व्यापार कराराची (Preferential Trade Agreement - PTA) व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने, भारत आणि मर्कोसुर सदस्य राष्ट्रांनी दाखवलेल्या स्वारस्याचे स्वागत केले आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या नियम आणि अटींनुसार परस्परांमधील संबंध मजबूत करण्याच्या तसेच परस्परांमधील व्यापाराच्या विस्ताराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत आणि मर्कोसुर यांच्यात 17 जून 2003 रोजी झालेल्या फ्रेमवर्क कराराचे दोन्ही नेत्यांनी स्मरण केले, आणि त्या अनुषंगाने खाली नमूद बाबींवर सहमती व्यक्त केली. :

द्विपक्षीय व्यापारातील मोठ्या भागाला शुल्क सवलतीचा लाभ मिळावा या उद्देशाने कराराचा विस्तार हा वास्तववादी असावा.

कराराच्या विस्ताराअंतर्गत व्यापार आणि आर्थिक भागीदारीशी संबंधित शुल्क आणि बिगर शुल्क अशा दोन्ही मुद्यांशी संबंधित समस्यांचा समावेश असावा.

वाटाघाटी प्रक्रियेला पाठबळ मिळावे या उद्देशाने खासगी क्षेत्राच्या तसेच  इतर संबंधितांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन द्यावे.

दोन्ही देशांमध्ये तांत्रिक संवाद स्थापित करणे हा या उपक्रमाचा पुढचा टप्पा असावा. याअंतर्गत विस्ताराची व्याप्ती निश्चित करण्याच्या उद्देशाने, प्राधान्य व्यापार कराराच्या अनुच्छेद 23 अंतर्गत स्थापन केलेल्या संयुक्त प्रशासन समितीच्या बैठकीचे दोन्ही देशांच्या सोयीच्या तारखेला लवकरात लवकर आयोजन करण्याच्या मुद्याचाही अंतर्भाव असावा.

वाटाघाटी सुरू झाल्यापासून एका वर्षाच्या आत दोन्ही देशांनी वाटाघाटींची पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा.

याव्यतिरिक्त, या कराराला वास्तववादी, जलद आणि परस्पर हिताची व्याप्ती प्राप्त व्हावी या उद्देशाने ब्राझील मर्कोसुर भागीदारांसोबत समन्वित पद्धतीने काम करेल, ही बाब ब्राझीलच्या वतीने नमूद केली गेली.

गोपाळ चिपलकट्टी/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2180128) Visitor Counter : 21