सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तीन नवीन डॉ.आंबेडकर अध्‍यासन स्थापनेसाठी सामंजस्य करार- मुंबई विद्यापीठासह तीन विद्यापीठांमध्ये होणार स्थापन

Posted On: 15 OCT 2025 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर  2025

सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर प्रतिष्‍ठानने (आज)  15 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील  डॉ. आंबेडकर आंतरराष्‍ट्रीय केंद्रात  (डीएआयसी), तीन नवीन डॉ. आंबेडकर अध्‍यासन  स्थापनेसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभाचे आयोजन केले. मुंबई विद्यापीठ, जयपूर राष्ट्रीय विद्यापीठ आणि जी बी पंत तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ  ऑफ टेक्निकल अँड अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी या तीन विद्यापीठांमध्ये तीन नवीन डॉ. आंबेडकर  अध्‍यासनांची  स्थापना  करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्‍यात आल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी भूषवले. सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव अमित यादव यांच्यासह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी,  डॉ. आंबेडकर प्रतिष्‍ठानचे प्रतिनिधी आणि सहभागी विद्यापीठांचे कुलगुरू  या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपल्या भाषणात,मंत्र्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा आणि दृष्टिकोनाचा शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांद्वारे प्रसार करण्यासाठी डॉ. आंबेडकर प्रतिष्‍ठानकडून होत असलेल्या सततच्या प्रयत्नांचे कौतुक केले.डॉ.आंबेडकरांनी कल्पना केल्याप्रमाणे समतापूर्ण आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि संस्थात्मक सहकार्य हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे,  यावर त्यांनी भर दिला. तसेच  त्यांनी असा विश्वासही व्यक्त केला की,नवीन स्थापन झालेल्या अध्‍यासन केंद्रांमध्‍ये  सामाजिक न्याय, समानता, उपेक्षित समुदायांचे सक्षमीकरण आणि घटनात्मक  मूल्यांशी संबंधित मुद्यांवर धोरणात्मक संशोधन, जनजागृती आणि शैक्षणिक  व्याख्‍यानांमुळे  अर्थपूर्ण योगदान दिले जाईल.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या सचिवांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर बहुविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्यात आणि समकालीन सामाजिक आणि कायदेशीर आव्हानांशी त्याची प्रासंगिकता वाढविण्यात विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. ‘आंबेडकरी’ विचारसरणीवर शैक्षणिक सहभाग मजबूत करण्यात प्रतिष्‍ठान आणि विद्यापीठांच्या सहयोगी दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले.

नवीन सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून, विद्यमान अध्‍यासनांमध्ये तीन अतिरिक्त डॉ. आंबेडकर अध्‍यासनांची भर घालण्यात आली आहे. यामुळे  या योजनेअंतर्गत कार्यरत अध्‍यासनांची एकूण संख्या अठ्ठावीस झाली आहे. सहभागी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी मंत्रालयाचे आभार मानले आणि दर्जेदार संशोधन आणि ‘आउटरिच’- पोहोच  उपक्रमांद्वारे योजनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी  वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

डॉ.आंबेडकर प्रतिष्‍ठानच्या संचालकांनी सादर केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी  मंत्री, सचिव, मंत्रालयाचे अधिकारी आणि विद्यापीठांच्या प्रतिनिधींचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि सहभागाबद्दल मनापासून आभार मानले.

डॉ.आंबेडकर प्रतिष्‍ठानने या उपक्रमाचा विस्तार करत राहण्याचा आपला संकल्प पुन्हा व्यक्त केला जेणेकरून भारतातील शैक्षणिक संस्था; डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि तत्वज्ञानाने प्रेरित होऊन संशोधन, धोरण विकास आणि सार्वजनिक शिक्षणासाठी उत्कृष्टतेची केंद्रे बनू शकतील.

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2179454) Visitor Counter : 16