दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशाखापट्टणममधील गुगलचे 1 गिगावॅट क्षमतेचे हायपरस्केल डेटा सेंटर आंध्र प्रदेशसाठी 10,000 कोटी रुपये महसूल निर्मिती करेल: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी

Posted On: 14 OCT 2025 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2025

 

विशाखापट्टणम येथे उभारण्यात येणारे 1 गिगावॅट क्षमतेचे हायपरस्केल गुगल डेटा सेंटर आंध्र प्रदेशसाठी सुमारे 10,000 कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय दूरसंचार आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी आज सांगितले.

स्वरांध्र प्रदेशच्या प्रगती आणि स्वावलंबनाच्या प्रवासात हा प्रकल्प एक निर्णायक टप्पा असल्याचे वर्णन करताना, केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले की 2026 ते 2030 या पाच वर्षांमध्ये सुमारे 15 अब्ज (अमेरिकन डॉलर) इतकी गुंतवणूक केली जाणार असून, यामुळे 5,000 ते 6,000 थेट रोजगार, आणि 20,000 ते 30,000 एकूण रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच विशाखापट्टणममध्ये आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, वीज आणि शीतकरण सुविधा येतील, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होईल.

नवी दिल्ली येथे आयोजित भारत एआय शक्ती कार्यक्रमादरम्यान गुगलने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हबची स्थापना करण्याची घोषणा केल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. या प्रकल्पात भारताचे पहिले 1 गिगावॅट-स्केल डेटा सेंटर आणि भारतातील पहिले एआय हब असेल.

डॉ. चंद्रशेखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या विकासाला दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले आणि आंध्र प्रदेशात गुगल आणण्यासाठी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू तसेच नारा लोकेश यांच्या सततच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.

हा प्रकल्प राज्याला भारतभरात एक डिजिटल हब म्हणून स्थान देण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित परिवर्तनाला गती देण्यासाठी एक मोठे पाऊल आहे यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव; केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण; आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू; आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश; आणि गुगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस कुरियन उपस्थित होते.

   

आंध्र प्रदेशसाठी एक महत्त्वाचा क्षण

आशियातील पहिले 1-गीगावॉट हायपरस्केल डेटा सेंटर कॅम्पस स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीमती @nsitharaman जी आणि श्री @AshwiniVaishnaw जी यांच्या उपस्थितीत आंध्र प्रदेश सरकार आणि @Google यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी... 

— डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (@PemmasaniOnX) 14 ऑक्टोबर 2025

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179132) Visitor Counter : 4