संरक्षण मंत्रालय
जागतिक शांतता सुनिश्चित करण्यासाठी आणि शांतता विषयक उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी व्यापक सल्लामसलत, सहकार्य, समन्वय क्षमता निर्मिती आवश्यक आहे: संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम सैन्य योगदानकर्ता देशांच्या प्रमुखांना संरक्षण मंत्र्यांचे आवाहन
"प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षमता असलेल्या राष्ट्रांनी शांतता मोहिमांच्या शाश्वततेसाठी पाठिंबा वाढवणे गरजेचे आहे"
"आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील मोहिमांमध्ये काम करणाऱ्या भारतीय महिला अधिकारी या सक्षमीकरणाचे जागतिक प्रतीक आहेत"
"काही राष्ट्रे उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करतात, तर भारत कालबाह्य आंतरराष्ट्रीय संरचनांमध्ये सुधारणांचे समर्थन करत नियम-आधारित सुव्यवस्था कायम राखतो"
Posted On:
14 OCT 2025 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2025
उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जागतिक शांतता सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये योगदान देणाऱ्या देशांसाठी मार्गदर्शक तत्व म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यापक सल्लामसलत, सहकार्य, समन्वय आणि क्षमता निर्मिती (Consultation, Cooperation, Coordination & Capacity Building) या 4C सूत्राचे समर्थन केले. नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे 14-16 ऑक्टोबर 2025 दरम्यान भारताने प्रथमच आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम सैन्य योगदानकर्ता देशांच्या (UNTCC) शांती सेना प्रमुखांच्या परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान वरिष्ठ लष्करी नेतृत्वाला ते संबोधित करत होते.

शांती सैनिकांना आज सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांची वाढती जटिलता अधोरेखित करताना संरक्षण मंत्र्यांनी दहशतवाद आणि तात्पुरते राजकीय तोडगे अशा अस्थिर वातावरणात तैनात करण्यापासून ते मानवी संकटे, साथीचे रोग किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये काम करणे आणि चुकीची माहिती देणाऱ्या मोहिमांना धैर्याने सामोरे जाणे यांचा उल्लेख केला. शांतता मोहिमांच्या शाश्वततेसाठी, त्यांनी सदस्य राष्ट्रांना, विशेषतः प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षमता असलेल्या देशांना सैन्य, पोलिस, रसद, तंत्रज्ञान आणि विशेष क्षमतांद्वारे त्यांची मदत वाढवण्याचे आवाहन केले. सुरक्षित संप्रेषण, देखरेख प्रणाली आणि मानवरहित प्लॅटफॉर्म यांसारख्या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे मोहिमा अधिक सुरक्षित आणि प्रभावी होऊ शकतात यावर त्यांनी भर दिला.
"कालबाह्य बहुपक्षीय व्यवस्थांसह आपण आजच्या आव्हानांना तोंड देऊ शकत नाही. व्यापक सुधारणांच्या अभावी संयुक्त राष्ट्रांना विश्वासाच्या संकटाचा सामना करावा लागतो. परस्परांशी जोडलेल्या आजच्या जगासाठी, आपल्याला सुधारित बहुपक्षीयतेची आवश्यकता आहे: जी वास्तविकता प्रतिबिंबित करते; सर्व हितधारकांचे मत जाणून घेते ; समकालीन आव्हानांना तोंड देते; आणि मानवी कल्याणावर लक्ष केंद्रित करते," असे राजनाथ सिंह म्हणाले.
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या मोहिमेत भारत नेहमीच संयुक्त राष्ट्रांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि तो या वचनबद्धतेवर कायम आहे, हे संरक्षणमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.

शांती सैनिकांचे यश केवळ संख्येवर नाही तर सज्जतेवर अवलंबून असते असे सांगून, राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिक केंद्राचा उल्लेख केला ज्याने 90 हून अधिक देशांमधील सहभागींना प्रशिक्षण दिले आहे.
संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून, भारताने किफायतशीर स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे जे जमिनीवरील गतिशीलता, सुरक्षित संप्रेषण, देखरेख प्रणाली, मानवरहित हवाई वाहने आणि वैद्यकीय सहाय्य उपायांद्वारे शांतता मोहिमांना बळकटी देतात.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महिलांची वाढती भागीदारी सर्वात प्रेरणादायक बदल ठरत असल्याचे सांगितले. महिलांच्या उपस्थितीमुळे मोहिमा प्रभावी ठरत आहेत. स्थानिक लोकसंख्येमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होते आणि अभियानाविषयी सहानुभूती निर्माण होते. “भारत या क्षेत्रात अग्रणी आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले की, विश्व गुरु बनण्याची भारताची आकांक्षा ही वर्चस्व गाजवण्यासाठी नाही; तर सहयोगी आणि समावेशक प्रगतीसाठीचे आवाहन आहे.
“आजकाल, काही राष्ट्रे उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत आहेत, तर काही देश असे नियम कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही स्वतःचे नियम तयार करू इच्छितात आणि पुढील शतकावर वर्चस्व गाजवू इच्छितात. या सर्वांमध्ये, भारत, जुन्या आंतरराष्ट्रीय संरचनांच्या सुधारणांचा पुरस्कार करत असताना, आंतरराष्ट्रीय नियम-आधारित व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी कटिबद्ध आहे. महात्मा गांधींजींची भूमी असलेल्या भारतामध्ये शांतता, अहिंसा आणि सत्याच्या तत्वज्ञानाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. महात्मा गांधींसाठी शांतता म्हणजे केवळ युद्धाचा अभाव नव्हता, तर न्याय, सुसंवाद आणि नैतिक शक्तीची सकारात्मक अवस्था होती,” असेही राजनाथ सिंह पुढे म्हणाले.

आपल्या स्वागतपर भाषणात, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारताच्या दीर्घकालीन योगदानावर प्रकाश टाकला.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग आणि वरिष्ठ पदावरील अधिकारी वर्ग तसेच इतर पदासन्न नागरी अधिकारी जागतिक शांतता मोहिमेचे भविष्य एकत्रितपणे आखण्यासाठी इतर प्रतिष्ठित आमंत्रितांसह उद्घाटन दिवसाच्या कार्यक्रमांत सहभागी झाले.
भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या यूएनटीसीसी प्रमुखांच्या परिषदेत, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 32 राष्ट्रांमधील वरिष्ठ लष्करी नेतृत्व एकत्र येते.

संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये सर्वात मोठ्या योगदानकर्त्यांपैकी एक म्हणून, भारत ‘परिचालन आव्हाने, नव्याने निर्माण होत असलेल्या धोक्यांवर चर्चा करण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि भविष्यातील शांतता राखण्यासाठी, सामायिक समज निर्माण करण्यासाठी या उच्च-स्तरीय परिषदेचे आयोजन करत आहे. ही परिषद ‘वसुधैव कुटुंबकम’ (संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे ही भावना प्रतिबिंबित करते.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179081)
Visitor Counter : 12