लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

भारताचा प्रवास हे लोकशाही आणि समानतेच्या भावनेचे जिवंत उदाहरण : लोकसभा अध्यक्ष


जगाने हवामान बदल, साथीचे रोग, यासारख्या आव्हानांविरुद्ध एकत्र येऊन लढा द्यावा : लोकसभा अध्यक्ष

Posted On: 11 OCT 2025 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2025

 

भारत हा लोकशाही आणि समानतेच्या भावनेचे जिवंत उदाहरण आहे, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. भारताच्या संविधानाने गेल्या 75 वर्षांपासून देशाला मार्गदर्शन केले असून लोकशाही हा भारताचा आत्मा आहे, समानता हा त्याचा संकल्प आहे आणि न्याय ही त्याची ओळख आहे, हे बिर्ला यांनी अधोरेखित केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या "राष्ट्रकुल - एक जागतिक भागीदार" या विषयावर आयोजित महासभेत प्रतिनिधींना संबोधित करत होते. या प्रसंगी, त्यांनी राष्ट्रकुल देशातील संसदेच्या अध्यक्षांना, 7 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रकुल देशांच्या  पीठासीन  अधिकाऱ्यांच्या (CSPOC) पुढील परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.

हवामान बदल, साथीचे रोग, अन्न असुरक्षा आणि असमानता यासारख्या  जागतिक संकटांना सीमांचे बंधन नाही, म्हणूनच त्यावर उपाय शोधण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे बिर्ला यांनी सांगितले. कोणताही देश या समस्यांना एकट्याने सामोरा जाऊ शकत नाही म्हणून एकजुटीने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बिर्ला यांनी अन्न आणि आरोग्य सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. भारताने जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेत विश्वासार्ह भागीदार म्हणून बजावलेली भूमिका अधोरेखित केली.

बिर्ला यांनी भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचे  अधोरेखित केले . भारत पॅरिस करारातील उद्दिष्टे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करणारा पहिला प्रमुख देश बनला आहे, हे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख बिर्ला यांनी केला. पंचायती राज संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची तरतुद केली आहे, असे त्यांनी सांगितले. 

तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्म लोकशाहीची पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवू शकतात, यावर लोकसभा अध्यक्षांनी भर दिला. मात्र तंत्रज्ञान मानवतेची सेवा करण्यासाठी असले पाहिजे, मानव तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ नये, असेही ते म्हणाले. हे साध्य करण्यासाठी जागतिक मानके तयार करण्याची गरज बिर्ला यांनी अधोरेखित केली. या मानकांमुळे नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेलतसेच तंत्रज्ञानाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचतील आणि त्याचे नकारात्मक परिणाम कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177950) Visitor Counter : 4