गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत ते बेलेम: दिल्ली घोषणापत्रने कॉप 30 साठी अनुकूल वातावरण तयार केले, ग्लोबल साऊथ मधून  शहरी आवाज बुलंद केला

Posted On: 10 OCT 2025 1:58PM by PIB Mumbai

 

आगामी युएनएफसीसीसी हवामान परिषद कॉप 30 साठी अनुकूल वातावरण तयार करताना, जागतिक हवामान उद्दिष्टांसाठी स्थानिक कृतीवरील दिल्ली घोषणापत्र हे 8-9 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या अराइज (अनुकूल,लवचिक, अभिनव, शाश्वत आणि समतापूर्ण) सिटीज फोरम 2025 चे प्रमुख फलित म्हणून उदयास आले. या घोषणेमध्ये ग्लोबल साऊथ मधील प्रतिनिधित्व एकत्रित करून मजबूत बहुस्तरीय सहकार्य आणि जलद शहरी हवामान कृतीसाठी सामायिक आवाहन केले आहे. या मंचाचे सह-यजमानपद आयसीएलईआय दक्षिण आशिया आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (एनआययुए) यांनी भूषवले होते.

स्थानिक, उप-राष्ट्रीय आणि राष्ट्रीय सरकारे, खाजगी क्षेत्र आणि इतर प्रमुख हितधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 60 शहरे आणि 25 देशांमधील 200 हून अधिक प्रतिनिधींनी जागतिक हवामान परिणामांमध्ये लवचिकता, समता आणि शाश्वततेच्या प्राधान्यांचे प्रतिबिंब पडेल याची सुनिश्चिती करण्यासाठी शहरी आवाज बुलंद करण्याचे आणि शहरे, क्षेत्रे आणि सीमांमध्ये सहकार्य मजबूत करण्याचा संकल्प केला.

दोन दिवसीय परिषदेच्या समारोपाच्या वेळी स्वीकारण्यात आलेले, दिल्ली घोषणापत्र शहरी महत्त्वाकांक्षेचे सामूहिक निवेदन म्हणून बेलेममधील कॉप 30 अध्यक्षांकडे  सुपूर्द केले जाईल, जे लवचिक, समतापूर्ण आणि शाश्वत हवामान कृती राबवण्यात शहरांच्या नेतृत्वावर भर देईल.

इंदूरचे खासदार आणि हवामान संसदेचे मार्गदर्शक शंकर लालवानी यांनी दिल्ली घोषणापत्र आयसीएलईआय दक्षिण अमेरिकाचे उपकार्यकारी सचिव आणि संचालक रॉड्रिगो डी सूझा कोराडी यांना सुपूर्द केले.

दिल्ली घोषणापत्र हे जागतिक हवामान प्रशासनात शहरे आणि स्थानिक सरकारांच्या अपरिहार्य भूमिकेची  एक ऐतिहासिक सहमती दर्शवते.

हे घोषणापत्र  संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलासंबंधीच्या परिषदेअंतर्गत ग्लोबल साऊथ देशांचा  सामूहिक आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचवते आणि   स्थानिक सरकार  आणि  महापालिका प्रशासन या घटकांच्या बहुस्तरीय सहकार्य आणि शहरीकरणाच्या हवामान कृतीसाठीच्या दृष्टिकोनाचे रूपांतर ठोस, शहर-केंद्रित बांधिलकीमध्ये करते. कॉप 30 च्या कृती अजेंड्याशी सुसंगत राहून आणि ग्लोबल स्टॉकटेकचे  निष्कर्ष प्रतिध्वनित करत शहरी नेतृत्व हे पॅरिस कराराची उद्दिष्टे साध्य करण्याच्या केंद्रस्थानी असेल  हे सूचित करत आहे. दिल्ली ते बेलेम असा प्रवास करताना, हा दस्तऐवज शहरांचे एकत्रित आवाहन घेऊन मार्गक्रमण करत आहे - केवळ कॉप मध्ये ते ऐकले जावे या उद्देशाने नाही तर आपल्या सामायिक हवामान भविष्य परिभाषित  करणारे निर्णय, संसाधने आणि लवचिकता चौकटींना आकार देणारे भागीदार म्हणून ओळखले जावे हा त्यामागील उद्देश आहे.

घोषणापत्रात ग्लोबल साउथमधील स्थानिक आणि उपराष्ट्रीय सरकारांना मार्गदर्शन करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेचे मुद्दे मांडले आहेत:

स्थानिक हवामान कृतीला पुढे नेण्यासाठी सुधारित, मोजता येण्याजोग्या आणि संसाधनयुक्त बहुस्तरीय  NDCs  अर्थात पॅरिस कराराअंतर्गत प्रत्येक देशाने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्वतःहून ठरवलेली उद्दिष्टे आणि कृती आराखडे यांचा अवलंब करणे .

सर्वसमावेशक शहरी लवचिकता अंगीकारून अनुकूलन, चक्राकार आणि निसर्गाशी निगडित आधारित उपाय योजना करणे

शून्य कार्बन उत्सर्जन गाठण्यासाठी न्याय्य आणि सहभागी हरित संक्रमणाला चालना देणे.

हवामान प्रशासनाच्या प्रक्रियेत नागरिक, महिला, तरुण आणि समुदायांना सक्षम बनवणे;

बहुस्तरीय प्रशासन आणि पारदर्शक डेटा प्रणाली मजबूत करणे;

हवामान वित्तपुरवठा गतिमान करणे आणि शहरांसाठी थेट प्रवेश वाढवणे; आणि,

ग्लोबल साऊथ मधील देश आणि विकसनशील देशांमध्ये सहकार्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ग्लोबल साऊथ मधील शहरी नेतृत्वाला चालना देणे.

या मंचाच्या सत्रांमध्ये आणि सर्वसाधारण बैठकींमध्ये राष्ट्रीय हवामान आकांक्षा आणि स्थानिक अंमलबजावणीमधील तफावत , कचरा आणि पाण्याचे व्यवस्थापन, समावेशक आणि शाश्वत शहरी अन्न प्रणाली, हवामान-लवचिक विकासात निसर्गाधारित उपाययोजनांची भूमिका आणि शहरांमधील वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी पद्धतशीर प्रतिसाद या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.  याशिवाय शहरांमधील नवोन्मेषी हवामान उपाययोजना, स्थानिक नेतृत्वाखालील प्रशासन, स्वच्छ गतिशीलतेकडे संक्रमण, हवामान वित्तीय साधने आणि धोरणे, शाश्वत ऊर्जा नियोजनासाठी डिजिटल उपाय आणि वाहतूक-केंद्रित विकास यांचा यात समावेश आहे.

***

सुषमा काणे / वासंती जोशी / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177381) Visitor Counter : 12