संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिडनी इथे आयोजित, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या संरक्षण उद्योग व्यापार गोलमेज परिषदेला केले संबोधित
भारत संरचनात्मक सुधारणांच्या, विशेषतः उत्पादन क्षेत्रात,परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असून; सर्वात वेगाने वाढणारी आणि जागतिक स्तरावर चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
प्रॉपल्शन तंत्रज्ञान, पाण्याखालील स्वायत्त वाहने, फ्लाईट सिम्युलेटर्स आणि प्रगत सामग्रीसह उच्चस्तरीय प्रणालींच्या सह विकास आणि सह उत्पादन करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कंपन्यांचे संरक्षण मंत्र्यांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2025 10:15AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिडनी इथे आयोजित, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या संरक्षण उद्योग व्यापार गोलमेज परिषदेला संबोधित केले. आपल्या संबोधनातून त्यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक, औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रांमधील वाढता समन्वय ठळकपणे अधोरेखित केला.
दोन्ही देशांमध्ये 2020 मध्ये स्थापित झालेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या बळावर, आता दोन्ही देश परस्परांना संरक्षण संबंधांच्या बाबतीत केवळ भागीदार देश म्हणून नव्हे, तर सुरक्षित आणि समृद्ध भारत प्रशांत क्षेत्राचे सहनिर्माते म्हणून पुनर्स्थापित करण्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आले असल्याचे ते म्हणाले.
ही गोलमेज परिषद निव्वळ संवादाच्या पलिकडे व्यवसाय, उद्योग आणि नवोन्मेषाच्या बाबतीत भारत आणि ऑस्ट्रेलियाला नैसर्गिक मित्र बनवण्याचा निर्धार व्यक्त करणारी असल्याचे ते म्हणाले.
या द्विपक्षीय संबंधांचा पाया हा सामायिक लोकशाही मूल्ये आणि संस्थात्मक समानतेवर आधारित असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश राष्ट्रकूल देशांमधील आहेत. आणि दोन्ही देशांचा सामायिक इतिहास हा लोकशाही, विविधता, स्वातंत्र्य आणि समान शासन रचनांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही देशांमधील मजबूत द्विपक्षीय संबंध हे दूरदृष्टीपूर्ण शासन ते शासन सहकार्य, दोन्ही देशांमधील जनतेचे परस्पर संबंध आणि व्यावसायिक हितसंबंधांचे एकात्मिकीकरण तीन या तीन महत्वाच्या स्तंभांवर आधारलेले असल्याचे ते म्हणाले.
दोन्ही देशांच्या शासनव्यवस्थेचे आराखडे मजबूत असून, ते आणखी बळकट होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर भारतीय समुदाय वसलेला असून, भारतातील ऑस्ट्रेलियन जनतेचा वाढता सहभाग त्याला पुरक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त संशोधन आणि विकास, नवोन्मेष, सह निर्मिती आणि सह उत्पादन या मूल्यांवर दोन्ही देशांची संरक्षण विषयक औद्योगिक भागीदारी आधारेली असून, या भागिदारीअंतर्गतच्या अनेक पैलुंचा लाभ करून घेण्याला अजूनही वाव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतात मेक इन इंडिया, उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या उपक्रमांमुळे नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारत उच्च दर्जाच्या प्रणालीच्या संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी ऑस्ट्रेलियन कंपन्यांचे स्वागत करत असल्याचे तथ्य संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले. यामध्ये प्रोपल्शन तंत्रज्ञान, स्वयंचलित पाणबुडी वाहने, फ्लाइट सिम्युलेटर आणि अत्याधुनिक साहित्य यांचा समावेश आहे. अशा उपक्रमांमुळे दोन्ही राष्ट्रांच्या धोरणात्मक उद्दिष्टांशी सुसंगत अशा एकत्र वापरता येणाऱ्या व्यासपीठाची उभारणी करता येऊ शकेल असे संरक्षण मंत्री म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी भविष्यात दोन्ही देशांसमोर असलेल्या अपार संधी अधोरेखित केल्या. “ नौदल जहाजे आणि त्यांचे उपघटक यांच्या संयुक्त निर्मितीच्या, जहाज दुरुस्ती, पुनर्बांधणी तसेच ऑस्ट्रेलियन आणि इतर भागीदार देशांच्या जहाजांसाठी भारतात देखभाल, दुरुस्ती आणि कार्यान्वयन (एमआरओ) सहाय्य पुरवण्याच्या, स्वयंचलित प्रणाली वरील संयुक्त संशोधन आणि विकास तसेच हरित जहाज बांधणी तंत्रज्ञानातील अगणित संधी आहेत” हे त्यांनी अधोरेखित केले. पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणून, संयुक्त क्षमता निर्माण करून आणि नवोन्मेषात गुंतवणूक करून, दोन्ही राष्ट्रे एक सशक्त, सुरक्षित आणि आत्मनिर्भर हिंद प्रशांत क्षेत्रात योगदान देऊ शकतात, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
"ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक समुदायाला भारतात गुंतवणूक, सहकार्य आणि नवोन्मेष करण्यासाठी मी आमंत्रित करतो. आपण एकत्रितपणे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करू शकतो, प्रगत प्लॅटफॉर्मस् तयार करू शकतो आणि आपले उद्योग केवळ पुरवठादार न राहता ते या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षिततेचे धोरणात्मक सक्षम घटक बनतील याची खात्री करू शकतो," हे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. संरक्षण मंत्र्यांनी उपस्थितांना या क्षणाचा फायदा घेऊन अशी भागीदारी निर्माण करण्याचे आवाहन केले जे केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीरच नाही तर धोरणात्मकदृष्ट्या परिवर्तनकारी देखील आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण भागीदारी एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या धोरणात्मक हितसंबंधांचे एकत्रीकरण, उद्योगक्षेत्रातील ऊर्जा आणि नेतृत्वाचे दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन यांच्या संगमामुळे या दोन राष्ट्रांना एकत्रितपणे भविष्य घडवण्याची एक अनोखी संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय, ऑस्ट्रेलियन संरक्षण विभाग, न्यूलँड ग्लोबल ग्रुप आणि ऑस्ट्रेलिया-भारत व्यवसाय परिषदेने संयुक्तपणे ही गोलमेज परिषद आयोजित केली होती. या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे संरक्षण सहाय्यक मंत्री पीटर खलील यांच्यासह दोन्ही देशांचे वरिष्ठ सरकारी अधिकारी, राजनैतिक नेते, उद्योग नेते, संशोधन संस्था आणि नवोन्मेषक उपस्थित होते.
***
सुवर्णा बेडेकर / तुषार पवार / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2177213)
आगंतुक पटल : 47