आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते तिसऱ्या 'तंबाखूमुक्त युवा अभियाना'चा शुभारंभ – तरुणांना तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे दूत बनण्याचे आवाहन
'स्वस्थ भारत, संपन्न भारत' हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, एकात्मिक 'तंबाखूमुक्त युवा अभियान' आणि 'नशामुक्त भारत अभियाना'द्वारे तंबाखू आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा सामना करण्यासाठी एकत्रित दृष्टिकोनाची गरज: राज्यमंत्री
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2025 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज इथे एका संयुक्त कार्यक्रमात 'तंबाखूमुक्त युवा अभियान 3.0' च्या तिसऱ्या आवृत्तीचा शुभारंभ केला.

तंबाखूचे सेवन हे सार्वजनिक आरोग्यापुढचे मोठे आव्हान आहे आणि मुले विशेषतः सिगारेट, विडी आणि धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थांच्या सुरुवातीच्या प्रयोगांना बळी पडतात, त्यामुळे अनेकदा आयुष्यभराचे व्यसन, जुनाट आजार आणि अकाली मृत्यू देखील होतो, असे अनुप्रिया पटेल यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या.
भारत सरकारने तंबाखूमुळे आरोग्याला असलेल्या धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत, यावर प्रकाश टाकत पटेल यांनी माहिती दिली की, चित्रपट, दूरदर्शन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तंबाखूचे चित्रण नियंत्रित करण्यात भारताने पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आरोग्यविषयक इशारे आणि तंबाखूविरोधी संदेश विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची खातरजमा होते. तंबाखूचा प्रसार मर्यादित करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक सिगारेटसह सर्व प्रकारच्या तंबाखूच्या जाहिराती, प्रसिद्धी आणि प्रायोजकत्वावर कठोरपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व तंबाखूजन्य उत्पादनांच्या पॅकेजिंगवर मोठे सचित्र आरोग्यविषयक इशारे अनिवार्य करण्यात आले आहेत, हा उपाय जागतिक स्तरावर सर्वात प्रभावी उपायांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 18 वर्षांखालच्या अल्पवयीन मुलांना आणि शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करायला सक्त मनाई आहे. देशभरात इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवरही पूर्णपणे बंदी आहे, असेही त्यांनी सांगितले.

तंबाखूचे सेवन हे अनेकदा अमली पदार्थांच्या सेवनाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते, हे ओळखून, हे अभियान भारत सरकारच्या 'नशामुक्त भारत अभियाना'शी जवळून जोडलेले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले की, दोन्ही उपक्रमांच्या संयुक्त प्रयत्नांतून, तरुणांच्या एकत्रित ऊर्जेतून आणि 'स्वस्थ भारत, संपन्न भारत' या उद्दीष्टाच्या आधारे, भारत तंबाखू नियंत्रण आणि अमली पदार्थ सेवन प्रतिबंधात जागतिक नेता बनण्याची वाटचाल करत आहे.

जागतिक तंबाखू सर्वेक्षणाने लोकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची दखल घेतली आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी या प्रसंगी अधोरेखित केले.
शुभारंभ कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
1. सर्व उपस्थितांनी तंबाखूमुक्त राहण्यासाठी 'तंबाखूला नाही म्हणा' ही विस्तारित शपथ घेतली, त्यानंतर विद्यार्थी आणि सेलिब्रिटींसोबत एक गट छायाचित्र सत्र झाले.
2. शैक्षणिक साधनसंपत्तीचे प्रकाशन:
3. व्हॉइस ऑफ टोबॅको व्हिक्टिम्स (VoTV) कडून अनुभव कथन. यात एका भावनिक व्हिडिओ सादरीकरणाद्वारे तंबाखू-संबंधित आरोग्य आव्हानांवर मात केल्याचे अनुभव सांगण्यात आले.
4. NIMHANS बंगळूरू इथे चौथ्या राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण.
5. दोन मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन – आयुष संस्थांमध्ये तंबाखू मुक्ती केंद्रे स्थापन करण्यासाठीच्या कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना आणि तंबाखू मुक्तीसाठी राष्ट्रीय धोरणात्मक कृती योजना.
6. पहिल्या अभियानादरम्यान प्रसिद्ध झालेल्या 'आज जिंदगी जीते हैं' या प्रेरणादायी गीतावर एक उत्साहवर्धक सामूहिक सादरीकरण.
7. प्रसिद्ध बाइकिंग गटांद्वारे जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन.
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176955)
आगंतुक पटल : 32