वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-कतार धोरणात्मक आर्थिक भागीदारी मजबूत करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कतार येथे दिली भेट

प्रविष्टि तिथि: 08 OCT 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कतार चे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैजल बिन थानी बिन फैजल अल थानी यांच्यासमवेत भारत-कतार संयुक्त आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्य आयोगाचे सह-अध्यक्ष भूषविण्यासाठी कतार मध्ये दोहा येथे अधिकृत भेट दिली.

फेब्रुवारी 2025 मध्ये कतारचे अमीर यांच्या भारत भेटीदरम्यान व्यापार आणि वाणिज्य या विषयावरील पूर्वीच्या संयुक्त कार्यगटाचा दर्जा उंचावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर श्रेणी सुधारणा करण्यात आलेल्या संयुक्त आयोगाची ही पहिली बैठक होती. या भेटी दरम्यान, दोन्ही बाजूंनी परस्परांबरोबरचे द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठीच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

बैठकीची फलनिष्पत्ती:

  • एकूण व्यापाराचा आढावा घेतला (2024-25 मध्ये 14 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य) आणि वस्तू आणि सेवांमधील भारता बरोबरच द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी आणि त्यामध्ये विविधता आणण्यासाठीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
  • 2030 साला पर्यंत ऊर्जा, पायाभूत सुविधा, उत्पादन, वित्त, तंत्रज्ञान आणि हरित विकासामधील नवीन संधींसह द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे सामायिक उद्दिष्ट निर्धारित केले.
  • भारत-कतार सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर (सीईपीए) औपचारिक वाटाघाटी सुरू करण्यासाठी संदर्भ अटी (टीओआर) अंतिम करण्याचे काम जलद गतीने करण्यावर सहमती दर्शवली.
  • कतारचे अमीर यांच्या भारत भेटीदरम्यान कतारने भारतासाठी 10 अब्ज डॉलर्स घोषित केले होते, यावर सहमती झाली, आणि परस्पर फायदेशीर गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग खुले करण्यासाठीच्या वचनबद्धतेवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
  • डिजिटल अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, कृषी, पर्यटन, संस्कृती आणि पर्यावरण यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये सहकार्यावर भर देण्यात आला.

बैठकीच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी कतारमधील मान्यवर आणि व्यावसायिक नेत्यांबरोबर उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका घेतल्या. यावेळी अन्न सुरक्षा, व्यापार वित्तपुरवठा, प्रकल्प भागीदारी यासारख्या विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या आणि भारताच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक क्षेत्रात कतार मधील संस्थांसाठी गुंतवणुकीच्या संधी शोधण्याच्या उपायांवर, मार्गांवर चर्चा झाली.

गोयल यांनी भारत-कतार संयुक्त व्यापार परिषदेच्या (जेबीसी) पहिल्या बैठकीलाही संबोधित केले. फिक्की, सीआयआय, असोचॅम आणि कतार चेंबरचे वरिष्ठ व्यावसायिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर गोयल यांनी नंतर कतारी बिझनेसमेन असोसिएशन (क्यूबीए) च्या सदस्यांशी संवाद साधला.

विकसित Bharat@2047 च्या दृष्टीकोनातून सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष, उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून भारताची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

डिजिटल सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, गोयल यांनी कतारमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा सुरू केली. यामुळे तिथला भारतीय समुदाय आणि स्थानिक ग्राहकांना अखंड डिजिटल व्यवहार करता येतील.

त्यांनी इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल्स कौन्सिल (आयबीपीसी), इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या दोहा चॅप्टरच्या सदस्यांशी आणि कतारमधील चैतन्यशील भारतीय समुदायाशी संवाद साधला, आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठीचा महत्वाचा दुवा म्हणून, त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.

परस्पर विश्वास, ऊर्जा सहकार्य, तांत्रिक सहकार्य आणि उभय देशांमधील लोकांचे मजबूत संबंध यावर आधारित दोन्ही देशांदरम्यान दूरदर्शी, वैविध्यपूर्ण आणि लवचिक आर्थिक भागीदारीसाठी भारत आणि कतारच्या सामायिक दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करून, या भेटीचा समारोप झाला.

गोपाळ चिपलकट्टी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2176573) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Malayalam