वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-ब्रिटनच्या व्यापार मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक मुंबईत संपन्न
भारत-ब्रिटन संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीसाठी दृष्टिकोन निर्धारित करण्यात आला जेणेकरून भारत-ब्रिटन सीईटीए मध्ये लाभ होईल आणि द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक दृढ होतील
Posted On:
08 OCT 2025 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार मंत्री पीटर काइल यांनी आज मुंबईत भारत-ब्रिटन व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीसाठी एक नवीन रूपरेखा तयार करण्यासाठी द्विपक्षीय बैठक घेतली.
भारत- ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए) कार्यान्वित करण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल होती , ज्यात दोन्ही मंत्र्यांनी अंमलबजावणी आणि वितरण यावर देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती पुनर्स्थापित करण्यास सहमती दर्शविली.
दोन्ही मंत्र्यांनी कराराची जलद, समन्वित आणि परिणाम-केंद्रित अंमलबजावणी सुनिश्चित करण्याप्रति आपली वचनबद्धता अधोरेखित केली ज्याचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि ग्राहकांसाठी त्याची पूर्ण क्षमता वापरणे हा होता.
मंत्र्यांनी प्रगत उत्पादन, डिजिटल व्यापार, स्वच्छ ऊर्जा आणि सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही अर्थव्यवस्थांमधील पूरकतेचा लाभ उठवत 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या त्यांच्या सामायिक महत्त्वाकांक्षेला दुजोरा दिला.
सीईटीएच्या परिवर्तनकारी व्याप्तीवर भर देत, मंत्र्यांनी नियामक सहकार्य, बिगर-शुल्क अडथळे दूर करणे आणि पुरवठा साखळी एकीकरणाला प्रोत्साहन देत त्याचे जास्तीत जास्त लाभ मिळवण्याबाबत चर्चा केली.
अतिशय फलदायी अशा वाणिज्य सचिव आणि महासंचालक-स्तरीय बैठकीने मंत्रीस्तरीय बैठकीसाठी दिशा निश्चित केली , ज्यामुळे दिवसभर चालणाऱ्या लक्षवेधी आणि भविष्यवेधी चर्चेसाठी एक मजबूत पाया घातला गेला.
द्विपक्षीय बैठकीपूर्वी, प्रगत उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तू, अन्न आणि पेय, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, बांधकाम, पायाभूत सुविधा आणि स्वच्छ ऊर्जा आणि वित्तीय, व्यावसायिक आणि व्यवसाय सेवा (आयटी/आयटीईएस, शिक्षण आणि अभियांत्रिकी) सह प्राधान्य क्षेत्रांमध्ये अनेक क्षेत्रीय गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या. या संवादांमुळे भारतीय आणि ब्रिटिश उद्योग जगतातील प्रमुख एकत्र आले आणि अंमलबजावणीच्या मार्गदर्शनासाठी मौल्यवान सूचना प्रदान केल्या.
भारत-ब्रिटन सीईओ मंच देखील आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि नवोन्मेषाच्या नवीन संधींवर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांमधील व्यावसायिक नेते एकत्र आले. भारत आणि ब्रिटनमधील प्रमुख उद्योग प्रतिनिधींच्या सह-अध्यक्षतेखाली, हा मंच द्विपक्षीय आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करत होता. भारत-ब्रिटन सीईटीए द्वारे बळकट झालेली आधुनिक, परस्पर हितावह आणि शाश्वत आर्थिक भागीदारी पुढे नेण्यासाठी भारत आणि ब्रिटन यांच्या सामायिक वचनबद्धतेचा या चर्चेत पुनरुच्चार करण्यात आला.
दोन्ही मंत्र्यांनी जागतिक व्यापार आणि आर्थिक दृष्टिकोनावरही विचारांची देवाणघेवाण केली, सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी उभारण्याचे महत्त्व त्यांनी मान्य केले. गोयल यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख विकास इंजिन म्हणून भारताचा उदय अधोरेखित केला तर सचिव काइल यांनी भर देत नमूद केले की ब्रिटनचा भारतासोबतचा करार हा आतापर्यंतचा सर्वोत्तम करार आहे, जो ब्रिटिश व्यवसायांना या विशाल बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आणि देशांतर्गत विकास , नोकऱ्या आणि समृद्धीला चालना देण्यासाठी प्रथम स्थान देतो.
बैठकीचा समारोप व्यवसाय पूर्ण सत्राने झाला ज्यात दोन्ही बाजूंचे वरिष्ठ उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी आधुनिक, समावेशक आणि परस्पर हितावह व्यापार भागीदारी पुढे नेण्याचा आणि विकास , गुंतवणूक आणि नवोन्मेषासाठी नवीन संधीचा शोध घेण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176558)
Visitor Counter : 6