युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जागतिक शिक्षक दिनी डॉ. मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतल्या शिक्षकांचा 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल'
उपक्रमाच्या 43व्या आवृत्तीत देशभरात 10,000 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी उपक्रमाचे आयोजन
Posted On:
05 OCT 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी राष्ट्रीय राजधानीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर 'जागतिक शिक्षक दिना'निमित्त 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' या उपक्रमाच्या 43 व्या आवृत्तीचे नेतृत्व केले. हा उपक्रम देशभरातील 10,500 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात दिल्लीतील शिक्षणतज्ज्ञांसह 1,000 हून अधिक सहभागींनी, तसेच खेळाडू, फिटनेस प्रभावक आणि युवकांनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य अभिषेक नैन, बुद्धिबळपटू तानिया सचदेव, उदयोन्मुख भालाफेकपटू सचिन यादव आणि 'भारताचा पुश-अप मॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहताश चौधरी यांचा समावेश होता. या वेळी शिक्षकांना समर्पित 'नुक्कड नाटक', योग सत्र, दोरीवरच्या उड्या, तंदुरुस्तीसंबंधी खेळ आयोजित करण्यात आले.

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. मांडवीय यांनी या उपक्रमाला 'खऱ्या अर्थाने देशव्यापी चळवळ' असे संबोधले. या चळवळीमुळे 10,500 पेक्षा जास्त ठिकाणी लाखों नागरिक दर रविवारी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकल चालवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'फिट इंडिया' संकल्पनेचा हा एक उत्सव बनला आहे, असे ते म्हणाले.
जर प्रत्येक नागरिकाने शारीरिक हालचालींसाठी रोज एक तास जरी दिला, तर भारत 'विकसित भारत' च्या स्वप्नाकडे अधिक मजबूत, निरोगी आणि एकत्रितपणे वाटचाल करेल. आज अनेक शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना जीवनात समतोल राखण्याचा संदेश दिला आहे. सायकलची पेडल आपल्याला आपण समतोल राखूनच पुढे जाऊ शकतो, हा जीवनातील सर्वात मोठा धडा शिकवतात. हा समतोल जीवनाचा आधार आहे आणि तो तंदुरुस्तीतून येतो, असे ते यावेळी म्हणाले.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांनी 'सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया', 'योगासन भारत' आणि 'माय भारत' यांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही सायकलिंग चळवळ आता भारतातल्या सर्वात प्रभावी तंदुरुस्ती मोहिमांपैकी एक म्हणून प्रस्थापित झाली आहे.
दरम्यान, “पुश-अप मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक तसेच फिट इंडिया मूव्हमेंटचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेले रोहताश चौधरी यांनी या कार्यक्रमादरम्यान डॉ. मनसुख मांडविया यांना माहिती दिली की, ते आणखी एका गिनीज जागतिक विक्रमाच्या प्रयत्नासाठी सज्ज आहेत, पाठीवर 60 पौंड वजन घेऊन एका तासात सर्वाधिक पुश-अप्स करण्याचा प्रयत्न ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे करणार आहेत.
अभिषेक नैन यांनी नवी दिल्लीतील या उपक्रमाबाबत उत्कट भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “खेळाडू म्हणून आमच्यासाठी तंदुरुस्ती हीच पायाभूत गोष्ट आहे. येथे मी केवळ लोकांना सायकल चालवताना पाहत नाही, तर भारताला आरोग्य संस्कृती आत्मसात करताना पाहतो आहे. गेल्या काही महिन्यांत हा उपक्रम किती व्यापक झाला आहे हे पाहून प्रेरणा मिळते.”

ग्रँडमास्टर तानिया सचदेव, ज्यांनी 'संडेज आॅन सायकल` अर्थात रविवारी सायकलस्वारी या उपक्रमात दुसऱ्यांदा सहभाग घेतला, म्हणाल्या, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे मला कौतुक वाटते, ते खेळांचे मोठे समर्थक आहेत आणि त्यांनी तंदुरुस्तीला लोकचळवळीत रूपांतरित केले आहे.
हा उपक्रम दर्शवतो की, तंदुरुस्तीमुळे समाज कसा एकत्र येऊ शकतो. आज शिक्षक, विद्यार्थी आणि खेळाडू एकत्र सायकल चालवत असल्याचे दृश्य मनाला आनंद देणारे होते.”
आतापर्यंत 43 आवृत्त्यांनंतर, फिट इंडिया संडेज आॅन सायकल या उपक्रमाला देशभरातील 1,00000 हून अधिक ठिकाणांहून सहभाग लाभला असून, 12 लाखांहून अधिक नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/नितिन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175121)
Visitor Counter : 4