गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गोवा राज्य सरकारच्या ‘म्हाजे घर योजना’ आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
‘म्हाजे घर योजना’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारच्या कार्यक्षम प्रशासन, संवेदनशील कारभार आणि सुधारणांसाठी केलेल्या कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे
आज, एकाच कार्यक्रमात, गोवा सरकारने 10 लाख लोकांना स्वतःच्या घरांचे मालक बनवले आहे
आज, एकूण 2,452 कोटी रुपये खर्चाच्या 21 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले, ही गोव्याच्या विकासात मोठी झेप आहे
Posted On:
04 OCT 2025 9:43PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गोवा सरकारच्या ‘म्हाजे घर योजना’ आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज सुरू झालेली ‘म्हाजे घर योजना’ केवळ सरकारी योजना नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारच्या सक्षम प्रशासन, संवेदनशील कारभार आणि सुधारणांच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले. सुमारे 11 प्रकारच्या कायदेशीर गुंतागुंतीत अडकलेल्या गोव्याच्या लाखो नागरिकांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क देणे, हे सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या चमूने एकच कायदा लागू करून सर्व प्रकारच्या विसंगती दूर केल्यामुळे गोव्याच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येला फायदा झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, कायदेविषयक अडचणीत अडकलेल्या 10 लाख नागरिकांना एकाच कार्यक्रमातून आज त्यांच्या घरांचे मालकी हक्क देण्यात आले आहेत. यासोबतच, 2,452 कोटी रुपये खर्चाच्या 21 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही आज करण्यात आले आहे. हा गोव्याच्या विकासातील एक मोठा टप्पा असून, हे सर्व उपक्रम समृद्ध आणि विकसित गोवा निर्माण करण्यात योगदान देतील.
अमित शाह म्हणाले की, 2014 मध्ये गोव्याचे दरडोई उत्पन्न 1,12,073 रुपये इतके होते, जे 2023-24 मध्ये वाढून 3,57,000 रुपये झाले आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना आरक्षणाचे फायदे मिळत नव्हते, परंतु आता त्यांना विधानसभेत आरक्षित जागांद्वारे प्रतिनिधित्व मिळेल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत "विकसित भारत" हे ध्येय ठेवले आहे, परंतु गोव्यात ज्या वेगाने समस्यांचे निराकरण केले जात आहे, त्या वेगाने गोवा देशातील पहिले पूर्ण विकसित राज्य बनेल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

या दिवाळीत आपण सर्वांनी एक संकल्प घ्यावा की आपण आपल्या घरात कोणत्याही परदेशी बनावटीच्या वस्तू वापरणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. जर देशातील सर्व 140 कोटी नागरिकांनी केवळ स्वदेशी उत्पादने खरेदी केली आणि वापरली तर भारत लवकरच खऱ्या अर्थाने महान राष्ट्र बनेल, असे ते म्हणाले.
प्राप्तिकर सवलती तसेच वस्तू आणि सेवा करात सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांची क्रय शक्ती वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षात गोव्याला भारतातील पहिले पूर्ण विकसित राज्य बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे असे शाह यांनी सांगितले. गोवा हे भारतमातेच्या कपाळावरील कुंकवासारखे आहे, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले. गोव्याचा विकास इतर अनेक राज्यांना प्रगतीच्या त्याच मार्गावर चालण्यास प्रेरित करेल, असेही ते म्हणाले.
***
निलिमा चितळे / निखिलेश चित्रे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2174922)
Visitor Counter : 13