श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारताच्या उभारणीत प्रवासी भारतीयांची भूमिका मोलाची; कामगारांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध - डॉ. मनसुख मांडवीय

Posted On: 03 OCT 2025 4:31PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज मलेशियातील भारतीय कामगार समुदायाशी संवाद साधला. भारताच्या विकास यात्रेत प्रवासी भारतीयांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आणि 'विकसित भारत@2047' हे स्वप्न साकार करण्यासाठी परदेशातल्या भारतीय समुदायाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जगभरात भारतीय वंशाचा तिसरा सर्वात मोठा समुदाय मलेशियात वास्तव्याला असून, इथे भारतीय वंशाच्या लोकांची संख्या 29 लाखांहून अधिक आहे. या समुदायाचे कौतुक करताना, इथल्या भारतीयांनी आपली सांस्कृतिक मुळे जपतानाच विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे मांडवीय यांनी सांगितले. त्यांनी मलेशियाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले असून भारत-मलेशिया संबंध अधिक दृढ केले आहेत, असेही ते म्हणाले.

दोन्ही देशांमधल्या आर्थिक भागीदारीवर भर देताना, तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसह 150 हून अधिक भारतीय कंपन्या मलेशियामध्ये कार्यरत आहेत असे त्यांनी नमूद केले. त्याच वेळी, सुमारे 70 मलेशियन कंपन्या भारतात पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, दूरसंचार, तेल आणि वायू, ऊर्जा आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

परदेशातील भारतीय कामगारांच्या कल्याणासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार डॉ. मांडवीय यांनी केला. कामगारांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने ऑगस्ट 2024 मध्ये मलेशियासोबत झालेला 'कामगार भरती, रोजगार आणि प्रत्यावर्तन' यासंबंधी सामंजस्य करार हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, परदेशातील भारतीय कामगारांना अपघाती मृत्यू, अपंगत्व, वैद्यकीय आणीबाणी आणि मायदेशी परतण्यासाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण देणाऱ्या 'प्रवासी भारतीय विमा योजनेचा' लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय समुदायाला सरकारच्या सततच्या पाठिंब्याचे आश्वासन देताना, “तुमचे हक्क संरक्षित व्हावेत, तुमचा आवाज ऐकला जावा आणि मायदेशात तुमची कुटुंबे सुरक्षित राहावीत, याची खातरजमा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असे डॉ. मांडवीय म्हणाले.

***

गोपाळ चिप्पलकट्टी / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2174587) Visitor Counter : 9