वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये निर्यात भागीदार ‘अपेडा’ने घडविले भारताच्या कृषी-आहार सामर्थ्याचे प्रदर्शन


अपेडाच्या विक्री-खरेदीदारांच्या सभेला 530 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची उपस्थिती; 4,600 पेक्षा अधिक बीटूबी बैठका

Posted On: 02 OCT 2025 6:24PM by PIB Mumbai

 

वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण – ‘अपेडा’ वर्ल्ड फूड इंडिया (डब्ल्यूएफआय) 2025च्या चौथ्या आवृत्तीत निर्यात भागीदार म्हणून सहभागी झाले. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपम, प्रगती मैदान इथे झाला.

अपेडाच्या पॅव्हेलियनमध्ये 142 प्रदर्शक व 120 दुकानांच्या माध्यमातून भारतातील कृषी-आहार क्षेत्राची विविधता मांडली होती. त्यामध्ये ‘जीआय’अंकित उत्पादने जसे की बासमती तांदळासह, बाजरी, सेंद्रिय उत्पादने, पशुधन उत्पादने आणि मूल्यवर्धित अन्नपदार्थांचा समावेश होता. तसेच जीआय गॅलरी, फ्रेस्का क्षेत्र, बासमती निर्यात विकास संस्थेचा स्टॉल, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करणारे भारती झोन असे विशेष संकल्पनाधारित विभाग होते.

निर्यात भागीदार म्हणून अपेडाने आयोजित केलेल्या विक्रेते-खरेदीदारांच्या सभेत (रिव्हर्स बायर-सेलर मिट) 68 देशांतील 530 हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले. यात वॉलमार्ट, नेस्टो, अल् मदीना, मुस्तफा सिंगापूर आणि चोइथराम आदी प्रमुख सुपरमार्केट साखळ्यांचा समावेश होता. या दरम्यान 4,654 निवडक बीटूबी बैठका झाल्या. त्यामुळे भारतीय निर्यातदार व स्टार्टअप्सना नवीन बाजारपेठा, नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करणे आणि दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले.

अपेडाने 25 सप्टेंबर 2025 रोजी लुलु हायपरमार्केट एलएलसीसह धोरणात्मक सामंजस्य करार करून जागतिक बाजारपेठेतील प्रवेशाला बळकटी दिली. भारती अर्थात भारताचे हब फॉर ॲग्रिटेक रेझिलिअन्स, ॲडव्हान्समेंट ॲण्ड इनक्युबेशन फॉर एक्स्पोर्ट एनेबलमेंटच्या उपक्रमांतर्गत सहयोगामुळे जीसीसीमधील लुलुच्या 252 दुकानांमध्ये भारतीय कृषी-आहार स्टार्टअप्सना जागा, उत्पादन चाचणी मोहिमा, ग्राहक संवाद आणि जागतिक वितरणासाठी लुलुच्या निर्यात विभागात प्रवेश मिळणार आहे.

भारती उपक्रम हा डब्ल्यूएफआय 2025 मधील एक प्रमुख आकर्षण ठरला. या उपक्रमासाठी विशेष स्टॉल व ‘फार्म टू ग्लोबल मार्केट्स - स्टार्टअप-ड्रिव्हन इनोव्हेशन फॉर अॅग्री-फूड एक्स्पोर्ट्स’ अर्थात ‘शेतातून जागतिक बाजारपेठेपर्यंत – कृषी-आहाराच्या निर्यातीसाठी स्टार्टअपमार्फत नवकल्पना’ या विषयावरील परिसंवाद घेण्यात आला. त्यामध्ये धोरणकर्ते, उद्योजक, नेते व नवोन्मेषक सहभागी झाले. त्यांच्यात 100 कृषी-आहार स्टार्टअप्सना मार्गदर्शन, ब्रँडिंग, तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि जागतिक बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक चर्चा झाली.

या वेळी बोलताना अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितले की भारताची कृषी-आहार क्षमता जगासमोर मांडण्याच्या प्रक्रियेत वर्ल्ड फूड इंडिया 2025 हा मैलाचा टप्पा ठरले आहे. निर्यात भागीदार म्हणून अपेडाने 140 हून अधिक प्रदर्शक व 68 देशांतील 500 हून अधिक खरेदीदारांना एकत्र आणले, हजारो व्यावसायिक बैठकांना व्यासपीठ मिळवून दिले, निर्यातदारांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या. लुलु हायपरमार्केटसोबतचा करार आणि भारती उपक्रम साकारले. स्टार्टअप्सना सक्षम करण्याप्रती अपेडाची बांधिलकी, आंतरराष्ट्रीय भागीदारी बळकट करणे आणि भविष्यासाठी नवोन्मेषाधारित निर्यात परिसंस्था उभारण्याप्रती कटिबद्धता यातून दिसून आली.

***

शैलेश पाटील / रेश्मा बेडेकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2174321) Visitor Counter : 11
Read this release in: English