भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासनात तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे आयआयपीए परिषदेच्या बैठकीत आवाहन


आयआयपीएने नवीन नांदेड शाखेच्या स्थापनेसह केला विस्तार, सहा महिन्यांत 49 प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 29 SEP 2025 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2025

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या (आयआयपीए) कार्यकारी परिषदेच्या तीनशेसत्तासिवाव्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. जितेंद्र सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मंच आणि डेटा-चालित साधनांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह प्रशासकीय प्रशिक्षणाचे अधिक सक्षमपणे एकत्रीकरण करण्याच्या गरजेवर भर दिला.

अनेकदा प्रशासकीय पदांवरील वरिष्ठ स्थानांवर नेमणूक होणाऱ्या शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांना - परीपूर्ण प्रशासकीय ज्ञान आणि संवाद कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे महत्त्व आपल्या भाषणात, डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले.“भारतात वैज्ञानिक प्रतिभा मोठ्या प्रमाणावर आढळते, परंतु अशाप्रकारचे नेतृत्व करणाऱ्यांसाठी संस्थात्मक व्यवस्थापन आणि प्रशासकीय अभिमुखतेचे संरचित प्रशिक्षण आवश्यक आहे,"असे ते पुढे म्हणाले.

प्रशासनात सामाजिक माध्यमांच्या बदलत्या भूमिकेवरही मंत्र्यांनी भाष्य केले आणि अधिकाऱ्यांना त्यांचा जबाबदार वापर करण्याबद्दल संवेदनशीलता बाळगण्याचे आवाहन केले.त्यांनी सामाजिक मीडिया माध्यमांवर "काय करावे आणि काय करू नये" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याचे आवाहन केले, तसेच चुकीची माहिती मिळाल्याचे धोके आणि विश्वासार्ह सार्वजनिक संप्रेषणाची आवश्यकता लक्षात घेतली पाहिजे यावर भर दिला.

कार्यकारी परिषदेने मागील बैठकांचे इतिवृत्त पुष्टी, 2024–25 चा वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे, नवीन आजीवन सदस्यांचा प्रवेश आणि महाराष्ट्रातील नांदेड येथे नवीन स्थानिक शाखा स्थापन करणे यासह अनेक विषय सूचीतील बाबींना यावेळी मान्यता दिली.

यावेळी वार्षिक पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली : पॉल एच. अ‍ॅपलबी पुरस्कार 2025 भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त (आयएएस) अधिकारी मीनाक्षी हूजा यांना प्रदान करण्यात आला, तर डॉ. राजेंद्र प्रसाद पुरस्कार 2025 राव्हेनशॉ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. प्रकाश सी. सारंगी यांना देण्यात आला.

परिषदेने आयआयपीएच्या अलीकडील सहयोगाची देखील दखल घेतली. एप्रिल ते सप्टेंबर 2025 दरम्यान, आयआयपीए ने 49 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले ज्यामुळे 2,809 अधिकाऱ्यांना  लाभ झाला आणि सहा संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून त्यापैकी  21 प्रकल्प चालू आहेत.

एक प्रमुख प्रशिक्षण आणि संशोधन संस्था म्हणून, आयआयपीए ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य वाढवत राहावे आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असे आपले कार्य ठेवावे  यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. "जिल्हे, स्थानिक सरकार आणि खाजगी भागधारकांपर्यंत पोहोचून, आयआयपीए भारत भविष्यासाठी उत्तम प्रशासन परिसंस्था तयार करेल याची सुनिश्चिती  करू शकते," असे ते पुढे म्हणाले.

 

* * *

निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172848) Visitor Counter : 9
Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi