वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
युरोपीय मुक्त व्यापार संघटनेच्या सदस्य देशांसोबतचा मुक्त व्यापार करार 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार: उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांची घोषणा
अमेरिका, न्यूझीलंड, ओमान, पेरू आणि चिलीसोबत भारताची व्यापार चर्चा; युरेशियासोबतच्या कराराची रूपरेषा निश्चित: पीयुष गोयल
एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम 750 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पोहोचला, खादी, कापूस आणि कुटीर उद्योगांना चालना: पीयुष गोयल
Posted On:
29 SEP 2025 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025
आईसलँड, लिक्टेनस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या युरोपीय मुक्त व्यापार संघटनेच्या सदस्य देशांसोबत मार्च 2024 मध्ये झालेला मुक्त व्यापार करार 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी आज उत्तरप्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या समारोप सत्राला संबोधित करताना सांगितले. विकसित देश भारतासोबत मुक्त व्यापार करार करायला उत्सुक आहेत अशी माहिती गोयल यांनी यावेळी दिली. भारताने यापूर्वीच संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन सोबत असे करार केले आहेत. भारताची परकीय गंगाजळी 700 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे.
अमेरिका, युरोपीय संघ, न्यूझीलंड, ओमान, पेरू आणि चिलीसोबतही भारत चर्चा करत आहे, तर कतार आणि बहारीननेही यात रस दाखवला आहे, असे गोयल यांनी सांगितले. युरेशियासोबतच्या कराराची रूपरेषा निश्चित झाली असून त्यातून भारताचे मजबूत जागतिक स्थान दिसून येते, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या काळात राष्ट्राला एक परिवर्तनकारी सुधारणेची भेट दिली आहे असे गोयल यांनी अलीकडे झालेल्या वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांविषयी बोलताना सांगितले.
केंद्र सरकार आता ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे आणि सर्वसमावेशक वाढ आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांसोबत मिळून काम करत आहे असे गोयल यावेळी म्हणाले.
आपल्या भाषणात त्यांनी उत्तर प्रदेशच्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला. व्यापाराला आणि उद्योगाला बळकटी देण्यासाठी आपल्या सक्रिय दृष्टिकोनाचे दर्शन घडवत, एक स्वतंत्र 'निर्यात प्रोत्साहन मंत्रालय' स्थापन करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य असल्याचे गोयल यांनी सांगितले.
त्यांनी 'एक जिल्हा, एक उत्पादन' उपक्रमाच्या भूमिकेवर भर दिला. हा उपक्रम आता देशभरात 750 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे, असे ते म्हणाले. गोयल यांनी पुढे माहिती दिली की, 'एक जिल्हा, एक उत्पादन' अंतर्गत 1200 हून अधिक उत्पादनांवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे आणि या उत्पादनांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कठोर परिश्रम घेत आहेत.
अशा जिल्हास्तरीय उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात 'युनिटी मॉल्स' उभारले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याने लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग महिला उद्योजक, स्वदेशी उत्पादने आणि निर्यातोन्मुख घटकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172783)
Visitor Counter : 13