पंतप्रधान कार्यालय
ब्रिक्स परिषदेदरम्यानच्या जागतिक प्रशासनातील सुधारणा या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
Posted On:
06 JUL 2025 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2025
महामहिम,
सन्माननीय सदस्यगण,
नमस्कार!
17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनापासून आभार मानतो. ब्राझीलच्या बहुआयामी अध्यक्षतेखाली, आपल्या ब्रिक्स सहकार्याला एक नवी गती आणि ऊर्जा मिळाली आहे. आणि मी हे सांगू इच्छितो की, आम्हाला जी ऊर्जा मिळाली आहे, ती फक्त एक ‘एस्प्रेसो’ नाही, तर ती ‘डबल एस्प्रेसो शॉट’ आहे! यासाठी, मी राष्ट्राध्यक्ष लुला यांच्या दूरदृष्टीचे आणि त्यांच्या दृढ वचनबद्धतेचे कौतुक करतो. भारताच्या वतीने, मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे, इंडोनेशियाचा ब्रिक्स कुटुंबात समावेश झाल्याबद्दल, मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.
मित्रहो,
ग्लोबल साउथ अंतर्गतच्या देशांना अनेकदा दुहेरी दर्जाच्या प्राधान्याचा सामना करावा लागला आहे. विकास असो, साधन संपत्ती वाटप असो किंवा सुरक्षेशी संबंधित बाबी असोत, ग्लोबल साउथ अंतर्गतच्या देशांच्या हितांना पुरेसे महत्त्व दिले गेलेले नाही. हवामान विषयक वित्तपुरवठा, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यांसारख्या विषयांवर ग्लोबल साउथला केवळ प्रतीकात्मक प्रतिसादच मिळाला आहे.
मित्रहो,
20 व्या शतकात अस्तित्वात आलेल्या जागतिक संस्थांमध्ये आजही दोन-तृतीयांश लोकसंख्येला योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक देशांना अद्याप निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत स्थान मिळालेले नाही. हे केवळ प्रतिनिधित्वाशी संबंधित नाही, तर ते विश्वासार्हता आणि परिणामकारकतेशी देखील संबंधित आहे. ग्लोबल साउथशिवाय, या संस्था म्हणजे सिम कार्ड असूनही नेटवर्क नसलेल्या मोबाइल फोनसारख्या आहेत. त्या योग्य प्रकारे कार्य करू शकत नाहीत अथवा 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करू शकत नाहीत. जगभरात सुरू असलेले संघर्ष, महामारी, आर्थिक संकटे किंवा सायबर आणि अंतराळ क्षेत्राशी संबंधित उदयाला येणारी आव्हाने असोत, या संस्था उपाययोजना प्रदान करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत.
मित्रहो,
आज जगाला एका नव्या बहुध्रुवीय आणि सर्वसमावेशक जागतिक व्यवस्थेची गरज आहे. याची सुरुवात जागतिक संस्थांमधील सर्वसमावेशक सुधारणांपासून करावी लागेल. या सुधारणा केवळ प्रतीकात्मक नसाव्यात, तर त्यांचा खरा परिणामही दिसला पाहिजे. प्रशासकीय रचना, मतदानाचा अधिकार आणि नेतृत्वाच्या पदांमध्ये बदल करण्याची गरज आहे. ग्लोबल साउथ अंतर्गतच्या देशांसमोरील आव्हानांना धोरण निर्मितीमध्ये प्राधान्य दिले गेले पाहिजे.
मित्रहो,
ब्रिक्सचा विस्तार आणि नव्या भागीदारांचा समावेश, यातून काळाबरोबर बदलण्याची ब्रिक्सची क्षमता दिसून येते. आता, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना आणि बहुपक्षीय विकास बँका यांसारख्या संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा असाच निर्धार आपण दाखवला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, जिथे तंत्रज्ञान दर आठवड्याला बदलत राहते, तिथे जागतिक संस्था ऐंशी वर्षे सुधारणांशिवाय राहणे अस्वीकार्य आहे. 21 व्या शतकातील सॉफ्टवेअर, तुम्ही 20 व्या शतकातील टाइपरायटरवर चालवू शकत नाही!
मित्रहो,
भारताने सदैव स्वतःच्या हितांच्या पलीकडे जावून मानवतेच्या हितासाठी काम करणे आपले कर्तव्य मानले आहे. आम्ही सर्व बाबींमध्ये ब्रिक्स देशांसोबत काम करण्यासाठी आणि आमचे ठोस योगदान देण्यासाठी पूर्णतः वचनबद्ध आहोत. खूप खूप धन्यवाद.
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169090)
Visitor Counter : 8
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam