संरक्षण मंत्रालय
भारतीय संरक्षण अभियांत्रिकी सेवा विभागाचा 76 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
Posted On:
18 SEP 2025 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2025
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील एका गट अ संवर्गांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय संरक्षण अभियांत्रिकी सेवा विभागाच्या वतीने 17 सप्टेंबर 2025 रोजी आपला 76 वा स्थापना दिवस साजरा केला. दिल्ली कॅन्ट येथील मानेकशॉ सेंटरमध्ये हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण सज्जतेला बळकट करण्यात भारतीय संरक्षण अभियांत्रिकी सेवा विभागाचे अधिकारी बजावत असलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. सुरक्षा विषयक बदलत्या परिस्थितीमुळे उदभवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
0EDP.JPG)
या सोहळ्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला. संरक्षण मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयातील वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारतीय संरक्षण अभियांत्रिकी सेवा विभागाची स्थापना 17 सप्टेंबर 1949 रोजी झाली होती. हा भारताच्या संरक्षण अभियांत्रिकी क्षेत्रातला एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. या संवर्गातील अधिकारी देशभरातील लष्करी तळांवर कार्यरत आहेत आणि ते लष्कर, नौदल, वायुसेना, तटरक्षक दल तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसाठी निवासी निवासस्थाने, तांत्रिक आणि प्रशासकीय इमारतींपासून ते विमानतळ, हँगर्स, नौदल जेटी, रुग्णालये आणि विशेष सुविधांपर्यंतच्या संरक्षण विषय पायाभूत सुविधांची बांधकामे आणि देखभालीची जबाबदारी सांभाळत आहेत.
जयदेवी पुजारी-स्वामी/तुषार पवार/प्रिती मालंडकर
(Release ID: 2168315)