अर्थ मंत्रालय
वारंवार विचारले जाणारे प्रश्न - जीएसटी
Posted On:
16 SEP 2025 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025
प्रश्न 1. 22 सप्टेंबर 2025 पूर्वी पुरवठा साखळीत असलेली औषधे परत मागवणे आणि नवीन एमआरपी नुसार पुन्हा वेष्टन तयार करणे आवश्यक आहे का? पुन्हा लेबलिंग कसे अंमलात आणले जाईल?
उत्तर: एपीपीए म्हणजेच राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने 12.9.2025 आणि 13.9.2025 च्या कार्यालयीन निवेदनाद्वारे खालील गोष्टी स्पष्ट केल्या आहेत:
- औषधे/फॉर्म्युलेशन विकणाऱ्या सर्व उत्पादक/विपणन कंपन्यांनी औषधे/फॉर्म्युलेशन्सच्या (वैद्यकीय उपकरणांसह) एमआरपी म्हणजेच कमाल किरकोळ किंमतीत सुधारणा करणे आवश्यक आहे.
- उत्पादक/विपणन कंपन्या, ग्राहकांना, राज्य औषध नियंत्रकांना आणि सरकारला सादर करण्यासाठी, अर्ज V/VI मध्ये, सुधारित किंमत यादी किंवा पूरक किंमत यादी जारी करतील, ज्यामध्ये सुधारित जीएसटी दर आणि सुधारित एमआरपी नमूद केली असेल.
- जर उत्पादक/विपणन कंपन्या किरकोळ विक्रेत्याच्या पातळीवर सुधारित किंमतीचे पालन होत असल्याची खात्री करु शकत असतील तर 22 सप्टेंबर 2025 पूर्वी बाजारात वितरित केलेल्या कंटेनर किंवा स्टॉकच्या पॅकचे लेबल परत मागवणे, पुन्हा लेबलिंग करणे किंवा पुन्हा चिकटवणे अनिवार्य नाही.
औषधनिर्माण विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या (एनपीपीए) वेबसाइटवर ‘ओएम’ उपलब्ध आहेत:
https://nppa.gov.in/uploads/tender/01da3cf0cd3d17c68c9a63fe23878260.pdf आणि
https://nppa.gov.in/uploads/tender/12fbbb0cb337f1d2d70afb3fbcb57f39.pdf
प्रश्न 2. मानवरहित विमानांवर (ड्रोन) 5%,18% आणि 28% जीएसटी दर आकारला जात होता. 56 व्या जीएसटी परिषदेने ड्रोनवर 5% जीएसटी दराची शिफारस केली होती. हा 5% जीएसटी दर सर्व प्रकारच्या ड्रोनवर लागू होईल का?
उत्तर : पूर्वी वैयक्तिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या मानवरहित विमानांवर 28% जीएसटी, डिजिटल कॅमेरा/व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डर असलेल्या मानवरहित विमानांवर 18% जीएसटी आणि वरील श्रेणी वगळता इतर सर्व मानवरहित विमानांवर 5% जीएसटी आकाराला जात होता. 03.09.2025 रोजी झालेल्या 56 व्या जीएसटी परिषदेने सर्व प्रकारच्या ड्रोन वर 5% जीएसटी आकारण्याची शिफारस केली आहे.
प्रश्न 3. विटांवर सध्याचा जीएसटी दर काय आहे?
उत्तर : क्षमता आधारित कर आकारणी आणि विशेष रचना योजनेवरील मंत्र्यांच्या गटाच्या अहवालावर आधारित विटांच्या पुरवठ्यासाठी (वाळू-चुन्याच्या विटांव्यतिरिक्त) एक विशेष रचना योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आली, जीएसटी परिषदेने 17 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या 45 व्या बैठकीत ही योजना स्वीकारली. या योजनेअंतर्गत, विटांवर इनपुट टॅक्स क्रेडिटशिवाय 6% आणि इनपुट टॅक्स क्रेडिटवर 12% जीएसटी आकारला जातो, ज्याची मर्यादा वस्तूंना लागू असलेल्या 40 लाख रुपयांऐवजी विटांसाठी 20 लाख रुपये आहे. 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या 56 व्या बैठकीत जीएसटी परिषदेने वाळूच्या चुनखडीच्या विटा वगळता विशेष रचना योजनेच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्याची शिफारस केली नाही, ज्यावरील जीएसटी दर 12% वरून 5% पर्यंत कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. म्हणूनच, वाळू-चुन्याच्या विटा वगळता सर्व प्रकारच्या विटांवर आयटीसीशिवाय 6 % आणि 20 लाख रुपयांच्या मर्यादेसह आयटीसीवर 12% जीएसटी लागू राहील.
प्रश्न 4. वैयक्तिक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याला देण्यात आलेल्या सवलतीच्या कक्षेत कोणत्या विमा सेवांचा समावेश आहे?
उत्तर : जिथे विमाधारक हा एखादा गट नाही अशा स्थितीत विमा कंपन्यांनी विमाधारकाला प्रदान केलेल्या वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा व्यवसायाच्या सेवा, सदर सवलतीच्या कक्षेत समाविष्ट आहेत. जेव्हा या सेवा एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील व्यक्तीला प्रदान केल्या जातात, तेव्हा त्यांना देखील या सवलती लागू असतील.
प्रश्न 5. विमा कंपन्यांनी पुरवलेल्या वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्याच्या सेवांना सवलत देण्याव्यतिरिक्त, विमा कंपन्यांच्या इतर इनपुट सेवांना देखील सवलत दिली जाईल का?
उत्तर : सध्या, विमा कंपन्या कमिशन, ब्रोकरेज आणि पुनर्विमा इत्यादी अनेक इनपुट आणि इनपुट सेवांवर आयटीसीचा लाभ घेत आहेत. या इनपुट सेवांपैकी पुनर्विमा सेवांना सवलत दिली जाईल. आउटपुट सेवांना सवलत दिलेली असल्यामुळे इतर इनपुट किंवा इनपुट सेवांचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ परत घेतले जाईल.
प्र.6. प्रतिदिन रु.7500/- प्रती एकक किंवा यापेक्षा कमी मूल्याच्या निवास एककांचा पुरवठा करणाऱ्या हॉटेल्सना अशी एकके 18% आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडीट)सह ग्राहकांना पुरवण्याचा पर्याय आहे का?
उत्तर: दर दिवशी रु.7500/- प्रती एकक किंवा यापेक्षा कमी मूल्याच्या निवासी हॉटेल एककांच्या पुरवठादारांना अशा एककांसाठी ग्राहकांना आयटीसीविना 5% दराने जीएसटी आकारावा लागेल. अशा सेवांसाठी निश्चित करून दिलेला हा अनिवार्य दर आहे आणि आयटीसीसह 18% दराने जीएसटी भरण्याचा पर्याय अशा एककांसाठी उपलब्ध नाही.
प्र.7. प्रतिदिन रु.7500/- प्रति एकक किंवा यापेक्षा कमी मूल्याच्या निवास एककांचा पुरवठा करणाऱ्या हॉटेल्सना संदर्भात अशा एककांच्या आयटीसीच्या सुविधेचा लाभ घेता येईल का?
उत्तर: प्रतिदिन रु.7500/- प्रति एकक किंवा यापेक्षा कमी मूल्याच्या निवास एककांचा पुरवठा करणाऱ्या हॉटेल्सना अशा एककांसाठी आयटीसीच्या सुविधेचा लाभ घेता येणार नाही कारण अशा सेवांच्या पुरवठ्यासाठी आयटीसीविना 5%हा जीएसटी दर निश्चित केलेला आहे.
प्र.8. सौंदर्य आणि शारीरिक स्वास्थ्यविषयक सेवांवर आयटीसी वगळून 5% दर अनिवार्य आहे का? अशा सेवांचे प्रदाते आयटीसीसह 18% दराने शुल्क आकारु शकतात का?
उत्तर: सौंदर्य आणि शारीरिक स्वास्थ्यविषयक सेवांवर आयटीसी वगळून 5% दर अनिवार्य असणार आहे. अशा सेवांच्या प्रदात्यांना आयटीसीसह 18% दराने शुल्क आकारण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
प्र.9 जेथे आयटीसी वगळून 5% दराने जीएसटी भरावा लागणार आहे अशा प्रकरणांमध्ये सेवा प्रदात्याने इनपुट टॅक्स क्रेडीट (आयटीसी)ची बाब कशी हाताळावी?
उत्तर: अशा प्रकरणांमध्ये (अ)केवळ याच प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांवर आकारलेल्या इनपुट टॅक्सचे क्रेडीट सेवा प्रदात्याला घेता येणार नाही; आणि
(ब) या प्रकारच्या अंशतः सेवा पुरवण्यासाठी आणि अंशतः इतर करपात्र वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांवर आकारलेल्या इनपुट टॅक्सचे क्रेडीट सेवा प्रदात्यांकडून परत घेतले जाईल कारण आयटीसी वगळून 5%दराने केलेला पुरवठा ही सवलत देवून केलेला पुरवठा आहे. परिणामी, सीजीएसटी कायदा,2017 च्या कलम 17 (2) मधील तरतुदीनुसार सेवा प्रदात्यातर्फे योग्य प्रमाणातील आयटीसी परत करणे आवश्यक असणार आहे.
प्र.10. बसचा सांगाडा उभारण्याशी संबंधित नोकऱ्यांच्या कार्यसेवेवर काय दराने जीएसटी लागू होईल?
उत्तर: बसचा सांगाडा उभारण्याशी संबंधित नोकऱ्यांच्या कार्यसेवा इनपुट टॅक्स क्रेडीट (आयटीसी)सह 18%जीएसटी दराने करपात्र आहेत. याआधी या सेवा विशिष्ट नोंदी [पूर्वी 9988 शीर्षकाखाली (आयसी)च्या नोंदी] अंतर्गत येत असत आणि त्यांच्यावर आयटीसीसह 18% दर लागू होत असे. नुकत्याच झालेल्या दर सुसूत्रीकरण उपक्रमात, सर्व निवासी नोकऱ्यांची कार्य सेवा अथवा इतर उत्पादनसंबंधी सेवा या आयटीसीसह 18% वर सुसूत्रीत करण्यात आल्या असून त्यायोगे बसचा सांगाडा उभारण्याशी संबंधित विशिष्ट नोंदी अंतर्भूत होतील.
प्र.11. विटांशी संबंधित नोकऱ्यांच्या कार्य सेवेवर किती जीएसटी दर लागू आहे?
उत्तर: संबंधित नोकऱ्या-कार्य सेवा ज्यामध्ये विटांवर 5%नी जीएसटी लागू होतो (उदा.चुनखडीच्या विटा) त्यांच्यावर आयटीसीसह 5% दराने कर भरावा लागेल.
प्र.12. वस्तूंच्या बहुपद्धतीय वाहतुकीला काय जीएसटी दर लागेल?
उत्तर: वस्तूंची बहुपद्धतीय वाहतूक (जेथे बहुपद्धतीय वाहतूकदारातर्फे किमान वाहतुकीसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होतो) खालीलप्रमाणे करपात्र असेल:
(अ) मर्यादित इनपुट टॅक्स क्रेडीट सह 5% - म्हणजेच, वस्तूंच्या वाहतुकीवरील इनपुट सेवा जेथे मूल्याच्या 5%पर्यंत मर्यादित असतील आणि वस्तूंच्या वाहतुकीतील कोणताही टप्पा हवाई वाहतुकीचा नसेल केवळ अशाच बाबतीत आयटीसीला परवानगी देण्यात आली आहे.
(ब) जेव्हा वस्तूंच्या वाहतुकीतील किमान एक तरी टप्पा हवाई वाहतुकीचा असेल अशा बाबतीत संपूर्ण इनपुट टॅक्स क्रेडीट सह 18%
प्रश्न 13 . मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सेवांवर आयटीसी घेता येईल का, जिथे वाहतुकीचा कोणताही भाग हवाई मार्गाने होत नाही आणि लागू दर 5% आहे?
उत्तर. अशा सेवांच्या पुरवठादाराने जास्त कर आकारला असला तरीही मूल्याच्या 5% पर्यंत मर्यादित असलेल्या माल वाहतुकीच्या इनपुट सेवांना परवानगी दिली जाईल. इतर इनपुट किंवा इनपुट सेवांसाठी आयटीसीची परवानगी दिली जाणार नाही.
उदाहरणार्थ: ‘अ’ ने नवी दिल्ली ते गया माल वाहतुकीसाठी 1200 रुपयांना ‘ब’ (मल्टीमोडल ट्रान्सपोर्टर) ला नियुक्त केले आहे, ज्यामध्ये हवाई मार्गाने कोणतीही वाहतूक समाविष्ट नाही. ‘ब’ हा जीटीए ‘क’ ला 600 रुपयांना नियुक्त करतो जो 18% कर आकारतो आणि कंटेनर ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ‘ड’ ला 400 रुपयांना नियुक्त करतो जो 5% कर आकारतो. तर अशावेळी ‘ब’ द्वारे प्रदान केलेल्या सेवेसाठी लागू असलेला जीएसटी दर: ‘ब’ ला 5% लागू होतो:
आयटीसी ‘ब’ ला उपलब्ध आहे:
(अ) जीटीए इनपुट: 108 रुपये (600 रुपयांच्या 18%) नाही, तर 30 रुपये (600 रुपयांच्या 5%) असेल,
(ब) सीटीओ इनपुट: 20 रुपये (400 रुपयांपैकी 5%).
प्रश्न 14. जर मल्टीमोडल वाहतुकीमध्ये मालाची वाहतूक हवाई मार्गाने केली जात असेल तर कर आकारणी कशी असेल?
उत्तर: जर वाहतुकीचा किमान एक टप्पा हवाई मार्गाने केला जात असेल, तर लागू असलेला जीएसटी दर 18% असेल. अशा प्रकरणांमध्ये इनपुट किंवा इनपुट सेवांच्या संपूर्ण आयटीसीला अनुमती आहे.
उदाहरणार्थ: ‘अ’ नवी दिल्ली ते गया येथे मालाची वाहतूक करण्यासाठी 1200 रुपयांना ‘ब’ (मल्टीमोडल ट्रान्सपोर्टर) ला नियुक्त करतो, ज्यामध्ये हवाई मार्गाने वाहतूक समाविष्ट आहे. ब’ हा हवाई मार्गाने वाहतूक सेवा देणाऱ्या सेवा प्रदात्या ‘क’ ला 800 रुपयांना आणि जीटीए ‘ड’ ला 200 रुपयांना नियुक्त करतो जो 18% कर आकारतो. तर अशावेळी ‘ब’ द्वारे प्रदान केलेल्या सेवेवर लागू असलेला जीएसटी दर: 'ब' ला लागू 18% आयटीसी:
(अ) जीटीए इनपुट: 36 रुपये (200 रुपयांच्या 18%)
(ब) विमानाने माल वाहतुकीच्या सेवांवरील इनपुट: 144 रुपये (800 रुपयांच्या 18%).
प्रश्न 15. ईसीओ द्वारे प्रदान केलेल्या स्थानिक वितरण सेवांसाठी जीएसटी भरण्यास कोण जबाबदार आहे?
उत्तर: ई-कॉमर्स ऑपरेटर (ईसीओ) द्वारे प्रदान केलेल्या स्थानिक वितरणाद्वारे, जिथे अशा सेवा पुरवणारी व्यक्ती कलम 22(1) अंतर्गत नोंदणी करण्यास जबाबदार नाही, ती सीजीएसटी कायद्याच्या कलम 9(5) अंतर्गत समाविष्ट केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये, जीएसटी भरण्याची जबाबदारी ईसीओवर असेल.
प्रश्न 16. स्थानिक वितरण सेवा कोणत्या दराने करपात्र आहेत?
उत्तर: स्थानिक वितरण सेवा 18% दराने करपात्र आहेत. जर स्थानिक वितरणाच्या अशा सेवा नोंदणीकृत व्यक्तीद्वारे थेट पुरवल्या गेल्या असतील तर त्या व्यक्तीकडून 18% दराने जीएसटी देय आहे. जर स्थानिक वितरणाच्या अशा सेवा नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीकडून ईसीओ द्वारे पुरवल्या जात असतील तर: कलम 9(5) अंतर्गत ईसीओला 18% दराने जीएसटी भरावा लागेल. जर स्थानिक वितरणाच्या अशा सेवा नोंदणीकृत व्यक्तीकडून ईसीओ द्वारे पुरवल्या जात असतील तर: स्थानिक वितरण सेवेच्या पुरवठादाराला, म्हणजेच ईसीओ द्वारे पुरवठा करणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीला जीएसटी @18% भरावा लागेल.
प्रश्न 17. स्थानिक वितरण सेवा प्रदान करणारा ईसीओ हा जीटीए च्या कार्यक्षेत्रात समाविष्ट आहे का? स्थानिक वितरण सेवा ईसीओ द्वारे पुरवल्या गेल्यास काय परिणाम होईल?
उत्तर: “गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी” (जीटीए) मध्ये समाविष्ट नसलेल्या बाबी:
(अ) “इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर” जो स्थानिक वितरण सेवा प्रदान करतो
आणि
(ब) “इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ज्याच्या माध्यमातून स्थानिक वितरणाच्या सेवा प्रदान केल्या जातात.”
प्रश्न 18. ऑपरेटरशिवाय भाडेपट्टा किंवा भाड्याने सेवांसाठी कर काय आहे?
उत्तर: ऑपरेटरशिवाय भाडेपट्टा किंवा भाड्याने देणाऱ्या बहुतेक सेवांवर समान वस्तूंच्या पुरवठ्यावर लागू असलेल्या कराच्या दराने कर आकारला जातो. या संदर्भात कोणताही बदल प्रस्तावित नाही. अशा सेवांवरील कर दर समान वस्तूंच्या पुरवठ्यावर लागू असलेल्या कर दराइतकाच राहील. उदाहरणार्थ, जर कार किंवा मशीनवर 18% कर आकारला जात असेल तर अशा कार किंवा मशीन भाडेपट्ट्यावर किंवा भाड्याने (ऑपरेटरशिवाय) देण्यासाठी 18% दर लागू असेल. त्याचप्रमाणे, जर कोणत्याही मोटार वाहनाच्या पुरवठ्यावर 40% किंवा 5% कर आकारला जात असेल तर भाडेपट्ट्यावर किंवा भाड्याने देणाऱ्या सेवांवर (ऑपरेटरशिवाय) अनुक्रमे 40% किंवा 5% कर आकारला जाईल.
प्रश्न 19. ऑपरेटरसह कार भाडेपट्ट्यावर / भाड्याने देण्यावर लागू कर दर काय आहे?
उत्तर: ऑपरेटरसह कार भाडेपट्ट्यावर/ भाड्याने देण्याच्या सेवा पुरवठादाराला (उदाहरणार्थ, ड्रायव्हर) आता त्याच व्यवसायातील इनपुट सेवांवर 5% आयटीसी किंवा पूर्ण आयटीसीसह 18% आकारण्याचा पर्याय असेल.
* * *
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/संजना चिटणीस/वासंती जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168082)
Visitor Counter : 4