आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथून 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' आणि 8 व्या राष्ट्रीय पोषण माहचा केला प्रारंभ
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील सर्व सरकारी आरोग्य सुविधांमध्ये 10 लाखांहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. महिला आणि मुलांसाठी हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आरोग्य अभियान आहे
कर्करोग, रक्ताल्पता, क्षयरोग आणि सिकलसेल यासारख्या जीवघेण्या आजारांचे निदान होण्यासाठी महिलांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी- पंतप्रधानांनी केले आवाहन
Posted On:
17 SEP 2025 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार येथे 8 व्या राष्ट्रीय पोषण माह आणि 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' (एस एन एस पी) अभियानाचा शुभारंभ केला.
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा हरियाणा येथून कार्यक्रमात सहभागी झाले तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातून आणि अनुप्रिया पटेल दिल्ली सचिवालयातून दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात सहभागी झाल्या.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे भारतातील महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आरोग्य अभियान आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील या उपक्रमात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी), जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य सुविधांमध्ये 10 लाखांहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील जेणेकरून महिला-केंद्रित प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा समुदाय पातळीवर प्रदान करता येतील.

यामुळे असंसर्गजन्य आजार, रक्ताल्पता, क्षयरोग आणि सिकलसेल रोगांसाठी तपासणी, लवकर निदान आणि उपचार प्रभावीपणे मिळू शकतील, तसेच प्रसूतीपूर्व काळजी, लसीकरण, पोषण, मासिक पाळी स्वच्छता, जीवनशैली आणि मानसिक आरोग्य जागरूकता उपक्रमांद्वारे माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्याला प्रोत्साहन मिळेल. त्याच वेळी, ही मोहीम समुदायांना निरोगी जीवनशैली पद्धतींकडे आकर्षित करेल ज्यामध्ये लठ्ठपणा प्रतिबंध, सुधारित पोषण आणि स्वेच्छेने रक्तदान यावर विशेष भर दिला जाईल.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सांगितले की, "नारी शक्ती" हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार हे महिलांच्या नेतृत्वाखाली विकास घडवून आणण्यासाठीचे "महाअभियान" आहे. "उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्ताल्पता किंवा कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान आवश्यक असते कारण ते नंतर प्राणघातक ठरू शकतात आणि म्हणूनच या मोहिमेदरम्यान ते उपलब्ध असतील", असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी महिलांना स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढण्याचे आणि आरोग्य शिबिरांमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा लाभ कोणत्याही भीतीशिवाय घेण्याचे आवाहन केले. देशातील आदिवासी भागात सिकलसेल ॲनिमिया ही एक महत्त्वाची समस्या आहे हे लक्षात घेऊन त्यांनी, विशेषतः आदिवासी महिलांना, मोहिमेच्या काळात उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आरोग्य केंद्रांमध्ये सर्व चाचण्या आणि औषधे मोफत उपलब्ध असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. “आमचा संकल्प आहे की कोणतीही आई किंवा मुलगी मागे राहू नये. ज्यांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे ते आयुष्मान कार्डाद्वारे प्रदान केलेल्या संरक्षणात्मक कवचाचा (सुरक्षा कवच) लाभ घेऊ शकतात”, असे त्यांनी पुढे सांगितले.

पार्श्वभूमी:
ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी), जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य सुविधांमध्ये आयोजित केली जात आहे.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167885)