कृषी मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नवी दिल्लीतील पुसा परिसरात 75 रोपांची लागवड
Posted On:
17 SEP 2025 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील पुसा परिसरातील भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) येथे 75 रोपे लावली. यावेळी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले आहे.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे समृद्ध, सक्षम आणि विकसित भारत घडविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, जगभरात भारताची प्रतिष्ठा अनेक पटीने वाढली आहे आणि देशाकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात परिवर्तन झाले आहे असे चौहान यांनी नमूद केले. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याद्वारे नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत, स्वच्छता मोहिमा सुरू आहेत, तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमा देखील सुरू असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

पर्यावरण हा नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे असा पुनरुच्चार शिवराज सिंह चौहान यांनी केला. "एक पेड मां के नाम" या मोहिमेद्वारे पंतप्रधानांनी देशभरात कोट्यवधी झाडे लावण्याची प्रेरणा दिली. या भावनेतून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय शेतीच्या विकासाचे नेहमीच प्रमुख केंद्र राहिलेल्या नवी दिल्लीतील पुसाच्या आयसीएआर मध्ये वृक्षारोपणाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो आणि ते देशाचे नेतृत्व करत राहोत असे अभिष्टचिंतन केले. पंतप्रधानांनी भारताला विश्व बंधु केले आहे आणि ते वसुधैव कुटुंबकम - जग एक कुटुंब आहे या प्राचीन भारतीय तत्वाला आकार देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
* * *
निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167874)
Visitor Counter : 2