वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या विकासाच्या प्रवासात शाश्वततेबाबत कोणतीही तडजोड नाही: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल


जागतिक मानकांमध्ये समन्वय साधल्यास गुणवत्ता, मुक्त व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळेल: गोयल

सरकार गुणवत्ता आणि शाश्वततेची संस्कृती रुजवण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे: गोयल

Posted On: 15 SEP 2025 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025

भारताच्या विकासाच्या वाटचालीत शाश्वततेबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. ते आज ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने आयोजित केलेल्या आयईसी अर्थात आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल आयोगाच्या सर्वसाधारण बैठकीच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. भारताचा विकसित विश्वाकडून शिकण्यावर विश्वास आहे, विशेषतः ज्यांनी जगभरातील अर्थव्यवस्थांना वाढण्यास आणि समृद्ध होण्यास मदत केली आहे, अशा उच्च-गुणवत्तेच्या मानकांचा अवलंब करण्यावर भारताचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या स्वतःच्या वाढीसाठी ही उच्च मानके केंद्रस्थानी आहेत यावर त्यांनी भर दिला.

आंतरराष्ट्रीय  इलेक्ट्रोटेक्निकल आयोगाच्या सर्वसाधारण बैठकीसारखे उपक्रम, मानकांवर निर्णय घेण्यासाठी कल्पना, प्रणाली आणि पद्धती यांच्या देवाणघेवाणीसाठी एक बहुमूल्य मंच उपलब्ध करून देतात, असे त्यांनी अधोरेखित केले.  जेव्हा देश अशा मानकांचा विकास करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा ते केवळ पद्धतींमध्ये सुसंवाद साधण्यास आणि त्यांना उच्च किमान स्तरावर आणण्यास मदत करत नाहीत, तर मजबूत आर्थिक सहकार्यासाठी संधी देखील निर्माण करतात, असे ते म्हणाले. भारतासारख्या विकसनशील देशासाठी चांगली मानके ही काळाची गरज आहे, कारण ती राष्ट्रीय स्तरावर वाढीसाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी पाया प्रदान करतात, असे त्यांनी सांगितले.

गोयल यांनी नमूद केले की, जागतिक मानकांमध्ये सुसंवाद साधल्याने केवळ उत्पादनाची गुणवत्ता वाढत नाही, तर मुक्त व्यापारालाही चालना मिळते, बाजारपेठा खुल्या होतात आणि व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढते. ते म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे खुल्या बाजारपेठांचा विस्तार होण्यास, मुक्त आणि न्याय्य व्यापाराला प्रोत्साहन मिळण्यास आणि व्यवसायांना समान संधी मिळण्यास मदत होईल. मंत्र्यांनी पॅरिस करारानुसार भारताच्या राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदानांची पूर्तता करण्याच्या आणि विविध सीओपी  घोषणांद्वारे केलेल्या पुढील सुधारणांप्रती  भारताची दृढ वचनबद्धता अधोरेखित केली.

मानके भारताचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे गोयल म्हणाले. भारतात हजारो तांत्रिक संस्था आणि समित्या आहेत ज्या विविध क्षेत्रांमध्ये मानके निश्चित करण्याचे काम करतात, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सुरुवातीच्या वर्षांमध्ये, मानके तयार करण्यावर आणि त्यांच्या ऐच्छिक अंमलबजावणीला परवानगी देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले होते. मात्र, कालांतराने, अनुभवामुळे असे दिसून आले की, मानकांचे कठोर पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

गुणवत्तेमुळे खर्चात वाढ होत नाही, तर गुणवत्तेमुळे खर्चात कपात होते कारण त्यामुळे वाया जाणे कमी होते, कामकाजात कार्यक्षमता सुधारते आणि ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि चांगली उत्पादने मिळतात, यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट' या संकल्पनेचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, सरकार देशभरात गुणवत्ता आणि सुरक्षिततेची संस्कृती रुजवण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे.

मंत्र्यांनी ऊर्जा कार्यक्षमता आणि शाश्वततेमध्ये विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाची वाढती भूमिका देखील अधोरेखित केली.


‍निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2166837) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil