ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारत 15 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या (IEC) 89 व्या सर्वसाधारण सभेचे यजमानपद भूषवणार
प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते होणार 89 व्या सर्वसाधारण सभेचे उद्घाटन, पीयूष गोयल यांच्या हस्ते भारत मंडपम इथे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
100 पेक्षा जास्त देश आणि 2,000 पेक्षा जास्त जागतिक तज्ञ सहभागी होणार
लो व्होल्टेज डायरेक्ट करंट (LVDC) मधील मानकीकरणासाठी भारत जागतिक सचिवालय म्हणून भूमिका बजावणार
Posted On:
14 SEP 2025 11:11AM by PIB Mumbai
भारत आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या (International Electrotechnical Commission - IEC) 89 व्या सर्वसाधारण सभेचे यजमानपद भूषवणार असून, नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे येत्या 15 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात ही सर्वसाधारण सभा होणार आहे. या आयोजनाबाबत भारतीय मानक संस्थेने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने 100 पेक्षा जास्त देशांमधून 2,000 पेक्षा जास्त तज्ञ एकत्र येणार आहेत. हे सर्वजण शाश्वत, पूर्णतः इलेक्ट्रिक आणि परस्परांशी जोडलेल्या जगाच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक मानके निश्चित करण्यावर विचारमंथन करतील. भारत चौथ्यांदा आणि 1960, 1997 आणि 2013 नंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या या प्रतिष्ठित सर्वसाधारण सभेचे यजमानपद भूषवत आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल भारत मंडपम इथे आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. हे प्रदर्शन विद्युत - तांत्रिक क्षेत्राशी संबंधीत भारतातातील आजपर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन असेल. या प्रदर्शनातून इलेक्ट्रिक गतिशीलता (मोबिलिटी), स्मार्ट लाइटिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानविषयक उत्पादनामधील नवोन्मेषाचे दर्शन घडेल. यासोबतच भारतातील स्टार्टअप्ससाठी एक जागतिक संपर्काचा विस्तार करण्यासाठीचे व्यासपीठही यामुळे उपलब्ध होईल.
स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा विषयक उपाय योजनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लो व्होल्टेज डायरेक्ट करंट (LVDC) या क्षेत्रात मानकीकरणासाठी भारत जागतिक सचिवालयाची भूमिकाही बजावणार आहे. जागतिक लोकसंख्येपैकी 99% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे आणि जागतिक व्यापार मूल्यापैकी जवळपास 20% व्यापारावर प्रभाव असलेले तब्बल 170 देश आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाचे सदस्य असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष विमल महेंद्रू यांनी दिली आहे. भारत लो व्होल्टेज डायरेक्ट करंट या क्षेत्राच्या मानकीकरणाचे नेतृत्व करत असून, यामुळे स्वच्छ उर्जा तंत्रज्ञान विषयक मानके विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नांना बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय मानक संस्थेचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी गुणवत्ता आणि मानकीकरणाला शिक्षण जगताशी जोडण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांचे गट आणि सहा महिन्यांच्या संरचित आंतर्वासिता (इंटर्नशिप) कार्यक्रमाच्या माध्यमातून, युवा व्यावसायिक उद्योजकांना उद्योग क्षेत्र आणि मानक विकास प्रक्रियेविषयी ओळख करून दिली जात असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या युवा व्यावसायिक तज्ञ कार्यक्रमांतर्गत, जगभरातील 93 युवा व्यावसायिक तज्ञां यासंबंधिच्या कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आणि उद्योग भेटींमध्ये सहभागी होणार आहे, या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची नवी पिढी तयार होईल असे त्यांनी सांगितले. भारतीय मानक संस्थेचे महासंचालक (नियुक्त) संजय गर्ग आणि उपमहासंचालक चंदन बहल हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. चंदन बहल यांनी आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या सर्वसाधारण सभा 2025 निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या जागतिक सभेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाल्याने, नवोन्मेष, शाश्वतता आणि गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा क्षेत्रामधील भारताच्या नेतृत्वाला अधिक बळकटी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्वसाधारण सभेत भविष्यातील पिढीच्या अनुषंगाने मानकांची रचना करण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञान विषयक आणि व्यवस्थापन विषयक समित्यांच्या 150 पेक्षा जास्त बैठका होतील. तसेच, काही महत्त्वाच्या उदयोन्मुख क्षेत्रांवर भर असलेल्या कार्यशाळांची एक मालिकाही आयोजित केली जाणार आहे. याअंतर्गत शाश्वत जगाला चालना (15 सप्टेंबर), कृत्रिम बुद्धिमत्ता : नवोन्मेषाच्या आधारे भविष्याला आकार (16 सप्टेंबर), ई-मोबिलिटीच्या भविष्याला आकार (17 सप्टेंबर), आणि मानकांच्या माध्यमातून अधिक सर्वसमावेशक जगाची निर्मिती तसेच पूर्णतः इलेक्ट्रिक आणि परस्पराशी जोडलेल्या समाजाची निर्मिती (18 सप्टेंबर) या उपक्रमांचे आयोजन केले जाई. जागतिक सर्वेक्षणांतून स्वच्छ आणि हरित उपायजोनांना नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाचे संपर्क संचालक जेम्स वुड यांनी या पत्रकार परिषदेत दिली. भारत हा शाश्वततेचा सच्चा पुरस्कर्ता असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. नवी दिल्ली हे या जागतिक संवादाच्या आयोजनासाठीचे एक आदर्श ठिकाण असल्याचे ते म्हणाले.
यानिमित्ताने भारत मंडपम इथे भारतीय मानक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनात 75 प्रदर्शक सहभागी होणार आहेत. यात आघाडीचे उद्योग, संस्था आणि स्टार्टअप्सचा समावेश असेल. हे प्रदर्शक आंतरराष्ट्रीय मानके उत्पादनाचा विकास आणि नवोन्मेषाला कशा रितीने चालना दिली जात आहे, त्याबद्दलची कल्पक स्वरुपातील माहिती प्रदर्शित करतील. हे प्रदर्शन 16 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात दुपारी 2:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. तसेच https://gm2025.iec.ch/ या दुव्याला भेट देऊन, यासाठीच्या विनामूल्य प्रवेशाकरता आगाऊ नोंदणी करता येणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या प्रवेशाची सोय प्रवेशद्वार क्रमांक 10 आणि प्रवेशद्वार क्रमांक 4 वर करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला शाळा आणि महाविद्यालयांमधील 2,000 पेक्षा जास्त विद्यार्थी भेट देतील अशी अपेक्षा आहे.
शाश्वत जगाच्या जडणघडणीला प्रोत्साहन या संकल्पनेचे प्रतिक म्हणून, भारतीय मानक संस्थेच्या दालनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना डिजिटल शाश्वततेची शपथ घेण्याचे आवाहन केले जाईल. अशा तऱ्हेने घेतलेल्या प्रत्येक शपथेसाठी, भारतीय मानक संस्था देशभरातील आपल्या कार्यालयांच्या परिसरात एक रोपटे लावून पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेप्रतीची आपली वचनबद्धता अधिक दृढ करणार आहे.
आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाची (IEC) स्थापना 1906 मध्ये झाली होती. ही संस्था विद्युत, इलेक्ट्रॉनिक आणि संबंधित तंत्रज्ञान विषयक आंतरराष्ट्रीय मानके विकसित करण्यासाठी प्रयत्न करणारी जगातील एक आघाडीची संस्था आहे. या संस्थेसोबत जगभरातील 30,000 तज्ञ जोडले गेले आहेत.
***
सुषमा काणे / तुषार पवार / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2166586)
Visitor Counter : 2