संरक्षण मंत्रालय
भारतात 2027 मध्ये चेन्नई येथे 5 वी तटरक्षक दल जागतिक शिखर परिषद
Posted On:
13 SEP 2025 3:27PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्यामधील आपले नेतृत्व पुन्हा अधोरेखित करत भारत 2027 मध्ये चेन्नई येथे 5 वी तटरक्षक दल जागतिक शिखर परिषद (सीजीजीएस) आयोजित करणार आहे. ही परिषद भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाशी संलग्न असेल. या तीन दिवसीय कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तटरक्षक ताफ्याची पाहणी तसेच जागतिक तटरक्षक परिसंवाद आयोजित केला जाईल, ज्यामुळे उदयोन्मुख सागरी आव्हानांवर संवाद साधण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी एकात्मता प्रदर्शित करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध होईल.ही घोषणा 11-12 सप्टेंबर 2025 रोजी रोम, इटली येथे पार पडलेल्या 4थ्या सीजीजीएस मध्ये सर्वानुमते घेण्यात आली. या बैठकीला 115 देशांतील तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक (डीजी) परमेश शिवमणी यांनी अधोरेखित केले की कोणताही देश सर्व सागरी आव्हानांना एकट्याने सामोरे जाऊ शकत नाही. त्यांनी नमूद केले की 2027 मधील चेन्नई परिषद ही परस्पर विश्वास, परस्पर सहकार्य आणि सुसंवाद वृद्धिंगत करण्यासाठी एक समावेशक मंच ठरेल.
सीजीजीएस अध्यक्षपद हस्तांतरण सोहळ्यात भारतीय तटरक्षक दलाच्या महासंचालकानी या परिषदेला सामायिक सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक सहकार्याचा दीपस्तंभ म्हणून संबोधले. त्यांनी इटलीच्या तटरक्षक दलाच्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच सीजीजीएस सचिवालयाची भूमिका बजावल्याबद्दल जपान तटरक्षक दलाचे आभार मानले.
परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक यांनी इटालियन तटरक्षक दलाच्या कमांडटसोबतही चर्चा केली. या चर्चांमध्ये भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 अंतर्गत संरक्षण सहकार्य ढाच्यानुसार दोन्ही देशांच्या सागरी शोध व बचाव (एम-एसएआर), सागरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कृती, पर्यावरण संरक्षण, आंतरराष्ट्रीय सागरी गुन्हेगारीविरोधी कारवाई, माहितीची देवाणघेवाण, सागरी क्षेत्रावरील जागरूकता, क्षमता विकास, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य या क्षेत्रांतील सहकार्य दृढ करण्याच्या कटिबद्धतेवर भर देण्यात आला.
***
निलिमा चितळे / गजेंद्र देवडा / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166325)
Visitor Counter : 2