पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

Posted On: 04 SEP 2025 10:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025

आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.

मला असं वाटतं की, सुरुवात इथूनच होते. संथी मिळाली की ती घेऊन पुढे जावे. आपल्याकडे जे आहे, जेवढे देता येईल तेवढे द्यावे. आणि आपल्या समाधानाची पातळी यामुळे वाढत जाईल असे मी मानतो, त्यामुळे त्या दिशेने प्रयत्नशील रहायला हवे. या पुरस्काराची आपली झालेली निवड ही आपल्या सातत्यपूर्ण तपश्चर्येला दिलेली मान्यताच आहे, तर ते शक्य होऊ शकते आणि एक शिक्षक केवळ वर्तमान नसतो तर तो देशाच्या भावी पिढीची जडणघडण करतो, तो भविष्य उज्ज्वल करतो आणि मी असे मानत की, देशसेवेच्या दृष्टीने पाहिले तर कोणत्याही देश सेवेपेक्षा हे काही कमी नाही. आज कोट्यवधि शिक्षक आपल्या संपूर्ण निष्ठा, तत्परता आणि समर्पित भावनेतून राष्ट्रसेवेत गुंतले आहेत. सर्वांना इथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही. कदाचित अनेकांी प्रयत्नही केले नसतील, काही लोकांनी लक्षही दिले नसेल, आणि अशी क्षमता असणारे खूपसे लोक असतील, निश्चित असतील आणि त्यांच्या सामूहिक प्रयत्नांची परिणती म्हणजे राष्ट्र सातत्यपूर्ण प्रगती करते, नव्या पिढ्या तयार होतात ज्या राष्ट्रासाठी जगतात आणि यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान आहे. 

मित्रांनो, 

आपला देश नेहमीच गुरू-शिष्य परंपरेचा उपासक राहिला आहे. भारतामध्ये गुरू केवळ ज्ञान देणारा नसतो तर आयुष्यभराचा मार्गदर्शक मानला जातो. मी कधी कधी म्हणतो देखील, माता जन्म देते तर गुरू जीवन देतो/घडवतो. आज आपण जेव्हा विकसित भारताच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवून चाललो आहोत तेव्हा गुरू-शिष्य परंपरा ही आपली मोठी ताकद आहे. आपल्यासारखे शिक्षक या श्रेष्ठ परंपरेचे प्रतीक आहेत. नव्या पिढीला केवळ अक्षर ज्ञान नव्हे तर राष्ट्रासाठी जगण्याची शिकवणही आपणच देता, आपल्या मनात कायमच ही भावना दृढ असते की ज्या मुलासाठी मी वेळ देतो आहे, कदाचित तो या देशासाठी उपयोगी ठरेल आणि या प्रयत्नांसाठी मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो.

शिक्षक एक भक्कम देश, सशक्त समाजाचा पाया असतो. पाठांमध्ये, अभ्यासक्रमात काळानुरूप बदल होतो, या सर्व गोष्टी शिक्षकांना लक्षात येतात, कालबाह्य गोष्टींपासून मुक्तता त्यांना हवी असते, हीच भावना देशासाठी केल्या जाणाऱ्या सुधारणांमागेही असते. आत्ता धर्मेंद्रजींनी ज्याचा उल्लेख केला, तीच गोष्ट मी पुढे नेऊ इच्छितो, सुधारणा सातत्याने केल्या जाव्यात, त्या कालसुसंगत असल्या पाहिजेत आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून केल्या पाहिजेत. भविष्याची जाण, त्यावर विश्वास ठेवणे आणि तो स्वीकारणे असे त्याचे स्वरुप असले पाहिजे. या सरकारच्या वचनबद्धतेविषयी सांगायते तर त्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत, कारण कालानुरूप परिवर्तनाशिवाय आपण आजच्या जागतिक परिस्थितीत, पात्र असलेल्या देशाचे स्थान त्याला मिळवून देऊ शकत नाही असा आम्हाला विश्वास आहे. 

आणि मित्रहो, 

मी लाल किल्ल्यावरून यंदाच्या पंधरा ऑगस्टला म्हटलो होतो की भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी पुढील पिढीतील सुधारणा करण्याची अत्यंत गरजेचे आहे. मी देशवासियांना वचनही दिले होते की यंदाच्या दिवाळी आणि छठपूजेच्या आधी, दुहेरी आनंद मिळेल. आपण सर्व तर दोन दिवसांपासून इथे विविध ठिकाणांहून आशीर्वाद मिळवण्याच्या प्रयत्नात असाल, त्यामुळे कदाचित तुम्हाला वर्तमानपत्र वाचण्याची किंवा टीव्ही पाहाण्याची संधी मिळाली नसेल किंवा घरी बोलताना फोटो छापून आला आहे का? एवढाच संवाद होत असेल. असो, आपण जी भावना ठेवून आपण पुढे वाटचाल करत आहोत, त्याच भावनेतून केंद्र सरकारने राज्यांसह एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तो फार महत्त्वाचा निर्णय़ आहे. आता जीएसटी अधिक सुलभ झाला आहे, सोपा झाला आहे. जीएसटीचे मुख्य दोनच दर ठेवले आहेत, 5 टक्के आणि 18 टक्के, पाच टक्के आणि अठरा टक्के आणि 22 सप्टेंबर, सोमवारी जेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या सर्वच गोष्टी मातृशक्तीशी निकट संबंध असतो आणि म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटीची सुधारित आवृत्ती लागू केली जाईल. याचा अर्थ नवरात्रीपासूनच देशातील कोट्यवधि कुटुंबांच्या गरजेच्या वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतील. यावेळी धनत्रयोदशीचा उत्साह अधिक असेल, कारण अनेक गोष्टींवरील कर आता खूप कमी झाले आहेत. 

मित्रांनो,

आठ वर्षांपूर्वी जेव्हा जीएसटी लागू झाला तेव्हा अनेक दशकांचे आपले स्वप्न साकार झाले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर ही चर्चा सुरू झाली नव्हती, त्याही आधीपासून सुरू होती. पण प्रत्यक्ष काम होत नव्हते, चर्चा झाल्या. ही सुधारणा, आज स्वतंत्र भारताच्या सर्वात मोठ्या आर्थिक सुधारणांपैकी  एक आहे. तेव्हा देशाला अनेक प्रकारच्या करांच्या जाळ्यातून स्वतंत्र करण्याच्या दृष्टीने मोठे काम झाले. आता २१ व्या शतकामध्ये पुढे वाटचाल करताना भारतामध्ये जीएसटीमध्येही पुढील पिढीतल्या सुधारणांची आवश्यकता होती आणि त्या पूर्ण केल्या गेल्या. माध्यमांतील काही सहकारी याला जीएसटी 2.0 च्या रुपात संबोधित करतात, पण वास्तविक हा देशाला आधार आणि विकास देणारी दुहेरी मात्रा आहे. दुहेरी मात्रा म्हणजे एकीकडे देश सामान्य कुटुंबांची बचत आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी बळकटी देईल, देशातल्या प्रत्येक कुटुंबाला नव्या जीएसटी सुधारणांमुळे मोठा फायदा होणार आहे. 

जीएसटी कर कमी केल्याने गरीब, नव-मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, सर्वांनाच मोठा फायदा होईल. पनीरपासून ते शॅम्पू आणि साबणापर्यंत, सर्व काही पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहे आणि यामुळे तुमचा मासिक खर्च आणि स्वयंपाकघरातील खर्च खूप कमी होईल. स्कूटर आणि कारवरील कर देखील कमी करण्यात आला आहे. याचा फायदा त्या तरुणांना होईल ज्यांनी नुकतेच नोकरीला सुरवात केली आहे. जीएसटी कमी केल्याने तुमचे घरचे बजेट बसविण्यात आणि तुमची जीवनशैली सुधारण्यास देखील मदत होईल.

मित्रांनो,

काल घेतलेला निर्णय खूप आनंददायी आहे, त्याचा खरा परिणाम तेव्हाच कळू शकतो जेव्हा तुम्हाला जीएसटीपूर्वीचे कर दर माहिती असतील. कधीकधी असे होते की आपल्याला माहित नसते की गोष्टी पूर्वी अशा होत्या आणि म्हणूनच जेव्हा आपण भूतकाळातील गोष्टी आठवतो तेव्हा आपल्याला जाणवते की गोष्टी इथून इथपर्यंत कश्या पोहचल्या  आहेत. आता, तुमच्या कुटुंबातही, जर एखाद्या मुलाला शाळेत साधरणपणे 70 गुण मिळात असतील आणि त्याला 71-72-75 गुण मिळाले, तर कोणीही त्याकडे लक्ष देत नाही, परंतु जर त्याने 99 गुण मिळवले, तर लगेच लक्षात येते की त्यात काहीतरी उत्तम आहे, म्हणून मी असे म्हणू इच्छितो की...

मित्रांनो,

2014 पूर्वी, असलेल्या सरकारकडे जवळजवळ प्रत्येक वस्तूवर कर होते. मी येथे कोणत्याही सरकारवर टीका करण्यासाठी आलो नाही, परंतु तुम्ही शिक्षक आहात, त्यामुळे तुम्ही सहजपणे तुलना करू शकता आणि मुलांना त्याबद्दल देखील सांगू शकता. त्या वेळी, जुन्या सरकारमध्ये, मी 2014 मध्ये येण्यापूर्वी, काँग्रेस सरकार अनेक गोष्टींवर वेगवेगळे कर आकारत असे, मग ते स्वयंपाकघरातील वस्तू असोत, शेतीशी संबंधित वस्तू असोत, औषधे असोत आणि अगदी जीवन विमा असो. जर तो काळ असता, जर तुम्ही 2014  मध्ये असता, जर तुम्ही 100  रुपयांची एखादी वस्तू खरेदी केली असती, तर तुम्हाला 20-25 रुपये कर म्हणून द्यावे लागले असते. पण आता तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली आहे. भाजप सरकारमध्ये, एनडीए सरकारमध्ये, आमचे लक्ष बचत कशी जास्तीत जास्त करायची, कुटुंबाचा खर्च कसा कमी करायचा यावर आहे आणि म्हणूनच, आता जीएसटीमध्ये इतकी कपात करण्यात आली आहे.

मित्रांनो, 

काँग्रेस सरकारने तुमचे मासिक बजेट कसे वाढवले हे कोणीही विसरू शकत नाही. तुम्हाला आज आठवत नसेल की टूथपेस्ट, साबण, केसांच्या तेलावर 27% कर होता, पण तुम्ही तो भरत होता. जेवणाच्या प्लेट्स, कप, चमचे आणि अशा वस्तूंवर 18% ते 28% कर होता. टूथ पावडरवर 17% कर होता, म्हणजेच काँग्रेसच्या काळात अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंवर इतका कर लावला जात होता. परिस्थिती अशी होती की काँग्रेस मुलांच्या टॉफीवरही 21% कर आकारत असे. मला माहित नाही की तुम्हाला ते त्यावेळी वर्तमानपत्रात वाचून लक्षात आले असते की नाही, पण जर मोदींनी ते केले असते तर तुम्ही केस उपटले असते. देशातील कोट्यवधी लोकांसाठी दैनंदिन गरज असलेल्या सायकलवर 17% कर आकारला जात असे. शिवणकामाचे यंत्र हे लाखो माता-भगिनींसाठी स्वाभिमान आणि स्वरोजगाराचे साधन आहे, त्यावर 16% कर आकारला जात असे. काँग्रेसने मध्यमवर्गीयांना प्रवास करणेही खूप कठीण केले होते. काँग्रेसच्या राजवटीत हॉटेल रूम बुकिंगवर 14% कर होता आणि त्याशिवाय, अनेक राज्यांमध्ये लक्झरी कर आकारला जात असे, तो वेगळाच . आता अशा प्रत्येक वस्तू आणि सेवेवर फक्त 5% कर आकारला जाईल. आता तुम्हाला कळले असेल की या सेवांवर मोदी ५% कर आकारतात. हॉटेलमध्ये ७५०० रुपयांच्या खोल्यांवरही 5% कर आकारला जातो. तुम्ही एक कार्यक्षम सरकार निवडले आहे, तथापि, भाजप एनडीए सरकारने हे केले आहे.

मित्रांनो,

पूर्वी, भारतात उपचार खूप महाग होते, लहान चाचण्या देखील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर आहेत अशी तक्रार अनेकदा केली जात होती, कारण काँग्रेस सरकार डायग्नोस्टिक किटवर 16 टक्के कर आकारत असे. आमच्या सरकारने अशा सर्व वस्तूंवरील कर फक्त पाच टक्के केला आहे.

मित्रांनो,

काँग्रेसच्या राजवटीत घर बांधणे खूप महागडे होते, का? कारण काँग्रेस सरकार सिमेंटवर 39% कर आकारत असे, जरी आपण कसे तरी घर बांधले तरी, जर आपल्याला एसी, टीव्ही किंवा पंखा, इतर काहीही खरेदी करायचे असेल तर ते देखील महाग पडायचे. कारण काँग्रेस सरकार अशा वस्तूंवर 31% कर लावत असे, एकतीस टक्के, आता आमच्या सरकारने अशा सर्व वस्तूंवरील कर अठरा टक्के, अर्थात जवळजवळ अर्धा केला आहे.

मित्रांनो, 

काँग्रेसच्या राजवटीत शेतकरीही खूप दुःखी होते. 2014 पूर्वी शेतीचा खर्च जास्त होता आणि नफा खूप कमी होता. कारण काँग्रेस सरकार शेतीच्या वस्तूंवर खूप जास्त कर आकारत असे. ट्रॅक्टर असोत किंवा सिंचन उपकरणे, हाताची अवजारे, पंपिंग सेट असोत, अशा उपकरणांवर 12 ते 14 टक्के कर आकारला जात असे. आता अशा अनेक वस्तूंवरील जीएसटी शून्य किंवा पाच टक्के करण्यात आला आहे.

मित्रांनो,

विकसित भारताचा आणखी एक आधारस्तंभ म्हणजे आपली युवाशक्ती. आपल्या तरुणांना अधिक रोजगार मिळावा आणि लहान व्यवसाय करणाऱ्यांना सोयी मिळाव्यात याचीही खात्री करण्यात आली आहे. आपल्या ज्या क्षेत्रांना सर्वात जास्त कामगारांची आवश्यकता असते त्यांना जीएसटीच्या कमी दरामुळे मोठा आधार मिळणार आहे. कापड असो, हस्तकला असो, चामडे असो, यामध्ये काम करणारे लोक असोत, या व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठी मदत मिळाली आहे. यासोबतच कपडे आणि शूजच्या किमतीही खूप कमी होणार आहेत. आपल्या स्टार्ट-अप्स, एमएसएमई, लहान व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी कर कमी करण्यात आला आहे, त्याचबरोबर काही प्रक्रियाही सोप्या करण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांच्या सोयी आणखी वाढतील.

मित्रांनो,

तरुणांना आणखी एक फायदा होणार आहे तो म्हणजे फिटनेस क्षेत्रात. जिम, सलून आणि योगासारख्या सेवांवरील कर कमी करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की आपले तरुण तंदुरुस्त असतील आणि मी तुम्हाला आठवण करून देतो की, सरकार तुमच्या फिटनेससाठी खूप काही करत आहे, म्हणून मी एक गोष्ट वारंवार सांगत राहतो, तुम्ही असे लोक आहात, तुम्ही दररोज 200 लोकांशी बोलता, तुम्ही त्यांना माझा मुद्दा सांगितला पाहिजे की लठ्ठपणा हा आपल्या देशासाठी खूप चिंतेचा विषय आहे, म्हणून स्वयंपाकाच्या तेलाचे प्रमाण 10 टक्के कमी करून सुरुवात करा, मुहम्मद जी, तुम्ही माझे राजदूत व्हा. लठ्ठपणाविरुद्धची लढाई कमकुवत होता कामा नये.

मित्रांनो,

जर मी जीएसटीमधील या सुधारणांचा सारांश सांगितला तर मी एवढेच म्हणू शकतो की यामुळे भारताच्या भव्य अर्थव्यवस्थेत पंचरत्न (पाच रत्ने) जोडली गेली आहेत.

एक म्हणजे, करप्रणाली अधिक सुलभ झाली आहे. दुसरे, भारताच्या नागरिकांचं जीवनमान अधिक उंचावणार आहे. तिसरे, उपभोग व वाढ यांना नव्याने प्रोत्साहन मिळणार आहे. चौथे, व्यवसायातील सुलभतेमुळे गुंतवणूक व रोजगाराला चालना मिळेल आणि पाचवे, विकसित भारतासाठी सहकारी संघराज्यवाद म्हणजेच केंद्र व राज्यांची भागीदारी अधिक बळकट होईल.

मित्रांनो,

‘नागरिक देवो भव’ हा आमचा मंत्र आहे. यावर्षी केवळ जीएसटी मध्येच कपात झाली नाही, तर आयकरामध्ये देखील मोठी कपात करण्यात आली आहे. 12 लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर कर शून्य करण्यात आला आहे. आजकाल तुम्ही आयकर विवरणपत्र भरताना या निर्णयाचा सुखद अनुभव अधिक जाणवतो. म्हणजेच उत्पन्नात बचत आणि खर्चातही बचत, हे जर दुहेरी लाभ नाहीये तर काय आहे ?

मित्रांनो,

आज महागाई दरही अतिशय कमी पातळीवर असून नियंत्रणात आहे. हेच तर जनकल्याणकारी शासन आहे. जेव्हा जनहित व राष्ट्रहिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जातात, तेव्हा देश प्रगती करतो. म्हणूनच आज भारताचा विकासदर जवळजवळ 8 टक्के आहे. जगभरात भारत हा सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे. हे 140 कोटी भारतीयांचे सामर्थ्य आहे, 140 कोटी भारतीयांचा संकल्प आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो भारताला आत्मनिर्भर बनवण्याऱ्या सुधारणांचा हा प्रवास थांबणार नाही.

मित्रांनो,

भारतासाठी आत्मनिर्भरता ही केवळ एक घोषणा नाही, तर ठोस प्रयत्नांची दिशा आहे. माझी सर्वांशी, विशेषतः शिक्षकांशी अपेक्षा आहे की, आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे बीजारोपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात सातत्याने व्हावे. तुम्हीच आहात जे मुलांना त्यांच्या भाषेत, बोलीत सहजतेने आत्मनिर्भरतेचे महत्त्व समजावून सांगू शकता आणि तुमचं ते ऐकतातही. त्यांना सांगा की इतरांवर अवलंबून राहून देश कधीही त्याच्या खऱ्या सामर्थ्याप्रमाणे वेगाने पुढे जाऊ शकत नाही.

मित्रांनो,

भारताच्या आजच्या व भावी पिढीमध्ये एक प्रश्न सतत पसरवला पाहिजे — आपण घराघरांत नकळत किती विदेशी वस्तू वापरतो? विद्यार्थी जर यादी तयार करतील की सकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत वापरल्या जाणाऱ्या किती वस्तू विदेशी आहेत? तर त्यांना जाणवेल की अगदी हेअर पिनपासून कंगव्यापर्यंत परकीय वस्तू वापरल्या जातात. ही जागरूकता आल्यावर ते नक्कीच विचार करतील," माझ्या देशाला याचा काय फायदा?" त्यामुळे नवीन पिढीला प्रेरित करणे शक्य आहे. जे कार्य महात्मा गांधीजींनी आपल्यासाठी बाकी ठेवले होते, ते पूर्ण करण्याचे सौभाग्य आता आपल्याला लाभले आहे. विद्यार्थ्यांना मी नेहमी प्रेरणा देत राहतो की "मी असे काय करू शकतो, ज्यामुळे माझ्या देशाची एखादी गरज पूर्ण होईल? जी गोष्ट देशात नाही, ती मी निर्माण करेन, आणीन."

कल्पना करा, आजही आपल्या देशाला 1 लाख कोटी रुपये किंमतीचे खाद्यतेल आयात करावे लागते. आपण कृषीप्रधान देश आहोत. आपली जीवनशैली, गरज किंवा काही बंधनांमुळे असे होत असले तरी, देशाला आत्मनिर्भर करणे आवश्यक आहे. जर हा पैसा बाहेर गेला नसता, तर किती शाळा उभारल्या गेल्या असत्या, किती मुलांचे आयुष्य घडले असते. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा विचार आपला जीवनमंत्र असला पाहिजे आणि नवीन पिढीला यासाठी प्रेरित करणे आपले कर्तव्य आहे.

मित्रांनो,

आज भारतातील विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, विज्ञान व तंत्रज्ञान याबद्दल नवीन उत्साह निर्माण झाला आहे. यात चांद्रयानच्या यशाने मोठी भूमिका बजावली आहे. चांद्रयानमुळे प्रत्येक मुलाला वैज्ञानिक व नवोन्मेषक होण्यासाठी प्रेरणा मिळाली. अलीकडेच आपण पाहिले की ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला अवकाश मोहिमेतून परतल्यावर आपल्या शाळेत गेले, तेव्हा वातावरण पूर्णपणे बदलले होते. त्यांच्या यशामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, तर त्यांना घडवतात, दिशा दाखवतात.

मित्रांनो,

तुमच्या या प्रयत्नांना आता अटल इनोव्हेशन मिशन व अटल टिंकरिंग लॅब्स कडूनही मदत मिळत आहे. आजपर्यंत देशात 10,000 अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन झाल्या आहेत. आणखी 50,000 नवीन लॅब्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर जलद गतीने काम सुरू आहे. या लॅब्समुळे तरुण पिढीला नवोन्मेषाची संधी मिळणार आहे आणि ते शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य होईल.

मित्रांनो,

एका बाजूला सरकार नवोन्मेष व तरुणांना डिजिटल सक्षमीकरण देण्यावर भर देत आहे, तर दुसऱ्या बाजूला डिजिटल जगाचे दुष्परिणाम यापासून विद्यार्थ्यांचे रक्षण करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. त्यांच्या आरोग्य व उत्पादकतेत वाढ करणेही महत्त्वाचे आहे.

तुम्ही पाहिले असेल की संसद सत्रात अलीकडेच ऑनलाइन गेमिंगशी संबंधित कायदा करण्यात आला. अनेक गेमिंग अॅप्स प्रत्यक्षात जुगार म्हणून वापरले जात होते. मोठे आर्थिक नुकसान व आत्महत्यांच्या घटनांमुळे हा प्रश्न गंभीर झाला होता. काही अहवालांनुसार, महिलादेखील अशा ऑनलाइन खेळात गुंतून कर्जबाजारी होत होत्या.

मोठ्या दबावांनाही न जुमानता, सरकारने मुलांच्या व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे. हा कायदा गेमिंग अँड गॅम्बलिंग वर नियंत्रण आणतो आणि विद्यार्थ्यांना या धोक्यांपासून वाचवतो.

घराघरांची वाताहत झाली, आर्थिक नुकसान होत होते आणि ही अशी आजारपणासारखी गोष्ट आहे. यात व्यसन लागल्यासारखी गत होते. हे गेम असे असतात ज्यात पैसे हिसकावून नेणारे तर तुम्हाला जाळ्यात अडकवतातच आणि फसवून टाकतात. आणि एवढा चांगला आशय आणतात की कुणीही त्यात अडकून पडतो. हे सर्व कुटुंबांसाठी चिंतेचे कारण बनले होते. म्हणून मी म्हणतो की, हा जो कायदा झाला आहे तो कायदा त्याच्या जागी आहे, पण मुलांना जागृत करणे, हे खूप आवश्यक आहे. आई-वडील तक्रार करू शकतात पण परिस्थिती सुधारू शकत नाहीत, कारण तणावाचे वातावरण निर्माण होतं; शिक्षक मात्र त्यात फार मोठी भूमिका बजावू शकतो. आपण कायदा तर केला आहे आणि पहिल्यांदाच ठरवले आहे की मुलांसमोर अशा प्रकारचा घातक आशय येणार नाही. मी तुम्हा सगळ्या शिक्षकांना विनंती करेन की, याबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नक्की जागरूकता निर्माण करा. पण यात दोन गोष्टी आहेत, गेमिंग ज्यात पैसा गुंतलेला नाही ते वाईट नाही.  जुगार वाईट आहे. आणि तुम्हाला माहिती असेलच, आता ऑलिंपिकमध्येही या प्रकारच्या गेमिंगला खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. तर ते कौशल्य विकसित होणे, वाढणे, ज्याला ज्यात प्रावीण्य असेल त्याला प्रशिक्षण मिळणे, ते वेगळे प्रकरण आहे. पण हे व्यसन होऊन, व्यसन लागून मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे, ही स्थिती देशासाठी फार मोठे चिंतेचे कारण आहे.

मित्रहो,

आपल्या सरकारचा प्रयत्न आहे की आपले तरुण गेमिंगच्या क्षेत्रात जागतिक स्तरावरील आपले स्थान वाढवतील. भारतात जे सर्जनशील काम करणारे आहेत, ज्यांच्या स्वतःच्या कथा आहेत, त्यांच्या आधारावर खूप सारे नवे गेम तयार होऊ शकतात, आपण गेमिंगच्या जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व मिळवू शकतो. भारतातही अनेक प्राचीन खेळ आहेत, असा आशय  आहे, जो ऑनलाइन गेमिंगचे जग गाजवतो आहे, आपण यात आणखी पुढे जाऊ शकतो. अनेक स्टार्टअप या दिशेने उत्तम काम करत आहेत. आपण आपल्या शाळा आणि महाविद्यालयांतही याबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली तर मला वाटते की, त्यांना एक चांगल्या कारकिर्दीचा पर्यायही मिळेल.

मित्रहो,

आपल्यापैकी अनेकांनी मला विचारलेल्या एका प्रश्नाचा मुद्दा मी लाल किल्ल्यावरून उपस्थित केला आहे.  मी `व्होकल फाॅर लोकल` म्हणजेच स्वदेशी स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. स्वदेशी म्हणजे जे काही आपल्या देशात पिकते, देशात  निर्माण होते ते. त्या वस्तू, ज्यामध्ये माझ्या देशबांधवांच्या घामाचा सुगंध आहे, ज्या गोष्टींमध्ये माझ्या देशाच्या मातीतला सुगंध आहे, त्या माझ्यासाठी स्वदेशी आहेत आणि म्हणूनच त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. प्रत्येक घरातील मुलांना सांगितले पाहिजे की, जसे प्रत्येक घरात तिरंगा आहे तसेच घरावर एक फलक लावा, प्रत्येक घर स्वदेशी, घरा-घरात स्वदेशी. तसेच प्रत्येक दुकानदारानेही आपल्या दुकानात फलक लावावा, गर्वाने सांगा, हे स्वदेशी आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की, हे माझ्या देशाचे आहे, माझ्या देशात बनलेले आहे. असे वातावरण तयार केले पाहिजे. स्थानिकसाठी आग्रही होण्याच्या या अभियानात शिक्षकांची खूप मोठी भूमिका असू शकते.

आपल्या मुलांना शाळेत प्रकल्प आणि उपक्रमांमधून भारतीय बनावटीच्या वस्तूंची ओळख करून देता येईल. खेळता-खेळता हे शिकवता येईल. एक अभ्यास दिला जाऊ शकतो , ज्या घरात जितक्या वस्तू आहेत त्यापैकी किती स्वदेशी आहेत, त्याची यादी बनवा आणि दुसऱ्या दिवशी शाळेत आणा. मग असे ठरवा की या महिन्यात इतक्या वस्तू कमी करू, पुढच्या महिन्यात आणखी कमी करू. हळूहळू संपूर्ण कुटुंब स्वदेशी होईल. मी तर सुचवेन की, शाळेत दहा वर्ग असतील, तर प्रत्येक वर्गाने सकाळी गावात फलक घेऊन स्वदेशीची फेरी काढावी. पहिल्या दिवशी पहिला वर्ग, दुसऱ्या दिवशी दुसरा वर्ग, तिसऱ्या दिवशी तिसरा वर्ग... अशा रीतीने गावात सातत्याने स्वदेशीचे वातावरण निर्माण होईल. मी खात्रीने सांगतो की, देशाची आर्थिक ताकद खूप वाढेल. प्रत्येकाने छोटंसे का होईना, काहीतरी काम केले पाहिजे. आपण 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचे स्वप्न घेऊन चाललो आहोत, आणि असा देश विकसित व्हावा असे कोणाला नकोसे वाटेल, कोणालाही नाही. पण त्यासाठी सुरुवात कुठेतरी आपल्यालाच करावी लागेल.

मित्रहो,

आपण शाळांमध्ये विविध उत्सव साजरे करतो. त्यामध्येही स्वदेशीचा संदेश आणता येईल. सजावटीसाठी भारतीय वस्तूंचा वापर करतो का, हे पाहिले पाहिजे. कला- हस्तकला वर्गात स्वदेशी साहित्य वापरले पाहिजे. असे केल्याने मुलांच्या मनात लहानपणापासून स्वदेशीची भावना रुजेल.

मित्रहो ,

शाळांमध्ये आपण अनेक दिन साजरे करतो. तर `स्वदेशी दिन`, `स्वदेशी आठवडा`, `स्थानिक उत्पादन दिन` असे दिवसही साजरे केले पाहिजेत. हे एक अभियान म्हणून चालवले पाहिजे. तुम्ही याचे नेतृत्व करू शकता. यामुळे समाज नव्या रूपात सजू शकेल आणि तुमचे योगदान मोठे ठरेल. मुले त्यांच्या कुटुंबातून एखादी स्थानिक वस्तू घेऊन शाळेत आणतील आणि तिची कहाणी सांगतील. ती कुठे बनली, कोणी बनवली, देशासाठी तिचे महत्त्व काय आहे. तसेच स्थानिक कारागीर, जे पिढ्यान्‌पिढ्या हस्तकला करीत आहेत, त्यांच्याशी मुलांचा संवाद घडवता येईल. शाळेत बोलावून त्यांचे अनुभव ऐकवता येतील. मुलांच्या वाढदिवसांमध्येही भारतात बनलेल्या वस्तू भेट म्हणून दिल्या तर त्यातूनही स्वदेशीचे वातावरण तयार होईल. आणि गर्वाने म्हणता येईल, हे बघा, भारतात बनवलेले आहे, खास तुमच्यासाठी आणले आहे.

थोडक्यात सांगायचे तर, भारतात बनवलेले, हे आपल्या जीवनाचे अधिष्ठान झाले पाहिजे. जबाबदारी समजून आपण पुढे नेले पाहिजे. यामुळे आपल्या तरुणांमध्ये देशभक्ती, आत्मविश्वास आणि श्रमाचे महत्त्व या मूल्यांचा स्वाभाविक समावेश होईल. आपल्या तरुणांनी आपली प्रगती ही राष्ट्राच्या प्रगतीशी जोडली पाहिजे. हाच विकसित भारत घडवण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.

मला विश्वास आहे की, तुम्ही सर्वजण शिक्षक म्हणून राष्ट्रनिर्मितीच्या या महान ध्येयाशी कर्तव्यभावनेने जोडले जाल. देशाला सामर्थ्यवान बनवण्याचे काम तुम्ही आपल्या खांद्यावर घ्याल आणि निश्चितच अपेक्षित असे परिणाम आपल्याला मिळतील.

आपण सर्वांना या महत्त्वाच्या प्रसंगी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि जे काम आपण नेहमी करता, तेच काम आज मी करीत आहे. आपण नेहमी गृहपाठ देण्याचे काम करता, तर आज मी तुम्हाला गृहपाठ दिला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तो नक्की पूर्ण कराल.

खूप खूप धन्यवाद!

जयदेवी पुजारी-स्वामी/‍सोनल तुपे/आशिष सांगले/विजयालक्ष्मी साने/हेमांगी कुलकर्णी/गजेंद्र देवडा/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2166172) Visitor Counter : 3