अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकार आणि इस्रायल सरकारने आज नवी दिल्लीत द्विपक्षीय गुंतवणूक करारावर (बीआयए) केली स्वाक्षरी

Posted On: 08 SEP 2025 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025

भारत सरकार आणि इस्रायल सरकार यांच्या दरम्यान आज नवी दिल्ली येथे द्विपक्षीय गुंतवणूक करारावर ( बीआयए)स्वाक्षऱ्या झाल्या. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन आणि इस्रायलचे अर्थमंत्री बेझलेल स्मोत्रिच यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इस्रायल सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले इस्रायली शिष्टमंडळ आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बीआयएवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

हा करार म्हणजे दोन्ही देशांच्या संबंधांमधील ऐतिहासिक टप्पा आहे. या करारामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, गुंतवणूकदारांना अधिक खात्री आणि संरक्षण मिळेल, किमान मानक हाताळणी सुनिश्चित होऊन तसेच लवादाद्वारे स्वतंत्र विवाद निराकरण यंत्रणा निर्माण होऊन व्यापार आणि परस्पर गुंतवणुकीची सुलभ वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

या करारात जप्तीपासून गुंतवणुकीचे संरक्षण, पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि सुरळीत हस्तांतरण आणि नुकसान भरपाई निश्चित करणे यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. त्याच वेळी गुंतवणूकदारांच्या संरक्षणाचे राज्याच्या नियामक अधिकारांशी काळजीपूर्वक संतुलन साधण्यासाठी तसेच सार्वभौम प्रशासनासाठी पुरेशी धोरणात्मक जागा राखण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे.

या करारावर स्वाक्षरी केल्याने दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी आणि अधिक मजबूत आणि लवचिक गुंतवणूक वातावरण निर्माण करण्यासाठीची सामायिक वचनबद्धता दिसून येते. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय गुंतवणुकीत वाढ होण्याची अपेक्षा आहे, जी सध्या एकूण 800 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि अर्थव्यवस्थांनाही फायदा होऊ शकेल. या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आवाहन केले की, कराराचा फायदा घेण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी दोन्ही बाजूंनी अधिकाधिक व्यावसायिक संवाद साधावा.

सुरक्षा आव्हानांना न जुमानता दोन्ही देशांनी उच्च आर्थिक विकास साधला आहे या मजबूत समान पार्श्वभूमीचा इस्रायलच्या अर्थमंत्र्यांनी उल्लेख केला. सायबर सुरक्षा, संरक्षण, नवोन्मेष आणि उच्च-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही राष्ट्रांमध्ये अधिक सहकार्याची गरज असल्याचे इस्रायलच्या अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले.

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2164770) Visitor Counter : 2