अंतराळ विभाग
डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते यंदाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेचे उद्घाटन, जागतिक प्रगतीसाठी अंतराळाच्या वापराचे केले आवाहन
Posted On:
08 SEP 2025 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अवकाश, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज अवगत केले की, भारत आपल्या अंतराळ प्रवासात एका परिवर्तनाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे, ज्यामध्ये 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक आणि 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवणे अशी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत. "जागतिक प्रगतीसाठी अंतराळ वापर: नवोन्मेष, धोरण आणि वाढ" अशी संकल्पना असलेल्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आभासी माध्यमातून बोलत होते.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सुधारणांची भूमिका अधोरेखित करताना नमूद केले की यामुळे हे क्षेत्र खाजगी सहभाग, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुले झाले आहे. सध्या 300 हून अधिक स्टार्टअप्स प्रक्षेपण यान, उपग्रह आणि भूप्रदेश प्रणालींसारख्या क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत. हे अभिनवतेला चालना देण्याबरोबरच तरुण व्यावसायिकांसाठी नोकऱ्या, गुंतवणूक आणि संधी निर्माण करत आहे.

अंतराळाचे खरे मोल हे शेती आणि आरोग्यापासून शिक्षण, शहरी विकास आणि प्रशासनापर्यंत दैनंदिन जीवनातील त्याच्या वापरात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. "अंतराळाने प्रत्येक क्षेत्राला सक्षम बनवले पाहिजे आणि सामान्य नागरिकांची सेवा केली पाहिजे," असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताच्या बांधिलकीवरही मंत्र्यांनी भर दिला. अमेरिकेसोबतच्या संयुक्त नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार (निसार) मोहीम आणि जपानसोबत करण्यात येणाऱ्या चांद्रयान-5 मोहिमेसारख्या अलीकडील भागीदारींचा त्यांनी उल्लेख केला. जागतिक सहभागासाठी अंतराळ एक शक्तिशाली मंच म्हणून कशाप्रकारे काम करू शकतो ते या सहकार्यातून प्रतीत होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

कौशल्य विकास हा भारताच्या अंतराळ धोरणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असे त्यांनी नमूद केले. इस्रोच्या आउटरीच कार्यक्रमांद्वारे, उत्कृष्टता शैक्षणिक केंद्रांद्वारे आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याद्वारे, देश उपग्रह संरचना, प्रणोदन, एआय-चालित अनुप्रयोग आणि अंतराळ कायदा यासारख्या क्षेत्रातील प्रतिभेला वाव देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुषमा काणे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164743)
Visitor Counter : 2